दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

मागील एका वर्षात 7.3 कोटी इंटरनेट ग्राहक आणि 7.7 कोटी ब्रॉडबँड ग्राहक गेले जोडले


भारतीय दूरसंचार क्षेत्राने वर्ष 2023-2024 मध्ये नोंदवली उल्लेखनीय वाढ

दूरध्वनी ग्राहकांची संख्या पोहोचली 119.9 कोटींवर

Posted On: 20 AUG 2024 3:32PM by PIB Mumbai


नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2024

 

भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने (ट्राय )) जारी केलेल्या वार्षिक अहवालात ठळकपणे नमूद केल्याप्रमाणे 2023-2024 या आर्थिक वर्षात भारतीय दूरसंचार क्षेत्राने उल्लेखनीय वाढ नोंदवली  आहे.

या अहवालात विविध सेवांमधील लक्षणीय वाढीचा कल आणि प्रमुख मापदंड अधोरेखित करण्यात आले आहेत.भारतात दूरध्वनी जोडण्यांचे  एकूण प्रमाण  मार्च 2023 च्या अखेरीस 84.51% इतके होते ते मार्च 2024 अखेरपर्यंत  1.39% च्या वार्षिक दराने 85.69% पर्यंत वाढल्याचे या अहवालात दिसून आले आहे.

अहवालातील प्रमुख निष्कर्ष:

1. एकूण इंटरनेट ग्राहकांमध्ये  वाढ: इंटरनेट ग्राहकांची एकूण संख्या मार्च 2023 अखेर 88.1 कोटी होती ती  मार्च 2024 अखेर 95.4 कोटी झाली असून वार्षिक 8.30% वाढ झाली आहे, परिणामी गेल्या एक वर्षात आणखी 7.3 कोटी  इंटरनेट ग्राहकांची भर पडली आहे. .

2. ब्रॉडबँड ग्राहकांचे प्राबल्य : ब्रॉडबँड सेवांनी त्यांचा चढता कल  कायम राखला आहे , ब्रॉडबँड ग्राहकांची संख्या मार्च 2023 मधील  84.6 कोटींवरून मार्च 2024 मध्ये 92.4 कोटीपर्यंत वाढली असून हा मजबूत वाढीचा दर 9.15% आहे.

3. टेलि – घनतेमध्ये वाढ: भारतातील दूरध्वनी ग्राहकांची संख्या मार्च 2023 अखेर 117.2 कोटी होती ती मार्च 2024 अखेरीस 119.9 कोटीपर्यंत वाढली, हा  वार्षिक वाढीचा दर 2.30% इतका आहे. दरमहा प्रति ग्राहक सरासरी मिनिटे वापर हा 2022-23 या वर्षातील 919 वरून 2023-24 मध्ये 963 पर्यंत वाढला आणि हा वाढीचा दर 4.73% आहे.

4. समायोजित सकल महसूल देखील 2022-23 मधील 2,49,908 कोटी रुपयांवरून 2023-24 मध्ये 2,70,504 कोटी रुपयांपर्यंत वाढला असून हा वाढीचा दर 8.24% आहे.

2023-24 या आर्थिक वर्षासाठी भारतातील दूरसंचार सेवांसाठी प्रमुख मापदंड आणि वाढीचा कल याबाबत माहिती या अहवालात असून  दूरसंचार सेवांबद्दल एक व्यापक दृष्टीकोन देखील तो प्रदान करतो तसेच  विविध हितधारक, संशोधन संस्था आणि विश्लेषकांसाठी संदर्भ दस्तावेज  म्हणून काम करतो.


S.Bedekar/S.Kane/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2046931) Visitor Counter : 62