भारतीय निवडणूक आयोग

हिंसा-मुक्त वातावरणात पार पडलेले मतदान निवडणूक आयोगाने राष्ट्रपित्याला केले समर्पित

Posted On: 06 JUN 2024 8:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 जून 2024

 

निवडणूक आयोगाने 18 व्या लोकसभेसाठी निवडून आलेल्या सदस्यांची नावे राष्ट्रपतींना सुपूर्द केल्यानंतर आज संध्याकाळी राजघाट येथे राष्ट्रपित्याला आदरांजली वाहिली. पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघातून विधानपरिषदेच्या द्विवार्षिक/पोटनिवडणुकीमुळे आदर्श आचारसंहिता लागू असलेल्या कर्नाटक, महाराष्ट्र आणि तेलंगणातील पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ वगळता अन्य ठिकाणी आदर्श आचारसंहिता तात्काळ प्रभावाने संपुष्टात आली आहे.

राजघाटावर राष्ट्रपित्याला आदरांजली अर्पण केल्यानंतर आयोगाचे निवेदन:

देशाने आपल्यावर सोपवलेल्या 18 व्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पवित्र कार्याच्या समाप्तीनंतर राष्ट्रपित्याला आदरांजली वाहण्यासाठी आम्ही येथे उभे आहोत. भारतीय जनतेच्या आकांक्षाना जवळजवळ अहिंसक पद्धतीने उत्प्रेरित करून आम्ही अतिशय विनम्रतेने येथे उभे आहोत.

"लोकशाहीत हिंसेला जागा नाही" या पारदर्शक वचनबध्दतेने 16 मार्च 2024 रोजी 18व्या लोकसभा निवडणुकीची घोषणा करण्यात आली होती. निवडणूक प्रक्रियेला हिंसेपासून मुक्त ठेवण्याच्या या प्रतिज्ञेमागे राष्ट्रपिता महात्मा गांधी आमची प्रेरणा होते.  त्यांनी मानवांमधील समानता आणि सर्वांसाठी लोकशाही अधिकारांचे समर्थन केले.

मतदान केंद्रांवरील लांब रांगांमध्ये दिसून आलेल्या सणासुदीचा  उत्साह आणि आपले भवितव्य घडवण्याचा निश्चय महात्मा गांधींची जनतेने जतन केलेली मूल्ये आणि भारताच्या नागरी वारशाचा दाखला होता.

आयोगाने, अत्यंत मनःपूर्वक, सर्वोत्तम प्रयत्न करत प्रत्येक सामान्य भारतीय नागरिकाला आपापला मतदानाचा अधिकार बजावता येईल, त्यात कोणत्याही प्रकारे बाधा येणार नाही, कुठल्याही प्रकारच्या हिंसेचा वापर होणार नाही याची पुरेपूर काळजी घेत जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीतील निवडणूक प्रक्रिया सिद्धीस नेली.

जम्मू कश्मिर व मणिपूरसह भारतातील सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी शांततेत मतदान प्रक्रिया पूर्ण करत आपापल्या परिपक्व वागणुकीचे दर्शन घडवून भविष्यातील निवडणुकांसाठी उत्तम उदाहरण निर्माण केले आहे.

यंदा 76 व्या वर्षात भारतीय निवडणूक आयोग देशसेवेसाठी तत्पर असल्याच्या आपल्या प्रतिज्ञेचा पुनरुच्चार करत भविष्यातील वाटचाल करत राहील. अफवा व निराधार संशय उपस्थित करून निवडणूक प्रक्रियेत बाधा आणण्याचे व पर्यायाने देशातील शांतता भंग करण्याचे सर्व प्रयत्न आम्ही यशस्वीरित्या खंडित केले. लोकशाही व्यवस्थेप्रती श्रद्धा बाळगणाऱ्या सामान्य नागरिकाच्या ‘इच्छा’ आणि ‘शहाणपणा’चा हा विजय आहे. मुक्त वातावरणात, न्याय्य पद्धतीने सर्वसमावेशी निवडणुका घेऊन  आमची नैतिक आणि कायदेशीर जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही कायमच वचनबद्ध राहू. 

जय हिंद!

 

* * *

S.Kane/Vasanti/Reshma/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2023320) Visitor Counter : 57