संरक्षण मंत्रालय

रेमल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदलाची सुसज्जता

Posted On: 26 MAY 2024 11:30AM by PIB Mumbai

 

रेमल चक्रीवादळाच्या संभाव्य परिणामांना तोंड देण्यासाठी भारतीय नौदल प्रमाणित कार्यप्रणालीचा अवलंब  करून  त्वरित विश्वासार्ह मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण प्रतिसादासाठीच्या प्रारंभिक कृतीसाठी सुसज्ज आहे. 26/27 मे 2024 च्या मध्यरात्री चक्रीवादळ किनारपट्टी ओलांडण्याची शक्यता आहे. नौदल मुख्यालयाकडून परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून पूर्व नौदल कमांड मुख्यालयाकडून समावेशक प्रारंभिक उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

रेमल चक्रीवादळाचे तीव्र चक्रीवादळात रूपांतर होण्याची शक्यता असून त्याच्या परिणाम स्वरूप सागर बेट, पश्चिम बंगाल आणि बांगलादेशच्या खेपूपारा  किनारपट्टीवर धडकण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. याचा सामना करण्यासाठी भारतीय नौदलानं बाधित लोकसंख्येच्या सुरक्षा आणि कल्याणाच्या हेतूने  मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण प्रतिसादासह त्वरित वैद्यकीय सामग्रीचा पुरवठा करता यावा या दृष्टीने दोन नौका सज्ज ठेवल्या आहेत.  याव्यतिरिक्त, भारतीय नौदलाची  महत्वपूर्ण  सी किंग आणि चेतक हेलिकॉप्टर्ससह गार्नियर विमानेही, त्वरित प्रतिसादासाठी सज्ज ठेवली आहेत

त्वरित मदतीसाठी  कोलकात्यात विशेष पाणबुडी पथके आवश्यक उपकरणांसह सज्ज ठेवण्यात आली आहेत. तसेच आवश्यकता भासल्यास त्वरित प्रतिसादासाठी विशाखापट्टणम इथेही काही पाणबुडी पथके सज्ज आहेत. दोन पूर निवारण सहाय्य्यता पथके (FRTs) मानवतावादी सहाय्य आणि आपत्ती निवारण प्रतिसादासाठी  वैद्यकीय सामग्रीसह कोलकात्यात सुसज्ज ठेवण्यात आली आहेत. याव्यतिरिक्त विशाखापट्टणम आणि चिल्का येथील दोन  पूर निवारण सहाय्य्यता पथके त्वरित प्रतिसादासाठी सज्ज ठेवण्यात आली आहेत.

रेमल चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारतीय नौदल दक्ष असून  त्वरित आणि प्रभावी सहाय्य करण्याच्या दृष्टीने संभाव्य परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

***

S.Kane/S.Naik/P.Kor

 

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2021687) Visitor Counter : 59