पंतप्रधान कार्यालय

जी - 7 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्यात द्विपक्षीय बैठकीचे आयोजन 

Posted On: 14 JUN 2024 11:50PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज इटलीमध्ये अपुलिया येथे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांची भेट घेतली. पंतप्रधान पदावर सलग तिसऱ्यांदा नियुक्त झाल्याबद्दल इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांनी पंतप्रधान मोदी यांचे अभिनंदन केले. जी-7 परिषदेत सहभागी होण्यासाठी निमंत्रित केल्याबद्दल पंतप्रधानांनी मेलोनी यांचे आभार मानले आणि परिषद यशस्वीपणे संपन्न झाल्याबद्दल प्रशंसा केली. 

दोन्ही नेत्यांनी परस्पर देशांमधील नियमित उच्चस्तरीय राजकीय संवादाबद्दल समाधान व्यक्त केले आणि भारत-इटली धोरणात्मक भागीदारीच्या प्रगतीचा आढावा घेतला. दोन्ही देशांमधील वाढत्या व्यापार आणि आर्थिक सहकार्याबद्दल आनंद व्यक्त करत, दोन्ही नेत्यांनी स्वच्छ ऊर्जा, उत्पादन, अंतराळ, विज्ञान आणि तंत्रज्ञान, दूरसंचार, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि महत्वपूर्ण अशा खनिज क्षेत्रातील व्यावसायिक संबंधांचा विस्तार करण्याची गरज व्यक्त केली, जेणेकरून लवचिक पुरवठा साखळी निर्माण होईल. या संदर्भात, नुकत्याच झालेल्या औद्योगिक मालमत्ता अधिकार (IPR) सामंजस्य कराराचेही त्यांनी स्वागत केले, हा करार पेटंट, डिझाईन्स आणि ट्रेडमार्क बाबतच्या सहकार्यासाठी चौकट प्रदान करणारा आहे.

दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याच्या मुद्द्यांवर चर्चा केली आणि संरक्षण औद्योगिक क्षेत्रातील सहकार्य आणखी वाढेल अशी आशा व्यक्त केली. इटालियन विमानवाहू जहाज आयटीएस कैवूर आणि प्रशिक्षण जहाज आयटीएस वेस्पुची यांच्या आगामी भारत भेटीचे त्यांनी स्वागत केले. दुसर्‍या महायुद्धादरम्यान, इटलीने राबवलेल्या मोहिमेत भारतीय सैन्याने दिलेल्या योगदानाची दखल घेतल्याबद्दल पंतप्रधान मोदी यांनी इटली सरकारचे आभार मानले, आणि भारत, इटलीमध्ये माँटोन येथील यशवंत घाडगे स्मारकाचे नूतनीकरण करणार असल्याची माहिती दिली.

जागतिक जैव-इंधन गटामधील समन्वयाचा उल्लेख करत, दोन्ही नेत्यांनी ऊर्जा संक्रमण सहकार्याबाबतच्या करारावरील स्वाक्षरीचे स्वागत केले, जो स्वच्छ आणि हरित ऊर्जा क्षेत्रातील द्विपक्षीय सहकार्याला चालना देईल. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील संयुक्त संशोधन आणि विकासाला चालना देण्यासाठी 2025-27 या काळात सहकार्याबाबतच्या नवीन अंमलबजावणी कार्यक्रमाबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

इटलीमध्ये दीर्घ काळापासून चालत आलेल्या इंडोलॉजिकल अभ्यासाच्या परंपरेमुळे, दोन्ही देशांच्या नागरिकांमधील परस्पर संवाद दृढ झाला असून, मिलान विद्यापीठात भारताबाबतच्या अभ्यासावरील पहिल्या ICCR विभागाच्या स्थापनेमुळे तो आणखी वाढणार आहे. दोन्ही नेत्यांनी परस्पर देशांमधील स्थलांतर आणि प्रवासाबाबतच्या कराराची लवकर अंमलबजावणी होण्याची गरज व्यक्त केली, ज्यामुळे दोन्ही देशांमधील व्यावसायिक, कुशल आणि अर्ध-कुशल कामगार, विद्यार्थी आणि संशोधकांना दोन्ही देशांमध्ये सहज प्रवास करता येईल.

हिंद-प्रशांत महासागर कृती कार्यक्रमाच्या चौकटी अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या संयुक्त उपक्रमांची दोन्ही नेत्यांना प्रतीक्षा असून, यामुळे मुक्त आणि खुल्या प्रशांत-महासागर क्षेत्राच्या सामायिक उद्दिष्टाची पूर्तता होईल. दोन्ही नेत्यांनी महत्वाच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही चर्चा केली, आणि भारत-मध्य-पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉरसह जागतिक मंचावर आणि बहुपक्षीय उपक्रमांमधील सहकार्य दृढ करण्यावर सहमती दर्शवली.   

***

M.Pange/R.Agashe/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2025519) Visitor Counter : 26