पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिन - 2024 निमित्त जम्मू आणि काश्मीरमधील दल सरोवर येथे योग अभ्यासकांना केले संबोधित


"जम्मू आणि काश्मीरच्या लोकांनी योगाबद्दल आज दाखवलेला उत्साह आणि बांधिलकीचे प्रदर्शन कायम लक्षात राहणारे आहे"

"योग नैसर्गिकरित्या जीवनाची एक सहज प्रवृत्ती बनला पाहिजे"

"ध्यानधारणा हे स्वतःत सुधारणा घडवून आणण्याचे एक उत्तम साधन आहे"

"योग समाजासाठी जितका महत्त्वाचा, उपयोगी आणि प्रभावी आहे तितकाच तो स्वतःसाठी देखील आहे"

Posted On: 21 JUN 2024 12:05PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त दल सरोवर येथे श्रीनगरमधील नागरिकांना संबोधित केले.

जम्मू आणि काश्मीरच्या लोकांनी योगाबद्दल आज दाखवलेला उत्साह आणि बांधिलकीचे प्रदर्शन लोकांच्या कायम स्मरणात राहील, असे पंतप्रधान उपस्थित नागरिकांना संबोधित करताना म्हणाले.  पावसाळी हवामानामुळे तापमानात घसरण झाली, परिणामी आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम उशिराने सुरू झाला आणि त्याचे दोन तीन भागात विभाजन करावे लागले, असे असले तरीही लोकांचा योग दिनाचा उत्साह अजिबात कमी झाला नाही, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  स्वत:साठी आणि समाजासाठी योगाभ्यासाला जीवनाची सहज प्रवृत्ती बनवण्याचे महत्त्व पंतप्रधानांनी विशद केले. योग दैनंदिन जीवनाशी जोडला गेला  आणि सोप्या रूपात अभ्यासला गेला तर त्याचे फायदे नक्कीच मिळतात, असे पंतप्रधान म्हणाले.

योगाचा एक भाग असलेली ध्यानधारणा, तिच्या अध्यात्मिक महत्त्वामुळे सामान्य लोकांना अवघड वाटू शकते, मात्र, एकाग्रता आणि एखाद्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करण्याची क्रिया असे म्हटले तर ती सामान्य लोकांना सहज वाटू शकते, असे पंतप्रधान म्हणाले.  ही एकाग्रता आणि लक्ष केंद्रित करणे हे सराव आणि तंत्राने साध्य होते असे ते म्हणाले.  ही मन:स्थिती कमीत कमी मेहनतीत  उत्तम परिणाम देते आणि लक्ष विचलित होणे टाळण्यासाठी मदत करते, हे त्यांनी स्पष्ट केले. शेवटी साध्य होणाऱ्या आध्यात्मिक प्रवासाव्यतिरिक्त, ध्यानधारणा हे आत्म-सुधारणा आणि प्रशिक्षणाचे एक साधन आहे, हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

"योग हा समाजासाठी जितका महत्त्वाचा, उपयोगी आणि प्रभावी आहे तितकाच तो स्वत:साठी देखील आहे", यावर पंतप्रधानांनी भर दिला.  ते म्हणाले की जेव्हा योगाचा समाजाला फायदा होतो तेव्हा संपूर्ण मानवतेला यापासून लाभ मिळतो .  त्यांनी इजिप्तमध्ये देशाच्या प्रतिष्ठित पर्यटन केंद्रांत आयोजित केलेल्या योगाची  छायाचित्रे काढण्याच्या किंवा चित्रफिती तयार करण्याच्या स्पर्धेबद्दलचा व्हिडिओ पाहिल्याची आठवण सांगितली. आणि  या स्पर्धेत भाग घेणाऱ्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली.  "त्याचप्रमाणे, योग आणि पर्यटन हे जम्मू आणि काश्मीरमध्ये रोजगाराचे प्रमुख स्त्रोत बनू शकतात", हे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

संबोधनाचा समारोप करताना, पंतप्रधानांनी  प्रतिकूल हवामानाचा सामना करत श्रीनगरमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन, 2024 च्या कार्यक्रमाला हजेरी लावण्यासाठी मोठ्या संख्येने घराबाहेर पडण्याच्या जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या वचनबद्धतेचे कौतुक केले.

 

 

* * *

S.Kane/S.Mukhedkar/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2027311) Visitor Counter : 56