खाण मंत्रालय
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा अल्युमिनियम उत्पादक देश
आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत देशातील खनिज उत्पादनाची वृद्धीच्या मार्गाने वाटचाल
यावर्षी देशातील महत्त्वाची खनिजे तसेच अल्युमिनियम धातूच्या उत्पादनात भरीव वाढ
Posted On:
01 AUG 2024 4:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 ऑगस्ट 2024
आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये उत्पादनाची विक्रमी पातळी गाठल्यानंतर आर्थिक वर्ष 2024-25 च्या पहिल्या तिमाहीत देशातील लोह खनिज, चुनखडी यांसारख्या महत्त्वाच्या खनिजांच्या उत्पादनात भरीव वाढ होत असल्याचे दिसून आले आहे. मूल्यानुसार देशातील एकूण एमसीडीआर अर्थात खनिज संवर्धन आणि विकास नियमांतर्गत होणाऱ्या खनिज उत्पादनात लोह खनिज आणि चुनखडी याचा वाटा सुमारे 80% आहे.आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये देशात 275 दशलक्ष टन लोह खनिज तर साडेचारशे दशलक्ष टन चुनखडीचे उत्पादन झाले.
तात्पुरत्या आकडेवारीनुसार, देशातील बिगर-लोह धातू क्षेत्राचा विचार करता, आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते जून) मधील प्राथमिक अल्युमिनियम उत्पादनात गेल्या वर्षीच्या याच काळातील उत्पादनापेक्षा 1.2% ची वाढ दिसून आली. आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते जून) मधील 10.28 लाख टन अल्युमिनियम उत्पादनाच्या तुलनेत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते जून) मधील अल्युमिनियम उत्पादन 10.43 लाख टन अधिक आहे.
भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा अल्युमिनियम उत्पादक, तिसऱ्या क्रमांकाचा चुनखडी उत्पादक आणि चौथ्या क्रमांकाचा लोह खनिज उत्पादक देश आहे. विद्यमान आर्थिक वर्षात देशातील लोह खनिज आणि चुनखडी उत्पादनात होत असलेल्या सातत्यपूर्ण वाढीतून या खनिजांच्या पोलाद आणि सिमेंट या वापरकर्त्या उद्योगांकडून होणारी सशक्त मागणी दिसून येते.अल्युमिनियम उत्पादनातील वाढीसोबत, हा वृद्धीचा कल उर्जा, पायाभूत सुविधा, बांधकाम, ऑटोमोटिव्ह तसेच यंत्रसामग्री या अल्युमिनियमच्या वापरकर्त्या क्षेत्रातील सातत्यपूर्ण सशक्त आर्थिक घडामोडींकडे निर्देश करतो.
आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते जून) मध्ये देशात 72 दशलक्ष टन लोह खनिजाचे उत्पादन झाले होते त्यात 9.7%ची वाढ दर्शवत आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते जून) मध्ये 79 दशलक्ष टन लोह खनिजाचे उत्पादन झाले. आर्थिक वर्ष 2023-24 (एप्रिल ते जून) मध्ये देशात झालेल्या 114 दशलक्ष टन चुनखडी उत्पादनात 1.8%ची वाढ होऊन आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते जून) मध्ये 116 दशलक्ष टन चुनखडीचे उत्पादन झाले. मँगनीज धातू उत्पादनाने आर्थिक वर्ष 2024-25 (एप्रिल ते जून) मध्ये 11% ची उसळी घेतली असून गेल्या वर्षी याच काळात झालेल्या 0.9 दशलक्ष टन मँगनीज उत्पादनात वाढ होऊन ते 1.0 दशलक्ष टनांवर पोहोचले आहे.
Jaydevi PS/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2040212)
Visitor Counter : 137
Read this release in:
English
,
Urdu
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Kannada