शिक्षण मंत्रालय

धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचा पदभार स्वीकारला


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 21 व्या शतकातील ज्ञानाधारीत अर्थव्यवस्था म्हणून भारत साकार होईल -केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान

Posted On: 13 JUN 2024 7:06PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 13 जून 2024


केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज मंत्रालयाच्या नवी दिल्लीतील शास्त्री भवनमधील कार्यालयात आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. प्रधान यांचे शिक्षण मंत्रालयात आगमन झाल्यावर उच्च शिक्षण विभागाचे सचिव के.संजय मूर्ती, शालेय शिक्षण आणि साक्षरता विभागाचे सचिव संजय कुमार तसेच मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्यावरचा विश्वास कायम ठेवत  विभागाची जबाबदारी सोपवल्याबद्दल प्रधान यांनी पंतप्रधानांचे  आभार मानले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीला नवा आयाम  देण्यासाठी, भविष्यवेधी शिक्षण क्षेत्राची जडणघडण, नागरिकांना सक्षम करण्याबरोबरच  देशाला 21 व्या शतकातील ज्ञानाधारीत अर्थव्यवस्था म्हणून ओळख मिळवून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व आणि मार्गदर्शन लाभावे यासाठी आपण आणि आपला चमू उत्सुक असल्याचे ते म्हणाले.

यावेळी शिक्षणमंत्री धर्मेद्र प्रधान यांच्यासोबत शिक्षण राज्यमंत्री जयंत चौधरी आणि डॉ. सुकांत मजुमदार हे देखील उपस्थित होते. या दोघांनाही मिळालेल्या या नव्या जबाबदारीबद्दल प्रधान यांनी त्यांचे अभिनंदनही केले. देशाला शिक्षण, कौशल्ये, नवोन्मेष आणि संशोधनाचे जागतिक केंद्र बनवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न प्रत्यक्षात साकारण्यासाठी आपण या दोन्ही सहकाऱ्यांसोबत काम करण्यास उत्सुक असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

धर्मेंद्र प्रधान हे लोकसभेत ओदिशातील संबलपूर लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. प्रधान यांनी 2014 मध्ये पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाचे राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यानंतर  2017 पासून त्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू तसेच पोलाद मंत्रालयांची जबाबदारीही सांभाळली होती.

जुलै 2021 मध्ये धर्मेद्र प्रधान यांच्यावर शिक्षण मंत्रालयाची तसेच कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाची जबाबदारी देण्यात आली. तेव्हापासून देशात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या अंमलबजावणीचे काम त्यांनी आघाडीवर राहून केले आहे. आपल्या कार्यकाळात त्यांनी देशाच्या शैक्षणिक परिसंस्थेत सकारात्मक परिणाम  घडवून आणणारे अनेक प्रागतिक उपक्रमही राबवले आहेत.

N.Chitale/T.Pawar/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 

 



(Release ID: 2025151) Visitor Counter : 42