ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

खरीप हंगामात यंदा कांद्याच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत 27% वाढीचा अंदाज; कर्नाटकात 30% क्षेत्रात लागवड पूर्ण


रब्बी हंगामातील कांदा बाजारात आल्यामुळे वाढलेली उपलब्धता आणि मौसमी पावसाच्या आगमनामुळे साठवणीतील कांदा खराब होण्याच्या शक्यतेत झालेली वाढ यांमुळे कांद्याचे दर स्थिर

खरीपातील बटाट्याच्या लागवडीखालील क्षेत्रात यंदा गेल्या वर्षाच्या तुलनेत सुमारे 12% वाढीचा अंदाज, रब्बीतील बटाट्याचा शीतगृहात असलेला साठा बाजारापेठेतील मागणीसाठी पुरेसा

खरीपात टोमॅटोच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वाढ; चित्तूर आणि कोलार इथे पिकाची स्थिती चांगली, फळ तोडणीला सुरुवात

Posted On: 05 JUL 2024 5:45PM by PIB Mumbai

 

यंदा मौसमी पाऊस योग्य वेळेत चांगला सुरू झाल्यामुळे खरीप हंगामातील पिकांनी जोर धरला आहे. त्यामध्ये कांद्यासह टोमॅटो आणि बटाट्याचाही समावेश आहे. कृषी मंत्रालयाने राज्य सरकारांच्या सहयोगाने केलेल्या मूल्यांकनानुसार, कांदा, टोमॅटो व बटाटा या भाज्यांच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ दिसून आली आहे. यंदाच्या रब्बी हंगामात कांद्याचे उत्पादन गेल्या वर्षीच्या तुलनेत काहीसे कमी झाले असले तरीही देशांतर्गत बाजारपेठेत कांद्याची उपलब्धता पुरेशी आहे. कांद्याचे पीक तीन हंगामात घेतले जाते; मार्च ते मे हा रब्बी हंगाम, सप्टेंबर ते नोव्हेंबर खरीपाचा आणि जानेवारी, फेब्रुवारी म्हणजे उशिराचा खरीप हंगाम. पैकी रब्बी हंगामात एकूण उत्पादनाच्या 70% कांद्याचे उत्पादन होते तर, खरीप व उशिराच्या खरीप हंगामात मिळून 30% उत्पादन होते. रब्बी आणि खरीपाच्या सर्वोच्च उत्पादनाचा काळ यांच्या दरम्यान येणाऱ्या कमी उत्पादनाच्या महिन्यांमध्ये कांद्याचा दर स्थिर ठेवण्यात खरीपाचा कांदा महत्त्वाची भूमिका बजावतो.

या वर्षी खरीप हंगामात 3.61 लाख हेक्टर क्षेत्र कांद्याच्या लागवडीखाली आणण्याचे उद्दीष्ट असून हे गेल्या वर्षीच्या तुलनेत 27% अधिक आहे. कांद्याचे सर्वोच्च उत्पादन घेणारे राज्य असलेल्या कर्नाटकात 1.50 लाख हेक्टर क्षेत्रावर कांद्याच्या लागवडीचे उद्दीष्ट असून त्यातील 30% क्षेत्रावर लागवड पूर्ण झाली आहे. इतर मोठ्या कांदा उत्पादक राज्यांमध्येही लागवडीचे प्रमाण चांगले आहे.

सध्या बाजारात उपलब्ध असलेला कांदा 2024 च्या रब्बी हंगामातील असून यंदा मार्च ते मे या कालावधीत गोळा केलेला आहे. 2024 च्या रब्बी हंगामातील 191लाख टन कांदा निर्यातीवर दरमहा 1 लाख टनाची मर्यादा कायम ठेवल्यास देशांतर्गत बाजारपेठेतील सुमारे 17 लाख टनांची मासिक मागणी पूर्ण करण्यासाठी पुरेसा आहे. रब्बी हंगाम सुरू असताना व त्यानंतर रब्बीचे उत्पादन गोळा करताना यंदा हवामान कोरडे राहिल्यामुळे साठवणीत कांद्याचे नुकसान कमी करण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामात घेतलेला कांदा बाजारात आणल्यामुळे एकीकडे कांद्याची वाढलेली उपलब्धता आणि दुसरीकडे, मौसमी पावसाला सुरुवात झाल्यामुळे हवेतील आर्द्रतेत झालेली वाढ यांमुळे साठवणीतील कांद्याचे नुकसान होण्याची शक्यता वाढली आहे. परिणामी कांद्याचे दर स्थिरावत आहेत.

बटाटा हे रब्बी हंगामातील पीक असले तरी कर्नाटक, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, मेघालय, महाराष्ट्र आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये काही प्रमाणात खरीप हंगामातही बटाट्याचे उत्पादन घेतले जाते. सप्टेंबर ते नोव्हेंबर या काळात  घेतलेला खरीपाचा बटाटा बाजारपेठेतील उपलब्धतेत भर घालतो. यंदा खरीप हंगामात बटाट्याच्या लागवडीखालील क्षेत्रात गेल्या वर्षीच्या तुलनेत 12% वाढ करण्याचे उद्दीष्ट आहे. हिमाचल प्रदेश व उत्तराखंडात जवळपास संपूर्ण नियोजित क्षेत्रावर बटाट्याची लागवड पूर्ण झाली आहे; तर कर्नाटकासह इतर राज्यांनीही बटाट्याच्या लागवडीत चांगली प्रगती केली आहे. कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार, यंदा रब्बीतील 273.2 लाख टन बटाटा शीतगृहात साठवलेला असून तो मागणीसाठी पुरेसा आहे.

कृषी मंत्रालयाने राज्य सरकारांच्या सहयोगाने केलेल्या मूल्यांकनानुसार, खरीपातील टोमॅटो लागवडीखालील क्षेत्र यंदा 2.72 लाख हेक्टर आहे. हे क्षेत्र गेल्या वर्षी 2.67 लाख हेक्टर होते. टोमॅटोचे मोठे उत्पादन घेणाऱ्या आंध्र प्रदेशातील चित्तूर व कर्नाटकातील कोलार या प्रदेशांतील पिकाची स्थिती चांगली आहे. कोलार भागात टोमॅटोच्या फळ तोडणीला सुरुवात झाली असून येत्या काही दिवसांत हा टोमॅटो बाजारात येईल. चित्तूर आणि कोलार भागातील जिल्हास्तरीय फळपिके विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदा टोमॅटोच्या उत्पादनात गेल्या वर्षीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, गुजरात महाराष्ट्र आणि तमिळनाडू या टोमॅटोच्या मुख्य उत्पादक राज्यांमध्ये यंदा खरीप हंगामात टोमॅटोच्या लागवडीखालील क्षेत्रात लक्षणीय वाढ अपेक्षित आहे.

***

S.Kakade/R.Bedekar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2031129) Visitor Counter : 14


Read this release in: English , Urdu , Hindi , Kannada