नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
नेदरलँड मधील जागतिक हायड्रोजन परिषद 2024 मध्ये इंडिया पॅव्हेलियनच्या माध्यमातून राष्ट्रीय हरित हायड्रोजन मोहिमेचे प्रदर्शन
Posted On:
14 MAY 2024 4:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 14 मे 2024
नेदरलँड्स येथील रॉटरडॅम येथे 13 ते 15 मे 2024 या कालावधीत आयोजित जागतिक हायड्रोजन परिषद 2024 मध्ये भारताने प्रथमच स्वतःचे दालन उभारले आहे. भारत सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने स्थापन केलेला इंडिया पॅव्हेलियन शिखर परिषदेतील सर्वात मोठ्या दालनापैकी एक आहे आणि त्याचे उद्घाटन 12 मे 2024 रोजी नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सचिव भूपिंदर एस. भल्ला यांच्या हस्ते करण्यात आले.
जागतिक हायड्रोजन परिषद हा जागतिक ग्रीन हायड्रोजन परिसंस्थेतील एक प्रतिष्ठित कार्यक्रम आहे. या शिखर परिषदेला जगभरातून सुमारे 15,000 प्रतिनिधी उपस्थित राहणे अपेक्षित आहे. परिषदेतील इंडिया पॅव्हेलियन भारताला ग्रीन हायड्रोजनच्या क्षेत्रात देशाने केलेली प्रगती जगासमोर दाखवण्याची संधी प्रदान करते.
भारतीय शिष्टमंडळात नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभाग, रेल्वे मंत्रालय, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय आणि खाजगी क्षेत्रातील कंपन्यांमधील नामांकित व्यक्तींचा समावेश आहे. विविध देशांच्या शासनाच्या परस्परसंवादांव्यतिरिक्त, शिखर परिषद भारतीय उद्योगांना जगभरातील कंपन्यांशी संलग्न होण्यासाठी एक व्यासपीठ प्रदान करते.
भारताने आपले एकूण 19,744 कोटी रुपयांचे राष्ट्रीय हरित हायड्रोजन अभियान जानेवारी 2023 मध्ये सुरू केले. भारताने 2030 च्या अखेरीस 5 दशलक्ष मेट्रिक टनची ग्रीन हायड्रोजन उत्पादन क्षमता साध्य करण्याचे महत्त्वाकांक्षी लक्ष्य ठेवले आहे. आजपर्यंत, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने 412,000 टन हरित हायड्रोजन उत्पादन क्षमता आणि 1,500 मेगावॅट इलेक्ट्रोलायझर उत्पादन क्षमता यासाठी निविदा काढल्या आहेत.
नॅशनल ग्रीन हायड्रोजन मोहिमेसाठी एक समर्पित पोर्टलचे अलीकडेच उद्घाटन करण्यात आले , जे ही मोहीम आणि भारतातील ग्रीन हायड्रोजन इकोसिस्टमच्या विकासासाठी उचललेल्या पावलांबद्दल माहितीसाठी एक महत्त्वाचे स्थान म्हणून काम करते. https://nghm.mnre.gov.in/ या पोर्टलवर माहिती घेता येईल.
N.Chitale/G.Deoda/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2020582)
Visitor Counter : 224