निती आयोग
नीती आयोगा द्वारे 'संपूर्णता अभियानाचा' प्रारंभ
Posted On:
04 JUL 2024 8:53PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 जुलै 2024
नीती आयोगाने आज सुरु केलेल्या ‘संपूर्णता अभियानामध्ये’ देशभरातील नागरिकांनी लक्षणीय सहभाग नोंदवला. देशातील सर्व 112 आकांक्षी जिल्हे आणि 500 आकांक्षी प्रभागांमध्ये आयोजित कार्यक्रमांमध्ये या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. 4 जुलै ते 30 सप्टेंबर 2024 या कालावधीत म्हणजेच तीन महिने चालणार्या या मोहिमेचे उद्दिष्ट, सर्व आकांक्षी जिल्हे आणि प्रभागांमधील 12 प्रमुख सामाजिक क्षेत्रांच्या निर्देशकांची 100% पूर्तता प्राप्त करणे, हे आहे.
अभियानाच्या पहिल्या दिवशी जम्मू आणि काश्मीर पासून ते अंदमान आणि निकोबार बेटांपर्यंतचे जिल्हा आणि प्रभाग-स्तरीय अधिकारी, पुढल्या फळीतील कार्यकर्ते, समुदाय नेते, स्थानिक कलाकार, विद्यार्थी आणि स्थानिक प्रतिनिधी (प्रभाग प्रमुख/सरपंच) यांच्यासह लाखो लोक अभियानात सहभागी झाले.
आकांक्षी जिल्हे आणि प्रभागांनी, ‘संपूर्णता प्रतिज्ञेच्या’ माध्यमातून, मोहिमेची उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या आणि चिन्हित निर्देशकांच्या पूर्ततेच्या दिशेने प्रगतीचा वेग वाढवण्याच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.
ईशान्येकडील राज्यांनीही या अभियानात उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.
3 महिन्यांच्या ‘संपूर्णता अभियान’ मोहिमेचा एक भाग म्हणून, निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींसह जिल्हा आणि प्रभाग अधिकारी, ग्रामसभा, नुक्कड नाटक, पौष्टिक आहार मेळावा, आरोग्य शिबिरे, ICDS शिबिरे, जनजागृती मार्च आणि रॅली, प्रदर्शने, तसेच सर्व आकांक्षी प्रभाग आणि जिल्ह्यांमध्ये 100% उद्दिष्ट पूर्तीसाठी चिन्हित सुमारे 12 संकल्पनांवर आधारित पोस्टर बनवणे, आणि कविता स्पर्धा यासारखे जनजागृती उपक्रम आयोजित करतील.
मोहिमेचे प्रभावीपणे आयोजन आणि अंमलबजावणी करण्याकरता स्थानिक प्रशासनाला मार्गदर्शन आणि सहाय्य करण्यासाठी नीती आयोगाचे अधिकारी आणि तरुण व्यावसायिक 300 जिल्ह्यांमध्ये अभियानाच्या शुभारंभाच्या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
‘संपूर्णता अभियान’ सर्व आकांक्षी प्रभागांमध्ये चिन्हित पुढील 6 KPI वर लक्ष केंद्रित करेल:
- गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत प्रसूतीपूर्व काळजीसाठी नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांची टक्केवारी.
- प्रभागातील लक्ष्यित लोकसंख्येच्या तुलनेत मधुमेहासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची टक्केवारी
- प्रभागातील लक्ष्यित लोकसंख्येच्या तुलनेत उच्च रक्तदाबासाठी तपासणी केलेल्या व्यक्तींची टक्केवारी.
- ICDS कार्यक्रमांतर्गत नियमितपणे पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी.
- मृदा नमुना संकलन उद्दिष्टाच्या तुलनेत तयार करण्यात आलेल्या मृदा आरोग्य कार्डांची टक्केवारी.
- प्रभागातील एकूण बचत गटांच्या तुलनेत फिरते भांडवल मिळालेल्या बचत गटांची टक्केवारी.
‘संपूर्णता अभियाना’ अंतर्गत आकांक्षी जिल्ह्यांमधील चिन्हित 6 KPI पुढील प्रमाणे:
- गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत प्रसूतीपूर्व काळजी साठी (ANC) नोंदणी केलेल्या गर्भवती महिलांची टक्केवारी.
- ICDS कार्यक्रमांतर्गत नियमितपणे पूरक पोषण आहार घेणाऱ्या गर्भवती महिलांची टक्केवारी.
- लसीकरण पूर्ण झालेल्या बालकांची टक्केवारी (9-11 महिने) (बीसीजी+डीपीटी3+ओपीव्ही3+गोवर 1)
- वाटप केलेल्या मृदा आरोग्य कार्डांची संख्या
- माध्यमिक स्तरावर कार्यरत विद्युत पुरवठा असलेल्या शाळांच्या संख्येची टक्केवारी
- शालेय वर्ष सुरू झाल्यावर एका महिन्याच्या आत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाची पुस्तके देणाऱ्या शाळांच्या संख्येची टक्केवारी
* * *
S.Kane/R.Agashe/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2030853)
Visitor Counter : 135