संरक्षण मंत्रालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट 2024 रोजी लाल किल्ल्यावरून 78 व्या स्वातंत्र्यदिन सोहळ्याचे नेतृत्व करणार
ऐतिहासिक स्मारकाच्या साक्षीने ‘विकसित भारत @ 2047’ चा दृष्टीकोन साकारणार
जवळजवळ 6,000 विशेष अतिथी या भव्य सोहळ्याला उपस्थित राहणार
प्रविष्टि तिथि:
14 AUG 2024 5:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 ऑगस्ट 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी 15 ऑगस्ट 2024 रोजी दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून 78 व्या स्वातंत्र्य दिनाच्या सोहळ्यामध्ये देशाचे नेतृत्व करतील. ते राष्ट्रध्वज फडकवतील आणि त्यानंतर परंपरेनुसार या ऐतिहासिक स्मारकाच्या तटबंदीवरून देशाला संबोधित करतील. ‘विकसित भारत @ 2047’,ही यंदाच्या स्वातंत्र्य दिनाची संकल्पना आहे. हा उत्सव, 2047 साला पर्यंत देशाला विकसित देश बनवण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना बळ देणारे व्यासपीठ ठरेल.
विशेष पाहुणे
मोठ्या उत्साहाने साजऱ्या होणार्या या राष्ट्रीय उत्सवात जनभागीदारी वाढवण्याच्या उद्देशाने, यंदा सुमारे 6,000 विशेष अतिथींना लाल किल्ल्यावरील या सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. हे अतिथी समाजाच्या विविध स्तरांमधील असून, यामध्ये युवा, आदिवासी समाज, शेतकरी, महिलांचा समावेश आहे. या विशेष अतिथींनी सरकारच्या विविध योजना/उपक्रमांच्या सहाय्याने विविध क्षेत्रांमध्ये उत्तम कामगिरी केली आहे.
अटल इनोव्हेशन मिशन आणि पीएम श्री (Prime Minister's Schools for Rising India) योजनेचा लाभ घेणारे विद्यार्थी, तसेच मेरा युवा भारतचे (MY Bharat) आणि ‘मेरी माटी मेरा देश’ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक या सोहळ्याला उपस्थित राहतील.
आदिवासी कारागीर/वन धन विकास सदस्य आणि राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त आणि विकास महामंडळाचे अर्थसहाय्य लाभलेले आदिवासी उद्योजक, प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी, प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे लाभार्थी आणि शेतकरी उत्पादक संघटनांचे प्रतिनिधी, या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहतील.
मान्यताप्राप्त सामाजिक आरोग्य कार्यकर्ता (आशा), सहायक परिचारिका मिडवाइफ (एएनएम) आणि अंगणवाडी सेविका, निवडून आलेल्या महिला प्रतिनिधी, संकल्पचे लाभार्थी: महिला सक्षमीकरण केंद्र, लखपती दीदी आणि ड्रोन दीदी उपक्रम आणि सखी केंद्र योजना, आणि बाल कल्याण समिती आणि जिल्हा बाल संरक्षण केंद्राचे कर्मचारी, हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहतील.
नुकत्याच झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय चमूलाही स्वातंत्र्य दिनाच्या या उत्सवात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
आकांक्षी प्रभाग कार्यक्रमाच्या प्रत्येक प्रभागातील एक पाहुणे, सीमा रस्ते संघटनेचे कामगार, प्रेरणा (PRERANA) शालेय कार्यक्रमातील विद्यार्थी, आणि प्राधान्य क्षेत्र योजनांमध्ये उद्दिष्ट पूर्ण केलेल्या ग्राम पंचायतींचे सरपंच हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहतील.
विविध राज्ये/केंद्रशासित प्रदेशांतील सुमारे 2,000 व्यक्तींनाही या भव्य सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने MyGov आणि आकाशवाणी यांच्या सहयोगाने आयोजित केलेल्या विविध ऑनलाईन स्पर्धांचे तीन हजार (3,000) विजेते देखील या उत्सवात सहभागी होतील.
प्रमुख कार्यक्रम
पंतप्रधानांचे लाल किल्ल्यावर आगमन झाल्यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्य मंत्री संजय सेठ आणि संरक्षण सचिव गिरीधर अरमाने त्यांचे स्वागत करतील. संरक्षण सचिव दिल्ली विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग (GoC), लेफ्टनंट जनरल भवनीश कुमार यांना पंतप्रधानांचा परिचय करून देतील.दिल्ली विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग (GoC), पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सलामी स्थळाजवळ घेऊन जातील, ज्या ठिकाणी आंतर-सेवा संयुक्त दल आणि दिल्ली पोलीस दल पंतप्रधानांना मानवंदना देईल. त्यानंतर पंतप्रधान गार्ड ऑफ ऑनर सोहळ्याची पाहणी करतील.पंतप्रधानांना ‘मानवंदना (गार्ड ऑफ ऑनर) देणाऱ्या तुकडीमध्ये लष्कर, नौदल, हवाई दल आणि दिल्ली पोलिसांचे प्रत्येकी एक अधिकारी आणि 24 कर्मचारी असतील. यंदाच्या वर्षी भारतीय नौदलाकडे समन्वय सेवा बजावण्याचे काम आहे. ‘गार्ड ऑफ ऑनर’चे नेतृत्व कमांडर अरुणकुमार मेहता करणार आहेत. पंतप्रधानांच्या गार्डमधील लष्कराच्या तुकडीचे नेतृत्व मेजर अर्जुन सिंग, नौदलाच्या तुकडीचे नेतृत्व लेफ्टनंट कमांडर गुलिया भावेश एन के तर, हवाई दलाच्या तुकडीचे नेतृत्व स्क्वाड्रन लीडर अक्षरा उनियाल करणार आहेत. दिल्ली पोलिस दलाचे नेतृत्व अतिरिक्त डीसीपी अनुराग द्विवेदी यांच्याकडे असणार आहे.
गार्ड ऑफ ऑनरचे म्हणजेच मानवंदना देणा-या पथकाचे निरीक्षण केल्यानंतर पंतप्रधान लाल किल्ल्याच्या तटबंदीवर जातील. तिथे त्यांचे स्वागत संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ, सरसेनाध्यक्ष म्हणजेच संरक्षण कर्मचारी प्रमुख जनरल अनिल चौहान, लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी, नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी आणि हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही आर चौधरी करतील. दिल्ली क्षेत्राचे कमांडर (जीओसी) पंतप्रधानांना राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी तटबंदीवरील व्यासपीठावर नेणार आहेत..
पंतप्रधानांना राष्ट्रध्वज फडकवण्यासाठी लेफ्टनंट संजीत सैनी मदत करतील. त्याचवेळी 1721 फील्ड बॅटरीच्या (खास समारंभासाठी असलेल्या) 21 तोफांची सलामी दिली जाईल. स्वदेशी 105 मिमी लाइट फील्ड गनचा वापर करून देण्यात येणा-या सलामी कार्यक्रमाचे नेतृत्व मेजर सबनीस कौशिक करतील, यावेळी ‘गन पोझिशन ऑफिसर’ नायब सुभेदार (एआयजी) अनुतोष सरकार असतील.
राष्ट्रीय ध्वज रक्षक पथकामध्ये लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रत्येकी एक अधिकारी आणि 32 इतर रँकचे जवान असतील. तसेच दिल्ली पोलिसांचे 128 कर्मचारी, पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकावण्याच्या वेळी राष्ट्रीय सलामी देतील. कमांडर विनय दुबे हे या इंटर-सर्व्हिसेस गार्ड आणि पोलिस गार्डचे कमांडर असतील.
राष्ट्रीय ध्वजरक्षक दलातील लष्करी तुकडीचे मेजर दिनेश नगंगोम, नौदल तुकडीचे लेफ्टनंट कमांडर सचिन धनखड आणि हवाई दलाच्या तुकडीचे स्क्वॉड्रन लीडर सीएस श्रवण देवय्या नेतृत्व करणार आहेत. दिल्ली पोलिस दलाचे नेतृत्व अतिरिक्त डीसीपी अचिन गर्ग करणार आहेत.
तिरंगा फडकवल्यानंतर त्याला ‘राष्ट्रीय सलामी’ दिली जाईल. पंजाब रेजिमेंट मिलिटरी बँडमध्ये एक जेसीओ आणि 25 इतर रँकचे अधिकारी आहेत, राष्ट्रीय ध्वज फडकावताना आणि 'राष्ट्रीय सलामी देताना राष्ट्रगीत वाजवले जाईल. या बँडचे संचालन सुभेदार मेजर राजिंदर सिंग करणार आहेत.
पंतप्रधानांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकवताच, लाईन एस्टर्न फॉर्मेशनमध्ये भारतीय वायुसेनेच्या ध्रुव या दोन प्रगत, वजनाने हलक्या असलेल्या हेलिकॉप्टरद्वारे कार्यक्रमस्थळी फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केला जाईल. या हेलिकॉप्टरचे कॅप्टन विंग कमांडर अंबर अग्रवाल आणि विंग कमांडर राहुल नैनवाल असतील.
फुलांच्या पाकळ्यांचा वर्षाव केल्यानंतर पंतप्रधान राष्ट्राला संबोधित करतील. त्यांच्या भाषणाच्या शेवटी राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी )छात्र राष्ट्रगीताचे गायन करतील. देशभरातील विविध शाळांमधील एकूण 2,000 मुले आणि कन्या छात्र (लष्कर, नौदल आणि हवाई दल) या उत्सवात सहभागी होतील. हे कॅडेट्स ज्ञानपथावर, लाल किल्ल्याच्या तटबंदीसमोर बसतील.सर्व छात्र मिळून तिरंगा संचासह ‘माय भारत’ हे बोधचिन्ह तयार करणार आहेत. राष्ट्रीय सेवा योजनेचे (एनएसएस) एकूण 500 स्वयंसेवक देखील या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार आहेत.
S.Patil/R.Agashe/S.Bedekar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2045285)
आगंतुक पटल : 217
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Odia
,
Bengali
,
Malayalam
,
Tamil
,
Assamese
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Telugu
,
Kannada