पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान उज्ज्वला योजने (पीएमयुवाय) अंतर्गत देण्यात आलेल्या एलपीजी जोडण्या

Posted On: 08 AUG 2024 5:23PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2024

देशभरातील गरीब घरांतल्या सज्ञान महिलांना ठेव शुल्क मुक्त एलपीजी जोडण्या देण्याच्या उद्देशाने दिनांक 01 मे 2016 रोजी पंतप्रधान उज्ज्वला योजना (पीएमयुवाय) सुरु करण्यात आली. या योजनेतून 8 कोटी जोडण्या देण्याचे लक्ष्य सप्टेंबर, 2019 मध्ये साध्य करण्यात आले. देशातील उर्वरित गरीब घरांना एलपीजी जोडण्या देण्याच्या उद्देशाने ऑगस्ट 2021 मध्ये पीएमयुवायचा दुसरा टप्पा (उज्ज्वला 2.0) सुरु करण्यात आला आणि जानेवारी 2023 पर्यंत उज्ज्वला 2.0च्या माध्यमातून देशभरात 1.60 कोटी नव्या एलपीजी जोडण्या देण्यात आल्या. नंतर, नव्या मागण्यांचा विचार करुन सप्टेंबर 2023 मध्ये केंद्र सरकारने 75 लाख अतिरिक्त पीएमयुवाय जोडण्यांना मंजुरी दिली.आता, 08 जुलै 2024 पर्यंत उपलब्ध माहितीनुसार ओएमसीज अर्थात तेल विपणन कंपन्यांनी या 75 लाख अतिरिक्त पीएमयुवाय जोडण्यांचे काम पूर्ण केले आहे.दिनांक 01 जुलै 2024 पर्यंत देशभरात पीएमयुवाय अंतर्गत 10.33 कोटी एलपीजी जोडण्या देण्यात आल्या आहेत.

देशभरात एलपीजी जोडण्यांचे प्रमाण वाढवण्याच्या उद्देशाने इतर अनेक उपक्रमांसोबतच पीएमयुवायच्या प्रसारासाठी अभियाने, जोडण्यांसाठी नोंदणी आणि जोडणी वितरण यासाठी मेळावे/ शिबिरांचे आयोजन, आउट ऑफ होम- ओओएच फलकाद्वारे जाहिरात , रेडियोवरील जाहिराती, माहिती, शिक्षण आणि संपर्क (आयईसी) वाहने इत्यादींच्या माध्यमातून या योजनेला प्रोत्साहन देणे यांसारख्या इतर अनेक उपक्रमांच्या माध्यमातून पावले उचलण्यात आली आहेत. एलपीजी पंचायतींच्या माध्यमातून इतर पारंपरिक इंधनापेक्षा एलपीजी इंधन वापराचे फायदे तसेच एलपीजी च्या सुरक्षित वापराची माहिती; विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये आयोजित केलेली नोंदणी/जागरुकता शिबिरे; ग्राहक तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी आधार नोंदणीची सुविधा, पीएमयुवाय जोडणी मिळण्यासाठी बँक खाती उघडणे तसेच या जोडण्या मिळवण्याच्या प्रक्रियेचे सुलभीकरण; www.pmuy.gov.in या संकेतस्थळावर किंवा जवळच्या एलपीजी वितरकाकडे अथवा सामान्य सेवा केंद्रांमध्ये (सीएससी) ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादरीकरण, 5 किलो डबल बॉटल कनेक्शन (डीबीसी) चा पर्याय, 14.2 किलोच्या सिलेंडरवरुन 5 किलोच्या सिलेंडर वापराकडे वळण्याचा पर्याय, स्थलांतरित कुटुंबाना नव्या जोडणीसाठी रहिवासाचा दाखला आणि शिधापत्रिका यांच्या ऐवजी स्वयं-घोषणापत्र वापरण्यास परवानगी इत्यादी सोयी देऊन गरीब कुटुंबांना एलपीजी जोडण्या मिळणे सुलभ करण्यात आले आहे. या प्रयत्नांचा परिणाम म्हणून आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये पीएमयुवायच्या लाभार्थ्यांचा दर डोई एलपीजी वापर 3.95 रिफिल्स पर्यंत सुधारला आहे.

केंद्रीय पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री सुरेश गोपी यांनी आज लोकसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

N.Chitale/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 


(Release ID: 2043215)