राष्ट्रपती कार्यालय
फरीदाबादमधील जे. सी. बोस विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या 5 व्या दीक्षांत समारंभाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची उपस्थिती
प्रविष्टि तिथि:
21 AUG 2024 5:11PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 21 ऑगस्ट 2024
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज (21 ऑगस्ट, 2024) हरियाणामधील फरीदाबाद येथील जे. सी. बोस विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाच्या 5 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्या.
उपस्थितांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की,आज संपूर्ण जग चौथ्या औद्योगिक क्रांतीच्या युगात आहे.भारतही या क्रांतीच्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या संधींचा लाभ घेण्यासाठी सज्ज आहे. हे राष्ट्रीय उद्दिष्ट साध्य करण्यामध्ये जेसी बोस विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठा सारख्या संस्थांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असेल.
या विद्यापीठाने गेल्या काही वर्षांत अनेक औद्योगिक आणि शैक्षणिक संस्थांशी करार केले आहेत,याची नोंद घेत राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले. अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी या विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये (परिसर) विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी उत्कृष्टता केंद्रांची स्थापना केली आहे.या सर्व प्रयत्नांचे सकारात्मक परिणाम होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रपती म्हणाल्या की, तंत्रज्ञानाच्या विकासामुळे आज प्रगतीचे अनेक मार्ग खुले झाले आहेत. उदाहरणार्थ, दुर्गम भागात इंटरनेटच्या वापरामुळे ऑनलाइन रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. पण आपण हे लक्षात ठेवायला हवे की, तंत्रज्ञानाचा वापर योग्य आणि शाश्वत विकासाकरता आणि लोकहितासाठी व्हायला हवा, त्याचा चुकीचा वापर घातक ठरू शकतो.
तरुणांना कुशल आणि स्वावलंबी बनवण्यात महत्त्वाची भूमिका बजावल्याबद्दल राष्ट्रपतींनी जे. सी. बोस विज्ञान आणि तंत्रज्ञान विद्यापीठाची प्रशंसा केली.
राष्ट्रपती म्हणाल्या की, भारताचा समृद्ध वारसा आपल्याला नेहमीच अभिमानास्पद वाटतो. तरुण पिढी या समृद्ध वारशाचा एक भाग असून, त्यांनी ध्वजवाहकाची जबाबदारी स्वीकारायला हवी. विद्यार्थ्यांनी स्वतःच्या क्षमता, आणि योग्यतेवर विश्वास ठेवावा आणि आपले उद्दिष्ट गाठण्यासाठी आत्मविश्वासाने पुढे जावे, असे आवाहन राष्ट्रपतींनी केले.
राष्ट्रपतींचे भाषण पाहण्यासाठी कृपया येथे क्लिक करा.
S.Kane/R.Agashe/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2047328)
आगंतुक पटल : 94