संरक्षण मंत्रालय
व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन, एव्हीएसएम, व्हीएसएम यांनी स्वीकारला नौदल उपप्रमुख पदाचा कार्यभार
Posted On:
01 MAY 2024 3:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 मे 2024
अतिविशिष्ट सेवापदक, विशिष्ट सेवापदक प्राप्त व्हाईस ॲडमिरल कृष्णा स्वामीनाथन यांनी 01 मे 2024 रोजी नौदल उपप्रमुख पदाचा कार्यभार स्वीकारला. पदभार स्वीकारल्यानंतर, या ध्वज अधिकाऱ्यांनी राष्ट्रीय युद्धस्मारकस्थळी राष्ट्रसेवेत सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीरांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.
01 जुलै 87 रोजी भारतीय नौदलात नियुक्ती झालेले फ्लॅग ऑफिसर स्वामीनाथन हे दळणवळण आणि इलेक्ट्रॉनिक युद्धतंत्रातील विशेषज्ञ आहेत. ते खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी; इंग्लंडच्या श्रीवेनहॅम येथील संयुक्त सेवा कमांड अँड स्टाफ महाविद्यालय; कारंजा येथील नौदल युद्ध महाविद्यालय आणि अमेरिकेच्या ऱ्होड आयलंड, न्यूपोर्ट येथील अमेरिकन नौदल युद्ध महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी आहेत.
अति विशिष्ट सेवा पदक आणि विशिष्ट सेवा पदक प्राप्त ॲडमिरल यांनी आपल्या नौदल कारकीर्दीत आयएनएस विद्युत आणि आयएनएस विनाश या क्षेपणास्त्र युद्धनौका; क्षेपणास्त्र हल्ला करणारी आयएनएस कुलिश; मार्गदर्शित क्षेपणास्त्र विनाशिका आयएनएस म्हैसूर आणि विमानवाहू आयएनएस विक्रमादित्य यांची धुरा सांभाळण्यारोबरच अनेक महत्वाच्या संचालन, कार्यालयीन आणि प्रशिक्षण जबाबदाऱ्या निभावल्या आहेत.
रिअर ॲडमिरलच्या पदावर बढती मिळाल्यावर, त्यांनी कोची येथील दक्षिण नौदल कमांडच्या मुख्यालयात मुख्य कर्मचारी अधिकारी (प्रशिक्षण) म्हणून काम केले आणि संपूर्ण भारतीय नौदलात प्रशिक्षण आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. नौदलाच्या सर्व स्तरावर संचालन सुरक्षेची देखरेख करणाऱ्या भारतीय नौदल सुरक्षा दलाची उभारणी करण्यातही त्यांचे मोठे योगदान आहे. त्यानंतर सागरी प्रशिक्षण ध्वज अधिकारी म्हणून नौदलाच्या वर्क-अप संघटनेचे प्रमुख म्हणून त्यांनी काम पाहिले आणि त्यानंतर त्यांना फ्लॅग ऑफिसर कमांडिंग, वेस्टर्न फ्लीट म्हणून नियुक्त करण्याचा विशेषाधिकार मिळाला. तलवार विभागाचे नेतृत्व केल्यानंतर, त्यांची भारत सरकारच्या अपतट (ऑफशोर) सुरक्षा आणि संरक्षण विभागाचे संरक्षण सल्लागार समूह आणि सल्लागार फ्लॅग ऑफिसर म्हणून नियुक्ती करण्यात आली.
व्हाईस ॲडमिरलच्या पदावर बढती मिळाल्यावर, हे ध्वज अधिकारी हे पश्चिम नौदल कमांडचे प्रमुख आणि नौदल मुख्यालयातील कार्मिक सेवा नियंत्रक होते. नौदल उपप्रमुख म्हणून सध्याच्या नियुक्तीपूर्वी, त्यांनी नौदल मुख्यालयात कार्मिक प्रमुख म्हणून सेवा बजावली आहे.
नवी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून त्यांनी बीएससी पदवी घेतली; कोची येथील कोचीन युनिव्हर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी मधून दूरसंचार विषयात एमएससी; लंडनमधील किंग्ज कॉलेज मधून संरक्षण अभ्यासात एमए; मुंबई विद्यापीठातून सामरिक अध्ययनात एमफिल; आणि मुंबई विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय अभ्यासात पीएचडी अशी व्हाईस ॲडमिरल स्वामिनाथन यांची शैक्षणिक कारकीर्द आहे.
* * *
S.Patil/V.Joshi/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2019311)
Visitor Counter : 112