पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये श्रीनगर येथे ‘युवकांचे सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमाला केले संबोधित
जम्मू आणि काश्मीरमध्ये 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 84 प्रमुख विकास प्रकल्पांची केली पायाभरणी आणि उद्घाटन
1,800 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्पर्धात्मकता सुधारणा प्रकल्पाचे केले उद्घाटन
"सरकारच्या हेतूवर आणि धोरणांवर लोकांचा विश्वास आहे"
"आमचे सरकार लोकांच्या अपेक्षा पूर्ण करून आणि परिणाम साधून आपली कामगिरी दाखवून देते "
"या लोकसभा निवडणुकीत जनतेच्या जनादेशाने स्थैर्याचा मोठा संदेश दिला आहे"
"अटलजींच्या इन्सानियत, जम्हूरियत और कश्मीरियत या स्वप्नाचे आज वास्तवात रूपांतर होताना आपण पाहत आहोत"
"लोकशाहीचा ध्वज उंच फडकवत ठेवण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी मी आलो आहे"
"आज खऱ्या अर्थाने जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय राज्यघटना लागू झाली आहे. कलम 370 च्या भिंती कोसळल्या आहेत"
"हृदय असो वा दिल्ली (दिल या दिल्ली),आम्ही सर्व अंतर दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत"
"तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही तुमच्या मताने जम्मू आणि काश्मीरचे नवीन सरकार निवडाल. तो दिवस लवकरच येईल जेव्हा जम्मू आणि काश्मीर पुन्हा एकदा राज्य म्हणून आपले भविष्य घडवेल"
"हे खोरे हळूहळू स्टार्ट-अप, कौशल्य विकास आणि क्रीडा प्रकारांचे प्रमुख केंद्र म्हणून उदयाला येत आहे"
"जम्मू-काश्मीरची नवी पिढी कायमस्वरूपी शांततेसह जगेल"
Posted On:
20 JUN 2024 10:35PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जून 2024
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जम्मू आणि काश्मीरमधील श्रीनगर येथील शेर-ए-काश्मीर आंतरराष्ट्रीय परिषद केंद्र येथे ‘‘युवकांचे सक्षमीकरण, जम्मू-काश्मीरमध्ये परिवर्तन’ कार्यक्रमाला संबोधित केले. पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीर मध्ये 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी केली , ज्यामध्ये रस्ते, पाणीपुरवठा आणि उच्च शिक्षणातील पायाभूत सुविधा आदी क्षेत्रांचा समावेश आहे. त्यांनी 1,800 कोटी रुपये खर्चाच्या कृषी आणि संलग्न क्षेत्रातील स्पर्धात्मकता सुधारणा प्रकल्पाचे उद्घाटन देखील केले. मोदी यांनी सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या 200 हून अधिक उमेदवारांना नियुक्ती पत्रे वितरित करण्याचा देखील प्रारंभ केला.या प्रसंगी, पंतप्रधानांनी प्रदर्शनाला भेट दिली आणि केंद्रशासित प्रदेशातील यशस्वी युवकांशी संवाद साधला.
उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी त्यांच्या जम्मू आणि काश्मीर भेटीबद्दल आनंद व्यक्त केला आणि यामागची दोन विशिष्ट कारणे सांगितली.ते म्हणाले, “पहिले कारण म्हणजे, आजचा कार्यक्रम जम्मू आणि काश्मीरमधील विकास प्रकल्पांच्या उद्घाटन आणि पायाभरणीशी संबंधित आहे आणि दुसरे म्हणजे,लोकसभा निवडणुकीनंतर जम्मू-काश्मीरमधील लोकांबरोबर झालेली ही पहिली भेट आहे.” जी 7 शिखर परिषदेसाठी नुकत्याच झालेल्या इटलीच्या दौऱ्याची आठवण सांगताना पंतप्रधानांनी सरकारच्या तीन वर्षे कार्यकाळाच्या सातत्याचा परिणाम अधोरेखित केला . यामुळे जगाचा भारताकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे असे ते म्हणाले. भारतीयांच्या सार्वकालीन उच्च आकांक्षा हेच देशाचे सर्वात मोठे सामर्थ्य आहे,असे ते म्हणाले.या उच्च आकांक्षेमुळे सरकारकडून अपेक्षा वाढल्या आहेत आणि या पार्श्वभूमीवर सरकारचा सलग तिसरा कार्यकाळ विशेष आहे कारण महत्वाकांक्षी समाजाचा एकमेव मापदंड म्हणजे कामगिरी असल्याचे ते म्हणाले.“लोकांचा सरकारच्या हेतूंवर आणि धोरणांवर विश्वास आहे”, असे त्यांनी नमूद केले.
पंतप्रधान म्हणाले की, या लोकसभा निवडणुकीत जनतेच्या जनादेशाने स्थैर्याचा मोठा संदेश दिला आहे. त्यांनी गेल्या शतकाच्या शेवटच्या दशकातील अस्थिर सरकारांच्या प्रदीर्घ टप्प्याची आठवण करून दिली , जेव्हा देशात 10 वर्षांत 5 निवडणुका झाल्या , परिणामी विकासाला खीळ बसली. "तो टप्पा मागे सोडून, भारताने आता लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी स्थिर सरकारच्या नवीन टप्प्यात प्रवेश केला आहे." लोकशाहीच्या या बळकटीकरणात जम्मू-काश्मीरमधील जनतेच्या भूमिकेची देखील त्यांनी दखल घेतली. “अटलजींचे इन्सानियत, जम्हूरियत आणि कश्मीरियत हे स्वप्न साकार होताना आपण पाहत आहोत ,” असे पंतप्रधान मोदी म्हणाले. नुकत्याच झालेल्या निवडणुकीतील विक्रमी मतदानाचा उल्लेख करून पंतप्रधानांनी जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या लोकशाहीवरील विश्वासाचे कौतुक केले. “लोकशाहीचा ध्वज उंच फडकवत ठेवण्यासाठी तुम्ही केलेल्या प्रयत्नांबद्दल आभार व्यक्त करण्यासाठी मी आलो आहे”, असे ते म्हणाले.
“जम्मू आणि काश्मीरमधील परिवर्तन हे गेल्या 10 वर्षात सरकारने केलेल्या कामाचा परिणाम आहे”, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. या प्रदेशातील महिला आणि अल्प उत्पन्न गटातील लोकांना त्यांच्या हक्कांपासून वंचित ठेवण्यात आले होते, याकडे लक्ष वेधून पंतप्रधान म्हणाले की, सध्याच्या सरकारने ‘सबका साथ सबका विकास’ या मंत्राचा अवलंब करून संधी उपलब्ध करून देण्याचे आणि त्यांचे हक्क बहाल करण्याचे काम केले आहे. पाकिस्तानातून स्थलांतरित झालेले निर्वासित, वाल्मिकी समुदायातील लोक आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना प्रथमच मतदानाचा हक्क मिळाल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले. वाल्मिकी समुदायाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश व्हावा, विधानसभेत अनुसूचित जातीसाठी आरक्षण, पदरी जमाती, पहारीया जात, गड्डा ब्राह्मण आणि कोळी समाजाचा अनुसूचित जाती प्रवर्गात समावेश व्हावा ही अनेक वर्षांपासूनची प्रलंबित इच्छा पूर्ण केल्याचा उल्लेखही त्यांनी केला.पंचायत, नगर पालिका आणि महानगरपालिका निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करण्यात आल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. भारतीय संविधानाचे सामर्थ्य आणि त्यातल्या गर्भितार्थाच्या महत्वावर प्रकाश टाकताना पंतप्रधान म्हणाले की ते भारतातील 140 कोटी नागरिकांचे हक्क संरक्षित करते आणि राष्ट्र उभारणीत भागीदार बनण्याची संधी देते. भारताच्या संविधानाचा स्वीकार न केल्याबद्दल आणि स्वातंत्र्यानंतर जम्मू-काश्मीरकडे केलेल्या दुर्लक्षाबद्दलही पंतप्रधान मोदींनी खेद व्यक्त केला. “मला आनंद आहे की आज आपण भारतीय संविधान जगत आहोत. संविधानाच्या माध्यमातून आम्ही काश्मीरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी नवीन मार्ग शोधत आहोत,” असे पंतप्रधानांनी अभिमानाने सांगितले. “भारताचे संविधान अखेर जम्मू आणि काश्मीरने खऱ्या अर्थाने स्वीकारले आहे”, “कलम 370 हटवण्यात आले आहे ” असे पंतप्रधान मोदींनी निदर्शनास आणून दिले.
गेल्या 10 वर्षात काश्मीरमध्ये घडलेल्या घडामोडींचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की, काश्मीर खोऱ्यात अलीकडच्या काळात झालेल्या बदलांचे जग साक्षीदार आहे. जी 20 शिखर परिषदेदरम्यान खोऱ्यातील लोकांच्या आदरातिथ्याबद्दल ते त्यांचे कौतुक करत आहे. ते म्हणाले की, खोऱ्यात जी 20 शिखर परिषदेसारख्या जागतिक कार्यक्रमाच्या आयोजनाने काश्मीरच्या जनतेला अभिमान वाटत आहे. लाल चौकात संध्याकाळी उशिरापर्यंत लहान मुले खेळत असल्याचे पाहून प्रत्येक भारतीयाचे मन आनंदाने उचंबळते. त्याचप्रमाणे, खोऱ्यातील गजबजलेल्या बाजारपेठा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर समाधान देतात. या वर्षी मार्चमध्ये दल सरोवराजवळ झालेल्या स्पोर्ट्स कार शोचे स्मरण करून मोदी म्हणाले की, संपूर्ण जगाने तो कार्यक्रम पाहिला, जो खोऱ्यातील प्रगतीची अनुभूती आहे. काश्मीरमधील पर्यटन कसे चर्चेचे ठरले आहे ते त्यांनी नमूद केले आणि उद्याच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमामुळे येथे आणखी पर्यटक आकर्षित होतील असा विश्वास व्यक्त केला. लेफ्टनंट गव्हर्नर सिन्हा यांचा हवाला देत पंतप्रधान म्हणाले की, खोऱ्याला भेट देणाऱ्या 2 कोटींहून अधिक पर्यटकांचा आकडा विक्रमी आहे आणि स्थानिक अर्थव्यवस्थेत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.
“मागील पिढीच्या दुःखातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधण्यासाठी मी पूर्ण समर्पण आणि प्रामाणिकपणाने स्वत:ला समर्पित केले आहे. आम्ही सर्व अंतर दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहोत मग ते हृदयाचे असो किंवा दिल्लीचे (दिल या दिल्ली)”, यावर पंतप्रधान मोदींनी जोर दिला. लोकशाहीची फळे प्रत्येक कुटुंब आणि व्यक्तीपर्यंत पोहोचावीत यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज त्यांनी प्रतिपादित केली. ते म्हणाले की, केंद्रीय मदतीचा प्रत्येक पैसा जम्मू आणि काश्मीरमधील लोकांच्या कल्याणासाठी खर्च केला जातो. “जम्मू आणि काश्मीरच्या लोकांनी त्यांचे प्रतिनिधी निवडणे आणि त्यांच्याद्वारे त्यांच्या समस्या सोडवणे यापेक्षा चांगले काय असू शकते. त्यामुळे विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. तो दिवस दूर नाही जेव्हा तुम्ही तुमच्या स्वत:च्या मताने जम्मू आणि काश्मीरचे नवीन सरकार निवडाल. तो दिवस लवकरच येईल जेव्हा जम्मू आणि काश्मीर पुन्हा एकदा राज्य म्हणून त्याचे भविष्य घडवेल,” असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला.
ज्या प्रकल्पांसाठी पायाभरणी किंवा उद्घाटन करण्यात आले त्या प्रकल्पांचा संदर्भ देताना, पंतप्रधानांनी 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या प्रमुख विकास प्रकल्पांचा आणि 1,800 कोटी रुपयांच्या कृषी आणि संलग्न क्षेत्रातील (जेकेसीआयपी) प्रकल्पाचा उल्लेख केला. सरकारी नोकऱ्यांमध्ये जलद भरती केल्याबद्दल त्यांनी केंद्रशासित प्रशासनाचे कौतुक केले आणि गेल्या 5 वर्षांत सुमारे 40,000 भरती झाल्याची माहिती दिली. जम्मू आणि काश्मीरमधील मोठ्या गुंतवणुकीचा सकारात्मक परिणामही त्यांनी नमूद केला.
काश्मीरमधील प्रगतीचे स्वागत करताना पंतप्रधान म्हणाले की, आज खोऱ्यात रेल्वे कनेक्टिव्हिटी, शिक्षण, आरोग्य पायाभूत सुविधा, वीज आणि पाणी यासह जवळपास प्रत्येक आघाडीवर मोठी विकास कामे होत आहेत. पंतप्रधानमंत्री ग्रामीण सडक योजनेंतर्गत हजारो किलोमीटरचे रस्ते बांधण्यात आल्याचे त्यांनी अधोरेखित केले. नवीन महामार्ग आणि द्रुतगती मार्गांसोबतच खोऱ्याला रेल्वेनेही जोडले जाणार असल्याचे त्यांनी अवगत केले. चिनाब रेल्वे पुलाच्या मनमोहक दृश्याने प्रत्येकाचा ऊर अभिमानाने भरून येतो. उल्लेखनीय म्हणजे, उत्तर काश्मीरमधील गुरेझ व्हॅलीत प्रथमच ग्रीड कनेक्टिव्हिटी उपलब्ध झाली. आज खोऱ्यात शेतीपासून बागायतीपर्यंत आणि क्रीडा क्षेत्रापासून स्टार्ट अप्सपर्यंत प्रत्येक क्षेत्रात संधी असल्याचा पुनरुच्चार पंतप्रधान मोदींनी केला.
गेल्या 10 वर्षात काश्मीरमध्ये झालेल्या विकासाची प्रशंसा करताना पंतप्रधान म्हणाले की, काश्मीर खोरे हळूहळू स्टार्ट-अप, कौशल्य विकास आणि क्रीडा, याचे प्रमुख केंद्र म्हणून उदयाला येत आहे. त्यांनी निदर्शनास आणून दिले की खोऱ्यातील जवळजवळ 70 टक्के कृषी क्षेत्रांमध्ये स्टार्ट-अप्सचा समावेश आहे, तसेच गेल्या काही वर्षांत खोऱ्यात 50 हून अधिक पदवी महाविद्यालये सुरू झाली आहेत. “पॉलिटेक्निकमधील जागा वाढल्या आहेत आणि नवीन कौशल्ये शिकण्याच्या संधी निर्माण झाल्या आहेत. आयआयटी, आयआयएम आणि एम्स स्थापन होत आहेत आणि अनेक नवीन वैद्यकीय महाविद्यालये उभारली गेली आहेत,” ते पुढे म्हणाले. पर्यटन आणि आदरातिथ्य क्षेत्रातही स्थानिक पातळीवर कौशल्ये विकसित केली जात आहेत, असे ते म्हणाले. पंतप्रधानांनी टूरिस्ट गाईड साठी ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू करण्याची आणि शाळा-कॉलेज-विद्यापीठांमध्ये युवा पर्यटन क्लब स्थापन करण्याची सूचनाही केली... ही सर्व कामे आज काश्मीरमध्ये होत आहेत, ते म्हणाले.
जम्मू-काश्मीरच्या नारीशक्तीवर होत असलेला विकास कामाचा सकारात्मक परिणाम पंतप्रधानांनी अधोरेखित केला. त्यांनी स्थानिक बचत गटांच्या महिलांना पर्यटन आणि आयटी क्षेत्रातील प्रशिक्षण देण्याचा उल्लेख केला.
दोन दिवसांपूर्वी सुरु झालेल्या कृषी सखी कार्यक्रमाबद्दल बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरमधील 1200 हून अधिक महिला कृषी सखी म्हणून काम करत आहेत. त्यांनी नमो ड्रोन दीदी कार्यक्रमाचाही उल्लेख केला आणि सांगितले की या योजनेअंतर्गत जम्मू आणि काश्मीरच्या लेकींना प्रशिक्षण दिले जात आहे. "महिलांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांना उपजीविकेच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी सरकार हे प्रयत्न करत आहे", ते पुढे म्हणाले.
"पर्यटन आणि क्रीडा, या दोन क्षेत्रांमध्ये जम्मू आणि काश्मीरची क्षमता लक्षात घेऊन, पंतप्रधान म्हणाले की, या क्षेत्रांमध्ये भारत एक प्रमुख जागतिक महासत्ता बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. जम्मू आणि काश्मीरमधील प्रत्येक जिल्ह्यात उत्कृष्ट क्रीडा पायाभूत सुविधांच्या विकासावर त्यांनी प्रकाश टाकला आणि सुमारे 100 खेलो इंडिया केंद्रे उभारल्याचा उल्लेख केला. जम्मू आणि काश्मीरमधील सुमारे 4,500 तरुणांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. हिवाळी क्रीडा प्रकारांचा उल्लेख करत पंतप्रधान मोदी म्हणाले की, जम्मू आणि काश्मीर भारताची हिवाळी क्रीडा स्पर्धांची राजधानी बनत आहे. यंदाच्या फेब्रुवारी महिन्यात नुकत्याच पार पडलेल्या चौथ्या खेलो इंडिया हिवाळी क्रीडा स्पर्धांचा त्यांनी उल्लेख केला, ज्यामध्ये देशभरातील 800 हून अधिक खेळाडूंचा सहभाग होता. "अशा कार्यक्रमांमुळे भविष्यात या ठिकाणी आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आयोजित करण्याच्या नव्या संधी निर्माण होतील", ते म्हणाले.
विकासाला विरोध करणाऱ्या, शांतता आणि मानवतेच्या शत्रूंपासून जम्मू-काश्मीरच्या जनतेने सावध राहावे, असे पंतप्रधान म्हणाले. “जम्मू-काश्मीरचा विकास थांबवण्याचा, येथे शांतता प्रस्थापित होऊ नये यासाठीचा त्यांचा हा शेवटचा प्रयत्न आहे,” पंतप्रधान मोदी यांनी ठामपणे सांगितले. सरकारने अलीकडील दहशतवादी घटनांची गंभीर दखल घेतली असून, केंद्रीय गृहमंत्र्यांनी जम्मू आणि काश्मीर प्रशासनाच्या सहकार्याने सर्व व्यवस्थांचा आढावा घेतला आहे, असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरच्या शत्रूंना धडा शिकवण्यासाठी कोणतीही कसर सोडली जाणार नाही याची मी तुम्हाला खात्री देतो, असा पुनरुच्चार पंतप्रधानांनी केला. जम्मू-काश्मीरची नवी पिढी कायम शांततेत जगेल. जम्मू-काश्मीरने निवडलेला प्रगतीचा मार्ग आम्ही बळकट करू.” ते म्हणाले. आजच्या विकास प्रकल्पांसाठी जम्मू आणि काश्मीरमधील जनतेचे अभिनंदन करून पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला. जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा आणि केंद्रीय आयुष राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) प्रतापराव जाधव यावेळी उपस्थित होते.
पार्श्वभूमी:
‘एम्पॉवरिंग युथ, ट्रान्सफॉर्मिंग जम्मू अँड काश्मीर’, अर्थात, ’तरुणांचे सक्षमीकरण, जम्मू काश्मीरचा कायापालट’, हा कार्यक्रम या प्रदेशासाठी महत्त्वाचा असून, तो प्रगती दर्शवतो आणि यश मिळवणाऱ्या युवा पिढीला प्रोत्साहन देतो.
पंतप्रधानांनी 1,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या 84 मोठ्या विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन केले. उद्घाटन झालेल्या प्रकल्पांमध्ये रस्ते पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा योजना आणि उच्च शिक्षणातील पायाभूत सुविधा इत्यादी प्रकल्पांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त, पंतप्रधानांनी चेनानी-पटनीटॉप-नाश्री विभागातील सुधारणा, औद्योगिक वसाहतींचा विकास आणि 6 सरकारी पदवी महाविद्यालयांचे बांधकाम, या आणि इतर प्रकल्पांची पायाभरणी केली.
पंतप्रधानांनी 1,800 कोटी रुपयांच्या कृषी आणि संलग्न क्षेत्रांमधील स्पर्धात्मकता सुधारणा (JKCIP) प्रकल्पाचा शुभारंभ केला. हा प्रकल्प जम्मू आणि काश्मीरच्या 20 जिल्ह्यांमधील 90 प्रभागांमध्ये राबवला जाईल आणि 300,000 कुटुंबांमधील 15 लाख लाभार्थींपर्यंत तो पोहोचेल. या प्रकल्पांची पायाभरणी/उद्घाटन आणि शुभारंभ तरुणांना सक्षम बनवेल आणि जम्मू आणि काश्मीरमधील पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करेल.
सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या 2000 हून अधिक व्यक्तींना पंतप्रधानांनी नियुक्ती पत्रांचे वाटपही केले.
S.Patil/Sushama/Vasanti/Rajashree/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2027252)
Visitor Counter : 63
Read this release in:
Telugu
,
Khasi
,
English
,
Urdu
,
Hindi
,
Hindi_MP
,
Assamese
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Kannada
,
Malayalam