माहिती आणि प्रसारण मंत्रालय

‘मेरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटी’द्वारा संकलित आणि प्रकाशन विभागाने प्रकाशित केलेल्या ‘गेटवेज् टू द सी – हिस्टॉरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रीजन’ या पुस्तकाचे राज्यपालांच्या हस्ते अनावरण

Posted On: 24 JUN 2024 4:40PM by PIB Mumbai

मुंबई, 24 जून 2024

 

महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते ‘गेटवेज् टू द सी – हिस्टॉरिक पोर्ट्स अँड डॉक्स ऑफ मुंबई रीजन’ या पुस्तकाचे अनावरण मुंबईतील राजभवनात शनिवार 22 जून 2024 रोजी झाले. भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत येणाऱ्या प्रकाशन विभागाने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. नामांकित लेखकांच्या 18 लेखांचे ‘मेरीटाईम मुंबई म्युझियम सोसायटी’ (एम.एम.एम.एस.) ने केलेले संकलन असे या पुस्तकाचे स्वरुप आहे.

पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने आज राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते एम.एम.एम.एस., 17 लेखक आणि दोन संपादकांना सन्मानित करण्यात आले. मुंबईकरांनी या शहराचा प्राचीन सागरी इतिहास जाणून घ्यावा, असे राज्यपालांनी यावेळी सांगितले. प्रकाशन विभाग आणि एशियाटिक सोसायटीच्या सहयोगाने राज भवनातील दरबार हॉलमध्ये पुस्तकाचे सादरीकरण झाले. कार्यक्रमाला निमंत्रितांमध्ये इतिहासकार आणि इतिहासाची आवड असलेल्या जाणकारांचा समावेश होता.

एम.एम.एम.एस.चे संकलन असलेल्या या पुस्तकात मुंबई प्रदेश जसे की सोपारा, वसई, वर्सोवा, माहीम, कल्याण, ठाणे, पनवेल, अलिबाग, चौल, मांदाड आणि जंजिरा भागातील विविध बंदरे, गोदी यांच्या इतिहासाबाबत अधिकृत माहितीयुक्त लेख आहेत. इतिहासकार, संशोधक, सागरी तज्ञ, संवर्धन रचनाकार आणि लेखकांनी 18 प्रकरणांचे लेखन केले आहे. उपरोल्लेखित ऐतिहासिक बंदरे, गोदींच्या इतिहासाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी या पुस्तकाचे प्रकाशन हा मैलाचा दगड ठरला आहे. तसेच, आधुनिक बंदरे व गोदींच्या विकासाची गाथाही या पुस्तकात मांडली आहे. त्यामध्ये माझगाव गोदी, मुंबई बंदर, बॉम्बे गोदी, ससून गोदी आणि भाऊचा धक्का या ठिकाणांचा समावेश आहे.

या कार्यक्रमाला एम.एम.एम.एस.चे अध्यक्ष कॅप्टन के.डी. बहल, व्हाईस अॅडमिरल (निवृत्त) इंद्रशील राव, संपादक डॉ. शेफाली शाह, उपाध्यक्ष अनिता येवले, प्रकाशन विभागाच्या उपसंचालक संगीता गोडबोले यांच्यासह पुस्तकाचे लेखक उपस्थित होते.

 

* * *

PIB Mumbai | S.Kane/R.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2028292) Visitor Counter : 35