कोळसा मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

देशात विजेची मागणी प्रचंड वाढलेली असली, तर औष्णिक प्रकल्पांमध्ये पुरेसा कोळसा साठा उपलब्ध

Posted On: 01 JUN 2024 11:49AM by PIB Mumbai

 

देशात विजेची मागणी प्रचंड वाढलेली असतानाही, औष्णिक वीज प्रकल्पातील कोळशाचा सद्यस्थितीतला साठा 45 मेट्रिक टनांपेक्षा जास्त असल्याचे कोळसा मंत्रालयाने म्हटले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा साठा 30 टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे मंत्रालयाने कळवले आहे. देशाची 19 दिवसांची गरज भागविण्यासाठी हा साठा पुरेसा असेल. मे 2024 महिन्यात औष्णिक वीज केंद्रात दररोज सरासरी केवळ 10,000 टन कोळसा वापरात आला. कोळशाचा सुरळीत आणि पुरेसा पुरवठा करता यावा यासाठी वाहतूक आणि दळणवळ व्यवस्थेची सुनिश्चिती केल्यामुळे हे शक्य झाल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. ऊर्जा मंत्रालय, कोळसा मंत्रालय, रेल्वे मंत्रालय आणि वीज निर्मिती कंपन्यांच्या प्रतिनिधींचा समावेश असलेला उपगट नियोजनबद्धरित्या कार्यरत असून, पुरवठा साखळी कार्यक्षम राहावी यासाठीच्या प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कोळशाच्या उत्पादनात 8 टक्क्यांपेक्षा जास्त वाढ झाली आहे. खाणीतील कोळशाचा साठा 100 मेट्रिक टनांपेक्षा जास्त असल्यामुळे वीज उत्पादन क्षेत्राला पुरेसा कोळसा उपलब्ध करून देता आला आहे. कोळशाच्या वाहतूकीसाठी रेल्वे मंत्रालयाने रेल्वे मालगाड्यांच्या दैनंदिन उपलब्धतेत सरासरी 9 टक्के वाढ सुनिश्चित केली आहे. पारंपारिकरित्या पारादीप बंदरातूनच कोळशाची वाहतूक केली जात आहे, त्यामुळे सागरी मालवाहतूकीद्वारे कोळसा पुरवठा करण्याचे प्रमाणही लक्षणीयरित्या वाढले आहे. कोळशाच्या वाहतूक आणि दळवळणीय धोरणानुसार योग्य समन्वय राखत धामरा आणि गंगावरण बंदरातूनही कोळशाची वाहतूक केली जात आहे. रेल्वे मालवाहतूक व्यवस्थेत पायाभूत सुविधांची वाढ केली गेल्यामुळे सोन नगर ते दादरी पर्यंत रेल्वे मालगाड्यांची वाहतूक जलदरित्या व्हायला मोठी मदत झाली आहे. त्यामुळे कोळसा मालवाहतूकीसाठी लागणाऱ्या कालावधीत 100 टक्क्यांपेक्षा जास्त सुधारणा दिसून आली आहे. पावसाच्या हंगामात औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये कोळशाचा पुरेसा साठा उपलब्ध असायला हवा यासाठी कोळसा मंत्रालय पूर्णतः सज्ज असल्याचे मंत्रायलाने म्हटले आहे. येत्या 1 जुलै 2024 रोजी औष्णिक विद्युत प्रकल्पांमध्ये 42 मेट्रीक टन कोळसा उपलब्ध होईल, असे मंत्रायलायाने कळवले आहे.

***

S.Pophale/T.Pawar/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2022427) Visitor Counter : 132