पंतप्रधान कार्यालय

आंतरराष्ट्रीय योग दिन -2024 निमित्त, जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथे पंतप्रधानांनी उपस्थितांना केले संबोधित


"जगभरात योगासने करणाऱ्यांची संख्या वाढत आहे"

"योगाचे वातावरण, ऊर्जा आणि अनुभव आज जम्मू-काश्मीरमध्ये जाणवतो आहे"

"आज जग नवीन योग अर्थव्यवस्थेचा उदय होताना पाहत आहे"

"जागतिक कल्याणाचे शक्तिशाली माध्यम म्हणून जग योगाकडे पाहत आहे"

"योग आपल्याला भूतकाळाचे ओझे न बाळगता वर्तमानात जगणे शिकण्यासाठी मदत करतो"

"योग समाजात सकारात्मक बदलाच्या नवीन मार्गाची निर्मिती करत आहे"

"आपले कल्याण आपल्या सभोवतालच्या जगाच्या कल्याणात सामावलेले आहे, हे समजून घेण्यास योग मदत करतो"

"योग केवळ एक माध्यम नाही तर एक विज्ञान आहे"

Posted On: 21 JUN 2024 11:35AM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 21 जून 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर इथे 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले.  पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या समारंभाचे नेतृत्व केले आणि योग सत्रात सहभाग घेतला.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योग आणि साधनेची भूमी असलेल्या जम्मू आणि काश्मीरमध्ये उपस्थित राहिल्याबद्दल समाधान व्यक्त केले. "योगाचे वातावरण, ऊर्जा आणि अनुभव आज जम्मू आणि काश्मीरमध्ये जाणवतो", असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त सर्व नागरिकांना आणि जगाच्या विविध भागात योगासने करणाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.

आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्याच्या भारताच्या संयुक्त राष्ट्र संघामधील प्रस्तावाला 177 देशांनी मान्यता दिली  याचे पंतप्रधानांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दहाव्या वर्धापन दिनानिमित्त स्मरण केले.  2015 मध्ये कर्तव्य पथावर 35,000 लोकांनी एकावेळी योगासने करणे आणि गेल्या वर्षी संयुक्त राष्ट्रांच्या मुख्यालयात पंतप्रधानांच्या नेतृत्वाखालील योग कार्यक्रमात 130 हून अधिक देशांनी भाग घेणे, यासारख्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या संदर्भात झालेल्या विक्रमांचा देखील पंतप्रधानांनी उल्लेख केला. भारतातील 100 हून अधिक संस्था तसेच 10 प्रमुख परदेशी संस्थांना आयुष मंत्रालयाने स्थापन केलेल्या योग प्रमाणन मंडळाने मान्यता दिल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.  

जगभरात योग साधना करणाऱ्यांची संख्या वाढत असताना सर्वत्र योगाभ्यासाबाबतचे आकर्षण सतत वाढत असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.  योगाची उपयुक्तता लोक जाणत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.  आपल्या भेटीतील संवादादरम्यान योगाची चर्चा केली नाही असा  एकही जागतिक नेता नसल्याचे त्यांनी सांगितले.  "सर्व जागतिक नेत्यांनी माझ्याशी संवाद साधताना योगाबाबत प्रचंड आस्था दाखवली", असेही त्यांनी सांगितले.  जगाच्या कानाकोपऱ्यात योग हा दैनंदिन जीवनाचा एक भाग बनला आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.  जगभरात योगाच्या वाढत्या स्वीकृतीचा उल्लेख करताना, पंतप्रधानांनी 2015 मध्ये तुर्कमेनिस्तानच्या भेटीदरम्यान योग केंद्राचे उद्घाटन केल्याची आठवण सांगितली  आणि  योग आज देशात अत्यंत लोकप्रिय झाला आहे, असे ते म्हणाले. त्यांनी पुढे माहिती दिली की तुर्कमेनिस्तानमधील राज्य वैद्यकीय विद्यापीठात योग उपचार पद्धतीचा समावेश केला आहे तर सौदी अरेबियाने योग साधनेला शिक्षण पद्धतीचा एक भाग बनवले आहे आणि मंगोलियन योग फाउंडेशन त्यांच्या देशात अनेक योग शाळा चालवत आहे. युरोपमध्ये योगाभ्यासाचा  स्वीकार झाल्याबाबत  माहिती देताना पंतप्रधान म्हणाले की, आतापर्यंत 1.5 कोटी जर्मन नागरिक योगसाधक झाले आहेत.  101 वर्षीय फ्रेंच योग शिक्षिकेला भारताने या वर्षी पद्मश्री पुरस्कार दिल्याची आठवण पंतप्रधानांनी करून दिली. या योग शिक्षिकेने एकदाही भारताला भेट दिली नसली तरीही योगात महत्त्वपूर्ण योगदान दिल्याबद्दल त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  योग हा आज संशोधनाचा विषय बनला आहे आणि योगावर आजपर्यंत अनेक शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत.

गेल्या दहा वर्षात जनमानसातील योगाभ्यासाबद्दलच्या बदलत्या कल्पनांचा उल्लेख करताना पंतप्रधानांनी नव्यानं उदयाला येत असलेल्या योग अर्थव्यवस्थेविषयी भाष्य केले. योग पर्यटनाचे वाढते आकर्षण आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने योगाभ्यास शिकण्यासाठी भारतात येणाऱ्यांची वाढती संख्या यांचा त्यांनी उल्लेख केला. याशिवाय योग रिट्रीट, रिसॉर्ट्स, विमानतळ आणि हॉटेलांमध्ये योगाभ्यासासाठी समर्पित सुविधा कक्ष, योगाभ्यासासाठी अनुरूप वस्त्र आणि उपकरणे, वैयक्तिक योग प्रशिक्षक, योग आणि मनःशांतीसाठी वेगवेगळ्या संस्था करत असलेले उपक्रम याविषयी देखील पंतप्रधानांनी सांगितले. या सर्व गोष्टींमुळे युवावर्गासाठी रोजगार क्षेत्रात नवीन संधी खुल्या झाल्या आहेत  असे ते म्हणाले.

"योग स्वतःसाठी आणि समाजासाठी" या यंदाच्या योग दिनाच्या संकल्पनेविषयी बोलताना पंतप्रधान म्हणाले की आज जग योगाभ्यासाकडे जागतिक कल्याणाचे सशक्त माध्यम म्हणून बघत असून याद्वारे आपण भूतकाळाचे ओझे न घेता वर्तमान काळात जगायला शिकतो. आपले कल्याण हे आपल्या सभोवतालच्या जगाच्या कल्याणाशी निगडित आहे, याची जाणीव योगाभ्यासामुळे होते. ज्यावेळी आपण अंतर्मनातून शांततेचा अनुभव घेतो तेव्हा आपण जगावर देखील त्याचा सकारात्मक परिणाम घडवू शकतो, असे त्यांनी सांगितले.

योगाभ्यासाच्या शास्त्रीय दृष्टिकोनाविषयी बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की एकीकडे माहितीच्या भडिमाराशी जुळवून घेताना आणि आपले लक्ष एके ठिकाणी केंद्रित करताना एकाग्रता हे अतिशय महत्वपूर्ण साधन आहे. “त्यामुळेच आज लष्कारापासून ते क्रीडा क्षेत्रापर्यंत योगाचा सर्वत्र प्रसार झाला आहे. अंतराळवीरांनाही  योग आणि ध्यानधारणेचे प्रशिक्षण दिले जात आहे. कारागृहातील बंदीजनांमध्ये सकारात्मक ऊर्जा वाढावी या उद्देशानं तिथेही योगाभ्यास केला जातो. योगाभ्यासामुळे समाजामध्ये सकारात्मक परिवर्तनाचे नवीन मार्ग तयार होत आहेत”, असे पंतप्रधान म्हणाले.

योगातून मिळालेली प्रेरणा आपल्या प्रयत्नांना सकारात्मक ऊर्जा देईल, असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या, विशेषत: श्रीनगरमधील योगाबद्दलच्या उत्साहाचे कौतुक केले आणि ते म्हणाले की, केंद्रशासित प्रदेशाच्या पर्यटनाला चालना देण्यासाठी योगाभ्यास एक व्यासपीठ उपलब्ध करून देते. लोकांनी या उपक्रमाला दिलेल्या भरभरून प्रतिसाबद्दल विशेषतः  पावसाळी हवामान असूनही मोठ्या प्रमाणावर लोक यात सहभागी झाल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. "जम्मू आणि काश्मीरमध्ये योग कार्यक्रमात  50,000 ते 60,000 लोकांचा सहभाग खूप मोठा आहे", असे ते पुढे म्हणाले. पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप करताना जम्मू आणि काश्मीर मधील लोकांनी दाखवलेला उत्साह आणि सहभागाबद्दल त्यांचे आभार मानले तसेच जगभरातील उत्साही योगप्रेमींना शुभेच्छा दिल्या. .

 

पार्श्वभूमी

21 जून 2024 रोजी 10 व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीनगर मधील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्रात (एसकेआयसीसी) आयोजित आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व केले . यंदाच्या कार्यक्रमाने युवा तन-मनावर  योग साधनेचा होणारा सखोल प्रभाव  अधोरेखित केला. हजारो लोकांना योगसाधनेसाठी एकत्र आणणे तसेच जागतिक स्तरावर आरोग्य आणि निरामयतेला प्रोत्साहन देणे,हे योग दिवस साजरा करण्यामागचे उद्दिष्ट आहे.

2015 या वर्षापासून, पंतप्रधानांनी दिल्लीमधील कर्तव्य पथ, चंडीगड, डेहराडून, रांची, लखनौ, म्हैसूर आणि अगदी न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांचे मुख्यालय अशा विविध महत्वाच्या ठिकाणी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमाचे नेतृत्व केले आहे.

‘योग, स्वतःसाठी आणि समाजासाठी’, ही यंदाची संकल्पना वैयक्तिक आणि सामाजिक स्वास्थ्याला चालना देण्याची दुहेरी भूमिका अधोरेखित करते. हा कार्यक्रम तळागाळातील सहभागाला आणि ग्रामीण भागात योग साधनेच्या प्रसाराला प्रोत्साहन देईल.

 

 

 

 

 

 

* * *

S.Kane/Shraddha/Bhakti/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2027301) Visitor Counter : 37