सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली खादी आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे नवा विक्रम प्रस्थापित


खादी आणि ग्रामोद्योग उलाढालीने प्रथमच 1.5 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला

10 वर्षात नवीन रोजगार निर्मितीमध्ये ऐतिहासिक 81% वाढ

Posted On: 09 JUL 2024 8:04PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 9 जुलै 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाअंतर्गत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने (केव्हीआयसी) 2023-24 या आर्थिक वर्षात उत्पादन, विक्री आणि नवीन रोजगार निर्मितीमध्ये नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे.

2023-24 या आर्थिक वर्षाची तात्पुरती आकडेवारी आज नवी दिल्ली येथे जाहीर करताना,केव्हीआयसी चे अध्यक्ष मनोज कुमार म्हणाले की, यापूर्वीच्या सर्व आकड्यांना मागे टाकून, 2013-14 आर्थिक वर्षाच्या तुलनेत विक्रीत 399.69 टक्के (अंदाजे 400%), उत्पादनात 314.79 टक्के (अंदाजे 315%) आणि नवीन रोजगार निर्मितीमध्ये 80.96 टक्के (अंदाजे 81%) वाढ झाली आहे. वर्ष 2013-14 च्या तुलनेत 2022-23 या आर्थिक वर्षात विक्रीत 332.14%, उत्पादनात 267.52% आणि नवीन रोजगार निर्मितीमध्ये 69.75% वाढ झाली आहे.

कुमार म्हणाले, केव्हीआयसीच्या या उल्लेखनीय कामगिरीने 2047 पर्यंत 'विकसित भारत'चे स्वप्न साकार करण्यासाठी आणि भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ते म्हणाले, स्वतंत्र भारताच्या इतिहासात 2023-24 या आर्थिक वर्षात प्रथमच केव्हीआयसी  उत्पादनांच्या विक्रीने 1.55 लाख कोटी रुपयांचा  टप्पा ओलांडला आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये  1.34 लाख कोटी रुपयांची विक्री झाली होती.  'मोदी सरकार' च्या मागील दहा आर्थिक वर्षांत ग्रामीण भागातील कारागिरांनी बनवलेल्या स्वदेशी खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांची विक्री  2013-14 या आर्थिक वर्षात 31154.20 कोटी रुपये होती, ती  2023-24 या आर्थिक वर्षात 155673.12 कोटी रुपयांच्या सर्वोच्च पातळीपर्यंत वाढली आहे , जी आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी आहे.  2023-24 या आर्थिक वर्षात केव्हीआयसीच्या प्रयत्नांमुळे ग्रामीण भागात 10.17 लाख नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत, परिणामी ग्रामीण भारताची अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे.

केव्हीआयसीच्या अध्यक्षांनी या ऐतिहासिक कामगिरीचे श्रेय पूज्य बापूंची प्रेरणा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हमी आणि देशातील दुर्गम खेड्यांमध्ये काम करणाऱ्या कोट्यवधी कारागिरांच्या अथक परिश्रमाला दिले आहे. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खादीला दिलेल्या समर्थनामुळे  खादी उत्पादनांवरील लोकांचा विश्वास वाढला आहे. युवकांसाठी खादी हे फॅशनचे 'नवीन  स्टेटस सिम्बॉल' बनले आहे. बाजारात खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांची मागणी  झपाट्याने वाढत असून उत्पादन, विक्री आणि रोजगार निर्मितीच्या आकडेवारीवरून ती प्रतिबिंबित होते. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या दहा वर्षांत खादी आणि ग्रामोद्योगाचे उत्पादन वाढवण्यासाठी मोठे बदल करण्यात आले तसेच मोठे  निर्णय घेण्यात आले असून त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत.  देशातील लोकांचा मेक इन इंडिया, 'वोकल फॉर लोकल' आणि 'स्वदेशी उत्पादनांवर विश्वास वाढल्याचे या आकड्यांवरून सिद्ध होते असे ते म्हणाले.

आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये 26,109.08 कोटी रुपये उत्पादन असलेल्या खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनाने आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 314.79 टक्क्यांनी वाढ नोंदवत 108,297.68 कोटी रुपये मूल्य गाठले. तर आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये उत्पादन 95956.67 कोटी रुपये होते.

गेल्या 10 आर्थिक वर्षांत खादी आणि ग्रामोद्योग उत्पादनांनी दरवर्षी विक्रीचे नवे विक्रम प्रस्थापित केले आहेत. 2013-14 या आर्थिक वर्षात 31,154.20 कोटी रुपये असलेली विक्री आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 399.69 टक्क्यांच्या अभूतपूर्व वाढीसह 1,55,673.12 कोटी रुपयांच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक विक्रीवर पोहोचली.

गेल्या दहा वर्षांत खादी कापडाच्या उत्पादनातही अभूतपूर्व वाढ झाली आहे. आर्थिक वर्ष  2013-14 मधील 811.08 कोटी रुपये मूल्याचे खादी कापडाचे उत्पादन 2023-24 या आर्थिक वर्षात 295.28 टक्क्यांच्या उसळीसह 3,206 कोटी रुपयांवर पोहोचले, जी आजपर्यंतची सर्वोत्तम कामगिरी आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये खादी कापडाचे   उत्पादन मूल्य 2915.83 कोटी रुपये होते. 

गेल्या दहा आर्थिक वर्षांत खादी कापडाची मागणीही झपाट्याने वाढली आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये केवळ 1,081.04 कोटी रुपये असलेले विक्रीमूल्य 2023-24 या आर्थिक वर्षात 500.90 टक्क्यांच्या वाढीसह 6,496 कोटी रुपयांवर पोहोचले. 

ग्रामीण भागात जास्तीत जास्त रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे हा खादी व ग्रामोद्योग आयोगाचा मुख्य उद्देश आहे. केव्हीआयसी ने गेल्या दहा वर्षात या क्षेत्रात विक्रमही प्रस्थापित केला आहे. आर्थिक वर्ष 2013-14 मध्ये एकत्रित रोजगार 1.30 कोटी होता जो आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये 43.65 टक्क्यांच्या वाढीसह 1.87 कोटींवर पोहोचला. त्याचप्रमाणे 2013-14 या आर्थिक वर्षात 5.62 लाख नवीन नोकऱ्या निर्माण झाल्या होत्या, तर 2023-24 या आर्थिक वर्षात 80.96 टक्क्यांच्या वाढीसह हे प्रमाण 10.17 लाखांवर पोहोचले आहे. 4.98 लाख ग्रामीण खादी कारागीर (कताईकार आणि विणकर) आणि कामगारांनादेखील खादी कापड निर्मितीत रोजगार मिळाला आहे.

 

* * *

N.Chitale/Sushma/Vasanti/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2031896) Visitor Counter : 129