राष्ट्रपती कार्यालय
azadi ka amrit mahotsav

राष्ट्रपतींची न्युझीलंड भेट; न्युझीलंडचे गव्हर्नर जनरल,पंतप्रधान तसेच उपपंतप्रधान यांची घेतली भेट


न्युझीलंड आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेला केले संबोधित

Posted On: 08 AUG 2024 10:09PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2024

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या फिजी, न्युझीलंड आणि तिमोर-लेस्ते या देशांच्या दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज 08 ऑगस्ट 2024 रोजी त्यांचे न्युझीलंडमध्ये वेलिंग्टन येथे आगमन झाले.

न्युझीलंडच्या गव्हर्नर जनरल डेम सिंडी किरो यांनी सरकारी भवनात राष्ट्रपती मुर्मू यांचे स्वागत केले. यावेळी पारंपरिक माओरी “पोविरी” समारंभ तसेच रॉयल गार्ड ऑफ ऑनर देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. या भेटीदरम्यान दोन्ही नेत्यांनी भारत आणि न्युझीलंड दरम्यान असलेल्या स्नेहपूर्ण आणि मैत्रीपूर्ण संबंधांचे कौतुक केले आणि विविध क्षेत्रांतील सहकार्याविषयी चर्चा केली.परस्पर लाभदायक सहयोगी संबंध आणि भागीदारी प्रस्थापित करून, विशेषतः व्यापार आणि व्यवसायाच्या माध्यमातून भारत-न्युझीलंड आर्थिक  संबंधांची कक्षा आणखी विस्तारण्यासाठी प्रयत्न सुरु ठेवण्याच्या गरजेवर दोन्ही नेत्यांचे एकमत झाले.

त्यानंतरच्या कार्यक्रमात राष्ट्रपतींनी न्युझीलंड आंतरराष्ट्रीय शैक्षणिक परिषदेला संबोधित केले. या परिषदेत भारताला यावर्षीचा ‘कंट्री ऑफ ऑनर’ हा सन्मान देण्यात आला आहे.

याप्रसंगी बोलताना राष्ट्रपती मुर्मू यांनी ज्ञानार्जनाची समृध्द भारतीय परंपरा आणि  बहुशाखीय अध्ययन, गांभीर्यपूर्वक विचार आणि जागतिक स्पर्धात्मकता यांना प्रोत्साहन देऊन भारतीय शैषणिक परिदृश्यात परिवर्तन घडवून आणण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासह शिक्षणाच्या क्षेत्रात सध्या घडून येत असलेली प्रगती यासंबंधी तपशीलवार विचार मांडले.    

आपल्या दोन्ही देशांतील शैक्षणिक संस्था,विशेषतः कृत्रिम बुद्धीमत्ता, व्यावसायिक आणि कौशल्याधारित प्रशिक्षण, हवामान आणि पर्यावरण संबंधी अभ्यास, सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रम, संशोधन आणि नवोन्मेष यांच्या क्षेत्रात अधिक शैक्षणिक देवाणघेवाण आणि सहयोगाला राष्ट्रपती मुर्मू यांनी प्रोत्साहन दिले.
 
न्युझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्झॉन यांनी देखील राष्ट्रपतींची भेट घेतली. दोन्ही देशांदरम्यान सांस्कृतिक संबंध आणखी दृढ करणे ते क्षेत्रीय आणि जागतिक सुरक्षिततेसाठी कटिबद्धता अशा विविध विषयांवर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.

त्यापूर्वी, न्युझीलंडचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री विन्स्टन पीटर्स यांनी देखील राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांतील प्रगतीची नोंद घेतली तसेच सहकार्य वृद्धीच्या मार्गांबाबत चर्चा केली.

राष्ट्रपतींनी वेलिंग्टन रेल्वे स्थानकात असलेल्या महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पांजली वाहिली तसेच वेलिंग्टन येथील पुकीहू राष्ट्रीय युध्द स्मारकापाशी जाऊन शहीद जवानांना पुष्पचक्र अर्पण केले. या दोन्ही प्रसंगी न्युझीलंडच्या गव्हर्नर जनरल डेम सिंडी किरो या देखील राष्ट्रपती मुर्मू यांच्यासोबत उपस्थित होत्या.

वेलिंग्टन येथील शेवटच्या अधिकृत कार्यक्रमात,राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सन्मानार्थ गव्हर्नर जनरल किरो यांनी आयोजित केलेल्या मेजवानीमध्ये राष्ट्रपती सहभागी झाल्या.

राष्ट्रपती म्हणाल्या की भविष्याचा विचार करता, त्यात न्युझीलंडशी असलेले आपले संबंध आणखी सखोल करण्याची आणि सहकार्याचे नवे मार्ग शोधण्याची अमर्याद शक्यता आहे.कृत्रिम बुद्धीमत्ता, हरित तंत्रज्ञान, कृषी तंत्रज्ञान, व्यावसायिक संबंध संशोधन यांसारख्या क्षेत्रांमध्ये सहयोगाच्या आकर्षक संधी उपलब्ध आहेत असे त्या म्हणाल्या.

वेलिंग्टन येथील सर्व अधिकृत कार्यक्रम यशस्वीरित्या संपवून, राष्ट्रपती मुर्मू ऑकलंडला रवाना झाल्या असून तेथे त्या उद्या भारतीय समुदायाला संबोधित करतील.

राष्ट्रपतींच्या भाषणासाठी कृपया येथे क्लिक करा.

राष्ट्रपतींच्या भाषणासाठी कृपया येथे क्लिक करा.


N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 

 


(Release ID: 2043394) Visitor Counter : 53