संरक्षण मंत्रालय
आसाम रायफल्सने नागालँडमध्ये भारत-म्यानमार सीमेलगत मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा केला जप्त
Posted On:
29 APR 2024 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 29 एप्रिल 2024
गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या विशेष माहितीवरून कारवाई करत आसाम रायफल्सने 29 एप्रिल 2024 रोजी नागालँडच्या मोन जिल्ह्यात भारत-म्यानमार सीमेजवळ मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे, दारूगोळा आणि युद्धात वापरली जाणारी इतर सामग्री जप्त केली. पहाटेच्या सुमारास सुरू करण्यात आलेल्या या शोध मोहिमेत एका व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले तसेच 11 मॉर्टर ट्यूब (81 मिमी), 04 ट्यूब (106 मिमी) 10 पिस्तूल, 198 हातात पकडता येण्याजोगे रेडिओ सेट, एक सॅटेलाइट फोन, एक केनबो बाइक, एक बोलेरो वाहन आणि इतर युद्ध सामग्रीचा मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला.
सीमावर्ती भागाजवळ ही उच्च क्षमतेची आणि लष्करी दर्जाची शस्त्रे जप्त करणे हे सीमेवरील घुसखोरी रोखण्याच्या मोहिमेत आसाम रायफल्सला मिळालेले मोठे यश आहे. या भागातील शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजविरोधी घटकांच्या दुष्ट हेतूंना या कारवाईमुळे मोठा चाप लागला आहे. लष्करी दर्जाची शस्त्रे आणि हातात धरता येण्याजोग्या जवळपास 200 रेडिओ सेट्सची जप्ती यातून मोठ्या प्रमाणात होणारे संभाव्य नुकसान टळले आहे.
ताब्यात घेण्यात आलेली व्यक्ती आणि जप्त केलेल्या वस्तू नागालँड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आल्या आहेत. राष्ट्रीय सुरक्षेला गंभीर धोका निर्माण करण्याचे देशविघातक शक्तींचे मनसुबे आसाम रायफल्सच्या सतर्क जवानांनी यशस्वीपणे हाणून पाडले आहेत.
* * *
S.Kakade/S.Mukhedkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2019138)
Visitor Counter : 68