कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
भारत आणि मालदीव यांनी 1,000 नागरी सेवा अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी सामंजस्य कराराचे केले नूतनीकरण
Posted On:
12 AUG 2024 2:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 ऑगस्ट 2024
परराष्ट्र व्यवहार मंत्री, डॉ. एस. जयशंकर आणि मालदीवचे परराष्ट्र मंत्री मूसा जमीर यांनी 2024-2029 या कालावधीसाठी मालदीवच्या 1000 नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या क्षमताबांधणीसाठी सामंजस्य कराराचे नूतनीकरण माले येथे केले. मालदीवमधील माले येथे 9 ऑगस्ट 2024 रोजी दोन्ही देशांदरम्यान झालेल्या विकास भागीदारी चर्चेचा भाग म्हणून या कराराचे नूतनीकरण करण्यात आले.
क्षमता बांधणी उपक्रमांचा एक भाग म्हणून भारत सरकारचे नॅशनल सेंटर फॉर गुड गव्हर्नन्स (NCGG-राष्ट्रीय सुशासन केंद्र) आणि मालदीव प्रजासत्ताकचा नागरी सेवा अयोग्य यांच्यात मालदीवच्या 1000 नागरी सेवकांच्या क्षमता बांधणीसाठी 8 जून, 2019 रोजी सामंजस्य करार करण्यात आला होता.
राष्ट्रीय सुशासन केंद्राने वर्ष 2024 पर्यंत एकूण 1000 नागरी सेवकांचे प्रशिक्षण पूर्ण करून उल्लेखनीय टप्पा गाठला. यामध्ये मालदीवमधील स्थायी सचिव, सरचिटणीस आणि उच्च-स्तरीय प्रतिनिधींचा समावेश आहे. मालदीवच्या नागरी सेवकांसाठी क्षेत्रीय प्रशासनात एकूण 32 क्षमता बांधणी कार्यक्रम घेण्यात आले. यात भ्रष्टाचार विरोधी आयोग आणि मालदीवचे माहिती आयोग कार्यालय यांच्यासाठी प्रत्येकी एक कार्यक्रम राबवण्यात आला.
या सहयोगाच्या यशाची दखल घेत मालदीवच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने आणखी पाच वर्षांसाठी सामंजस्य कराराचे नूतनीकरण करण्याची विनंती केली होती. सामंजस्य कराराचे दिनांक 9 ऑगस्ट, 2024 रोजी, अधिकृतपणे नूतनीकरण करण्यात येऊन वर्ष 2029 पर्यंत आणखी 1,000 मालदीव नागरी सेवकांना प्रशिक्षित करण्यासाठी प्रतिबद्धता व्यक्त करण्यात आली. ही नूतनीकृत भागीदारी मालदीवच्या नागरी सेवकांसाठी सार्वजनिक धोरण, प्रशासन आणि क्षेत्रीय प्रशासनात क्षमतावृद्धी करेल आणि भारतव मालदीव यांच्यातील बंध अधिक दृढ करेल.
सार्वजनिक धोरण आणि प्रशासन या संदर्भात विविध देशांसोबत ज्ञानाचे आदानप्रदान आणि सहयोग वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रीय सुशासन केंद्र प्रतिबद्ध आहे.
* * *
JPS/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2044492)
Visitor Counter : 59