पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सहाव्या आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला केले संबोधित


उद्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आज आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांमधील गुंतवणूक आवश्यक असल्याचे पंतप्रधानांचे प्रतिपादन

आपत्तींचा सामना करण्याची लवचिकता प्रत्येक देशात असेल, तरच संपूर्ण जग एकत्रितपणे आपत्तींचा सामना करण्यासाठी सक्षम होईल: पंतप्रधान

आपत्ती प्रतिरोधक सामायिक सक्षमता प्राप्त करण्यासाठी, सर्वात असुरक्षित लोकांना पाठबळ द्यायला हवे: पंतप्रधान

Posted On: 24 APR 2024 1:53PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 24 एप्रिल 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सहाव्या आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांबाबतच्या आंतरराष्ट्रीय परिषदेला व्हिडिओ संदेशाद्वारे संबोधित केले.

उपस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी सर्व मान्यवरांचे स्नेहमय स्वागत केले आणि ते म्हणाले की, त्यांची भागीदारी  आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा, या महत्त्वाच्या मुद्यावर जागतिक विचार प्रवर्तन आणि निर्णयाला बळ मिळेल. आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांच्या मुद्यावर 2019 पासून जागतिक स्तरावर सुरु झालेला सहयोग आणखी विस्तारला असून, आता जगातील 39 देश आणि 7 संघटनांचा हा गट बनल्याचे त्यांनी अधोरेखित केले. उज्ज्वल भविष्याचे हे संकेत आहेत, पंतप्रधान म्हणाले.

नैसर्गिक आपत्तींचे वाढते प्रमाण आणि त्याची तीव्रता लक्षात घेता, त्यामुळे झालेल्या नुकसानाचे मूल्यमापन सामान्यतः डॉलर्स मध्ये केले जाते, मात्र माणसे, कुटुंबे आणि समुदायांवर होणारा त्याचा खरा परिणाम हा या आकडेवारी पलीकडचा असल्याचे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.नैसर्गिक आपत्तींचा मानव जातीवर पडणाऱ्या प्रभावाकडे लक्ष वेधत पंतप्रधान मोदी म्हणाले की, भूकंपामुळे हजारो लोक बेघर होतात आणि नैसर्गिक आपत्तीमुळे जल आणि सांडपाणी व्यवस्थापन कोलमडते, आणि त्यामुळे लोकांचे आरोग्य धोक्यात येते. नैसर्गिक आपत्तींचा ऊर्जा निर्मिती केंद्रांवर प्रभाव पडून गंभीर परिस्थिती उद्भवू शकते, असे त्यांनी नमूद केले.

पंतप्रधान म्हणाले, चांगल्या भविष्यासाठी आज आपण आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधांवर गुंतवणूक करायला हवी. नवीन पायाभूत सुविधांची उभारणी आणि त्याचबरोबर आपत्ती-पश्चात पुनर्बांधणीचा यामध्ये भक्कम समावेश हवा यावर त्यांनी भर दिला. आपत्ती पश्चात मदत आणि पुनर्वसन झाल्यावर पायाभूत सुविधांच्या प्रतिरोधकतेवर लक्ष केंद्रित करायला हवे, असे पंतप्रधानांनी अधोरेखित केले.

निसर्ग आणि आपत्तींना सीमा नसतात, हे अधोरेखित करून पंतप्रधान म्हणाले की, आपत्ती आणि संकटांचा आजच्या एकमेकांशी उत्तम रीतीने जोडलेल्या जगावर व्यापक प्रभाव पडतो.आपत्तींचा सामना करण्याची लवचिकता प्रत्येक देशात असेल, तरच संपूर्ण जग एकत्रितपणे आपत्तींचा सामना करण्यासाठी सक्षम होईल, पंतप्रधान म्हणाले. सामायिक जोखमींमुळे सामायिक लवचिकतेच्या महत्त्वावर जोर देत ते म्हणाले की, आपत्ती प्रतिरोधक पायाभूत सुविधा परिषद (CDRI) आणि हा मेळावा, या सामूहिक मिशनसाठी जगाला एकत्र यायला मदत करेल.

"आपत्ती प्रतिरोधक सामायिक सक्षमता प्राप्त करण्यासाठी, आपण सर्वात असुरक्षित लोकांना पाठबळ द्यायला हवे", पंतप्रधानांनी नमूद केले. आपत्तींचा सर्वात जास्त धोका असलेल्या लहान विकसनशील बेट राष्ट्रांचा उल्लेख करून, अशा 13 ठिकाणच्या प्रकल्पांना निधी पुरवण्यासाठी सीडीआरआय (CDRI) मध्ये विशेष कार्यक्रम हाती घेण्यात आल्याचे पंतप्रधान मोदी यांनी नमूद केले. त्यांनी डोमिनिकमधील आपत्ती प्रतिरोधक घरे, पापुआ न्यू गिनीमधील आपत्ती प्रतिरोधक वाहतूक नेटवर्क आणि डोमिनिकन रिपब्लिक आणि फिजीमधील आपत्तीची आगाऊ सूचना देणारी सुधारित प्रणाली, याचे उदाहरण दिले. सीडीआरआय (CDRI) मध्ये ग्लोबल साउथ वर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले आहे, याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. 

भारताच्या G20 अध्यक्षतेदरम्यान, आपत्ती जोखीम कमी करण्याबाबतच्या नवीन कार्यगटाची स्थापना करून त्याला अर्थसहाय्य करण्याचा मुद्दा केंद्रस्थानी ठेवण्यात आला, या गोष्टीचे पंतप्रधानांनी स्मरण केले, आणि ते म्हणाले की, ही पावले सीडीआरआयच्या विकासाला बळ देतील आणि जगाला आपत्ती प्रतिरोध सक्षम भविष्याकडे घेऊन जातील, पुढील दोन दिवस आयसीडीआरआय मध्ये होणारी चर्चा फलदायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करून त्यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

 

 

 

 

N.Chitale/R.Agashe/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai

 



(Release ID: 2018705) Visitor Counter : 40