माहिती आणि प्रसारण मंत्रालय

मिफ्फचा देशभरात डंका : मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट चित्रपटांची दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि पुणे येथे पर्वणी!

Posted On: 12 JUN 2024 6:40PM by PIB Mumbai

मुंबई, 12 जून 2024

18 वा मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (मिफ्फ) मुंबईसह अन्य शहरांमध्ये आपली व्याप्ती वाढवत आहे.यावेळचा मिफ्फ मुंबई बरोबरच पहिल्यांदाच दिल्ली,कोलकाता,चेन्नई आणि पुणे या  शहरांमध्ये देखील पाहता येणार आहे ज्यात जगभरातील सर्वोत्कृष्ट माहितीपट,लघुपट आणि ॲनिमेशन फिल्म्स सारख्या नॉन-फिचर फिल्म प्रदर्शित केल्या जातील.

 

या महोत्सवाचा उद्‌घाटनपर सोहोळा 15 जून रोजी असून 21 जून 2024 पर्यंत चालणाऱ्या या महोत्सवाचे आयोजन मुंबईतील पेडर रोड येथील राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ चित्रपट विभागाच्या संकुलात करण्यात आले आहे. दिल्लीतील चित्रपट रसिकांसाठी, सिरी फोर्ट ऑडिटोरियम 1, 2 आणि 3 मध्ये 16 जून ते 20 जून या कालावधीत निवडक चित्रपटांचे थेट प्रदर्शन केले जाईल. कोलकातामधील चित्रपटप्रेमींना  प्रतिष्ठित सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआय) मध्ये ही अनुभूती घेता येईल तर चेन्नई, एनएफडीसी च्या टागोर फिल्म सेंटरमध्ये चित्रपटांचे प्रदर्शन आयोजित करेल. याव्यतिरिक्त, पुण्यातील प्रदर्शन भारतीय राष्ट्रीय अभिलेखागाराच्या (नॅशनल आर्काइव्ह ऑफ इंडिया) संकुलात आयोजित केले जाईल. या ठिकाणी असणारे नोंदणी डेस्क चित्रपट प्रेमी अभ्यागतांची नोंदणी सुलभ करतील. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य या तत्त्वावर आसनव्यवस्था असेल. 15 जून रोजी दुपारी 2.30 वाजता बिली आणि मॉली: ॲन ऑटर लव्ह स्टोरी हा उद्‌घाटनपर चित्रपट सर्व ठिकाणी एकाच वेळी प्रदर्शित केला जाईल.

 

 

 

 

 

 

 

 

चार शहरांमध्ये प्रदर्शित होणाऱ्या 18 व्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे वेळापत्रक पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

दिल्ली

कोलकाता

चेन्नई

पुणे

जास्तीतजास्त भारतीय प्रेक्षकांना अधिक दर्जेदार माहितीपट पाहण्याची संधी उपलब्ध करण्याच्या एनएफडीसी च्या बांधिलकीमुळे हे नाविन्यपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक केंद्रांमध्ये मिफ्फ प्रदर्शित करून, देशभरातील सिनेरसिकांद्वारे माहितीपटांना अधिकाधिक दाद मिळावी हा या महोत्सवाचा उद्देश आहे.

माहितीपट आपल्या सभोवतालच्या जगाबद्दल समर्थ आणि वैचारिक दृष्टिकोन देतात. महोत्सवाची व्याप्ती वाढवून, एनएफडीसी अर्थपूर्ण विचारमंथनाच्या नांदीची आणि भारताच्या कानाकोपऱ्यात या महत्त्वाच्या कला प्रकाराची अभिरुची निर्माण करण्याची अपेक्षा करते. मिफ्फ हा भारतातील माहितीपट निर्मितीत दीर्घकाळ अग्रेसर आहे. महोत्सवाची ही व्याप्ती केवळ महोत्सवाचा मंच मजबूत करत नाही तर दिल्ली, कोलकाता, पुणे आणि चेन्नई येथील प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर विविध प्रकारच्या माहितीपटांचा अनुभव घेण्याची अनोखी संधी देखील प्रदान करते.

जागतिक चित्रपटसृष्टीच्या उत्कृष्ट सिनेमाचा उत्सव मिफ्फ हा दक्षिण आशियातील सर्वात भव्य आणि सर्वात जुना नॉन-फिचर फिल्म महोत्सव म्हणून ओळखला जातो. 1990 पासून द्विवार्षिक आयोजन होत असलेल्या मिफ्फ ने आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय दोन्ही स्तरावर माहितीपट, लघुपट आणि ॲनिमेशन प्रकारात असामान्य कलेचे  प्रदर्शन करण्यासाठी सातत्याने मंच उपलब्ध करून दिला आहे.

PIB Team MIFF | N.Chitale/V.Joshi /P.Malandkar | 05

 

 

****

 

PIB TEAM MIFF/ Nikita/ Dhanlakshmi P/Priti | 05

 

Follow us on social media: @PIBMumbai Image result for facebook icon /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com

 

 



(Release ID: 2024811) Visitor Counter : 64