पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान करणार 21 जुलै रोजी भारत मंडपम् मध्ये जागतिक वारसा समितीच्या 46 व्या सत्राचे उद्घाटन


भारत जागतिक वारसा समितीच्या बैठकीचे पहिल्यांदाच भूषवत आहे यजमानपद

या बैठकीला 2000 पेक्षा जास्त राष्ट्रीय आणि 150 पेक्षा जास्त देशांचे आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी राहणार उपस्थित

Posted On: 20 JUL 2024 5:31PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी 21 जुलै रोजी नवी दिल्ली येथे भारत मंडपम् सभागृहात संध्याकाळी सात वाजता जागतिक वारसा समितीच्या 46 व्या बैठकीचे उद्घाटन करणार आहेत. यावेळी पंतप्रधान उपस्थितांना संबोधित देखील करतील. युनेस्कोच्या महासंचालक ऑड्रे अझुले या देखील उद्घाटन कार्यक्रमाला उपस्थित असतील.

भारत पहिल्यांदाच जागतिक वारसा समितीच्या बैठकीचे यजमानपद भूषवत आहे. 21 ते 31 जुलै 2024 दरम्यान ही बैठक नवी दिल्लीतील भारत मंडपम् मध्ये होणार आहे. जागतिक वारसा समितीची वर्षातून एकदा बैठक होत असते. जागतिक वारशाशी संबंधित विविध बाबींचे व्यवस्थापन करण्याची आणि जागतिक वारसा स्थळांच्या यादीत नोंद करण्यात येणार असलेल्या स्थळांबाबत निर्णय घेण्याची जबाबदारी या समितीवर आहे. या बैठकीदरम्यान, जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यासाठी आलेले प्रस्ताव, सध्या अस्तित्वात असलेल्या 124 जागतिक वारसा मालमत्तांच्या संवर्धन अहवालाची स्थिती, जागतिक वारसा निधीसाठी आंतरराष्ट्रीय सहाय्य आणि निधीचा वापर इ. मुद्यांवर चर्चा करण्यात येईल.

या बैठकीला देशातील तसेच 150 पेक्षा जास्त देशातील आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी मिळून 2000 पेक्षा जास्त प्रतिनिधी उपस्थित राहतील.

जागतिक वारसा समितीच्या बैठकीसोबतच जागतिक वारसा युवा व्यावसायिक मंच आणि जागतिक वारसा स्थान व्यवस्थापक मंच यांचे देखील आयोजन करण्यात येत आहे.

त्याबरोबरच भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवणाऱ्या विविध प्रदर्शनांचे देखील आयोजन करण्यात येणार आहे. द रिटर्न ऑफ ट्रेझर्स या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात येणार असून त्यामध्ये परदेशातून भारतात परत आणण्यात आलेल्या दुर्मिळ पुरातन कलाकृती मांडण्यात येतील. आतापर्यंत 350 पेक्षा जास्त कलाकृती परत मिळवण्यात आल्या आहेत. त्याशिवाय अतिशय अद्ययावत एआर आणि व्हीआर तंत्रज्ञानाच्या मदतीने गुजरातमधील पाटण येथील रानी की वाव, महाराष्ट्रातील वेरूळच्या गुंफांमधील कैलास मंदिर आणि कर्नाटकमध्ये हळेबीडु येथील होयसळ मंदिर या तीन जागतिक वारसा स्थळांना भेट दिल्याचा मंत्रमुग्ध करणारा आभासी अनुभव देण्यात येईल. तसेच माहिती तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रातील आधुनिक घडामोडींसोबत भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा, प्राचीन सभ्यता, भौगोलिक विविधता, पर्यटन स्थळे ठळकपणे प्रदर्शित करण्यासाठी अतुल्य भारत प्रदर्शनाचे देखील आयोजन करण्यात येईल. 

***

M.Pange/S.Patil/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2034683) Visitor Counter : 38