कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

निवृत्तीवेतनधारकांची जीवनसुलभता सुनिश्चित करण्यासाठी निवृत्तीवेतनाचे वितरण करणाऱ्या सर्व बँकांची पेन्शन पोर्टल, निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलसोबत जोडली जाणार - निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक विभागाच्या सचिवांची माहिती

Posted On: 27 APR 2024 4:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 27 एप्रिल 2024

 

निवृत्तीवेतनधारकांची जीवनसुलभता सुनिश्चित करण्यासाठी निवृत्तीवेतनाचे वितरण करणाऱ्या सर्व बँकांची पेन्शन पोर्टल, निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलसोबत जोडली जाणार असल्याची माहिती, निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक विभागाचे सचिव व्ही. श्रीनिवास यांनी दिली आहे. 26 एप्रिल 2024 रोजी निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते.

निवृत्तीवेतनधारकांच्या कल्याणकारी सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने अनेक उपक्रम हाती घेतले आहेत, असे त्यांनी सांगितले. निवृत्तीवेतनधारकांचे डिजिटल सक्षमीकरण हा असाच एक उपक्रम आहे, आणि डिजिटल जीवन प्रमाणपत्रे आणि 'भविष्य' पोर्टल यांसारख्या विविध साधनांच्या माध्यमातून त्याची अंमलबजावणी केली जात आहे, असे ते म्हणाले.

पारदर्शकता, डिजिटायजेशन आणि सेवा वितरण या उद्दिष्टांना अनुसरून, 'भविष्य' या मंचाने पेन्शन प्रक्रिया आणि पेन्शनचे वितरण यामध्ये एन्ड टू एन्ड डिजिटायजेशन सुनिश्चित केले आहे, ज्याची सुरुवात निवृत्त व्यक्तीकडून त्याचे/तिचे कागदपत्र  ऑनलाईन दाखल करण्यापासून होते, आणि इलेक्ट्रॉनिक स्वरुपात पीपीओ जारी करेपर्यंत आणि डिजिलॉकरमध्ये जाईपर्यंत सुरू राहते. 1-1-2017 पासून सर्व केंद्र सरकारी विभागांसाठी 'भविष्य' हा एक एकात्मिक ऑनलाईन पेन्शन प्रक्रिया प्रणाली असलेला मंच अनिवार्य करण्यात आला. सध्या या प्रणालीची 870 संलग्न कार्यालये आणि ऑन बोर्ड असलेले 8174 डीडीओ यांच्यासह 98 मंत्रालये/विभागांमध्ये यशस्वी अंमलबजावणी करण्यात आली आहे. निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाला एनईएसडीएने केलेल्या मूल्यांकनात सर्व केंद्र सरकारी ई-प्रशासन सेवा वितरण पोर्टलमध्ये, 'भविष्य' (निवृत्तीवेतन मंजुरी आणि वितरण प्रक्रियेचा ऑनलाईन मागोवा घेणारी डीओपीपीडब्लूने विकसित केलेली प्रणाली) या मंचाकरिता तिसरा क्रमांक मिळाला होता.

बँक बदलणे, जीवन प्रमाणपत्र दाखल करण्यासंदर्भातील स्थिती, पेन्शन पावती, फॉर्म 16, पेन्शन रिसिट इन्फर्मेशन यांसारख्या निवृत्तीवेतनधारकांना भेडसावणाऱ्या, बँकांशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी, या सर्व सेवा एकाच खिडकी अंतर्गत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, निवृत्तीवेतनाचे वितरण करणाऱ्या सर्व बँकांची पेन्शन पोर्टल, निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाच्या एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलसोबत जोडली जाणार आहेत. एसबीआय, बँक ऑफ बरोडा, पंजाब नॅशनल बँक आणि कॅनरा बँक यांच्या पेन्शन पोर्टलचे 'भविष्य' पोर्टलसोबत एकात्मिकरण (जोडण्याचे) करण्याचे काम पूर्ण झाले आहे. या एकात्मिकरणामुळे बँक ऑफ इंडियाच्या निवृत्तीवेतनधारकांना पेन्शन स्लीप, जीवन प्रमाणपत्र सादरीकरण करण्याची स्थिती, ड्यू अँड ड्रॉन स्टेटमेंट आणि फॉर्म-16 यांसारख्या सेवा 'एकल खिडकी प्रणाली' अंतर्गत उपलब्ध झाल्या आहेत. नजीकच्या भविष्यात बहुतेक पेन्शन वितरण करणाऱ्या बँकांचे एकात्मिक पेन्शनर्स पोर्टलसोबत एकात्मिकरण करण्यात येणार आहे.

 

* * *

M.Pange/S.Patil/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2019004) Visitor Counter : 289