राष्ट्रपती कार्यालय

मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली

Posted On: 20 AUG 2024 8:06PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2024


मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी आज (ऑगस्ट 20, 2024) राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. मलेशियाचे पंतप्रधान म्हणून भारताच्या दौऱ्यावर प्रथमच आलेल्या पंतप्रधान इब्राहिम यांचे स्वागत करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, लोकशाही, बहुसांस्कृतिकता, बहुल्यवाद आणि परस्पर आदर ही समान मूल्ये भारत-मलेशिया संबंधांसाठी मार्गदर्शक शक्ती आहेत.दोन्ही देशांनी आपली भागीदारी आणखी पुढे नेत सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीत परिवर्तित करून भारत-मलेशिया संबंध अधिक दृढ करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल,तसेच सहकार्याच्या विविध क्षेत्रांमध्ये त्याच्या अंमलबजावणीसाठी कृती-केंद्रित पथदर्शक आराखड्यावर दोन्ही देश काम करत आहेत, याबद्दल राष्ट्रपतींनी समाधान व्यक्त केले.

राष्ट्रपती पुढे म्हणाल्या की, भारत ‘ग्लोबल साऊथ’ देशांमधील एक प्रबळ भागीदार म्हणून  मलेशियाकडे पाहत आहे. मलेशिया हा भारताचा आसियानमधील प्रमुख भागीदार असून, भारताचे ऍक्ट ईस्ट धोरण आणि हिंद प्रशांत महासागर दृष्टीकोनातील एक महत्त्वाचा देश असल्याचे त्या म्हणाल्या.

मलेशियाने 2025 मध्ये आसियानचे अध्यक्षपद स्वीकारल्याबद्दल राष्ट्रपतींनी शुभेच्छा दिल्या.भारत मलेशियाबरोबर काम करत राहील आणि शांततापूर्ण आणि समृद्ध हिंद प्रशांत महासागर क्षेत्राच्या सामायिक उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी सहकार्य करेल याचा त्यांनी पुनरुच्चार केला.

मलेशियाचे राजे सुलतान इब्राहिम यांच्या नुकत्याच झालेल्या राज्याभिषेकाबद्दल,राष्ट्रपती मुर्मू यांनी मलेशियाचे पंतप्रधान इब्राहिम यांच्या माध्यमातून त्यांचे अभिनंदनही केले.  


S.Bedekar/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2047059) Visitor Counter : 36