आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यात निपाह विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णाचा मृत्यू,या रुग्णाला निपाहचा संसर्ग झाल्याची पुण्यातील राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने केली पृष्टी


आजाराचा प्रसार रोखण्यासाठी  तातडीने सार्वजनिक आरोग्य उपाययोजना अंमलात आणण्याच्या केंद्र सरकारच्या सूचना

Posted On: 21 JUL 2024 3:29PM by PIB Mumbai

 

केरळमधील मलप्पुरम  जिल्ह्यात निपाह विषाणूचा संसर्ग झालेला एक रुग्ण आढळला आहे. मल्लपुरम इथल्या एका 14  वर्षाच्या   मुलामध्ये अॅक्युट इन्सेफलायटिस सिंड्रोम (Acute Encephalitis Syndrome - AES) अर्थात तीव्र स्वरुपाच्या मेंदुज्वराची लक्षणे आढळून आली. ही लक्षणे आढळल्यानंतर त्याला आधी पेरिंथलमन्ना येथील आरोग्य केंद्रात दाखल केलं गेलं, त्यानंतर त्याला उच्चस्तरीय सुविधा असलेल्या आरोग्य केंद्रात हलवण्यात आले. मात्र संसर्गानंतर या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. रुग्णाचे  नमुने पुण्यातील एनआयव्ही  अर्थात राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडे पाठवले. त्यात या मुलाला निपाह विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले.   

राज्य सरकारने तातडीने, सार्वजनिक आरोग्याशी संबंधित खाली नमूद उपाययोजना अंमलात आणाव्यात अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे :

  • निपाहची लागण झाल्याचे स्पष्ट झालेल्या प्रकरणामध्ये संबंधिताच्या कुटुंबात, त्याच्या आसपासच्या परिसरात आणि एकसमान भौगोलिक परिस्थिती असलेल्या परिसरांमध्ये या आजाराची लागण झालेले आणखी रुग्ण आहेत का याचा शोध घ्यावा.
  • निपाहची लागण झालेल्या रुग्णाच्या गेल्या 12  दिवसांमध्ये थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींचा (कोणत्याही प्रकारे थेट संपर्कात आलेल्या) शोध घेणे
  • रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींचे तसेच संसर्ग झाल्याचा संशय असलेल्या व्यक्तींना विलगीकरणाच्या कठोर नियमांनुसार विलगीकरणात ठेवावे.
  • प्रयोगशाळेत तपासणी करण्यासाठी नमुने संकलित करणे आणि त्यांची सुरक्षित वाहतूक करणे.

ज्या सरकारला या प्रकरणाचा तपास करण्यात तसेच या आजाराची साथ पसरण्याशी संबंधित महामारीजन्य दुव्यांचा शोध घेण्यात मदत करण्यासाठी आणि राज्य सरकारला तांत्रिक सहकार्य करण्यासाठी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या राष्ट्रीय एकात्मिक आरोग्य अभियानाअंतर्गतचे बहुसदस्यीय संयुक्त साथरोग प्रतिसाद पथक रवाना केले जाणार आहे.

यासोबतच, राज्य सरकारने केलेल्या विनंतीनंतर, भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर ) कोझीकोडमधील रुग्णांवरील उपचारांसाठी एककृत्तक प्रतिपिंडे अर्थात मोनोक्लोनल अँटीबॉडीज पाठवल्या आहेत. यासोबतच रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तिंच्या अतिरिक्त नमुन्यांची तपासणी करण्यासाठीदेखील फिरत्या जैवसुरक्षित तपासणी प्रयोगशाळा अर्थात मोबाईल बीएसएल -3 प्रयोगशाळाही कोझीकोडमध्ये पाठवल्या आहेत. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने पाठवलेल्या एककृत्तक प्रतिपिंडे सदर रुग्ण दगावण्याआधीच पोहचल्या होत्या मात्र, रुग्णाची आरोग्य स्थिती अत्यंत खालावलेली असल्याने त्याच्यावर या प्रतिपिंडांचा वापर करणे शक्य होऊ शकले नाही.

केरळमध्ये या आधीदेखील निपाह विषाणूमुळे होणारा संसर्गजन्य आजाराचा (Nipah Virus Disease - NiVD) उद्रेक झाला होता. सर्वात अलीकडे म्हणजेच 2023 सालीही कोझिकोड जिल्ह्यातच या आजाराची मोठी साथ पसरली होती. फळांवर जगणारे परावलंबी किटक / वटवाघुळ हे निपाह विषाणूचे मुख्य प्रसारक आहेत. अशा वटवाघुळाने चावा घेतलेले दुषित फळ खाल्याने मानवामध्ये निपाह विषाणुचा संसर्ग होऊ शकतो.

***

N.Chitale/T.Pawar/P.Kor



(Release ID: 2034805) Visitor Counter : 36