वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
शांघाय सहकार्य संघटनेतील स्टार्ट अप मंचाच्या चौथ्या परिषदेचे नवी दिल्ली येथे आयोजन
Posted On:
21 MAR 2024 3:47PM by PIB Mumbai
नवी दिल्ली , 21 मार्च 2024
नवी दिल्ली येथे 19 मार्च 2024 रोजी शांघाय सहकार्य संघटनेतील (एससीओ) स्टार्ट अप मंचाच्या चौथ्या परिषदेचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात एससीओ सदस्य देशांमध्ये स्टार्ट अप संबंधी संवादाचा विस्तार, नवोन्मेषाला चालना देणाऱ्या वातावरणाची जोपासना,रोजगार निर्मितीला प्रोत्साहन आणि नाविन्यपूर्ण उपाय विकसित करण्यासाठी युवा प्रतिभांना चालना या बाबींवर अधिक लक्ष एकाग्र करण्यात आले होते.
या मंचाच्या पूर्ण सत्रात एससीओ स्टार्ट अप उद्योगांच्या शिष्टमंडळांसह एससीओ सदस्य देश, सदस्य राष्ट्रांमधील स्टार्ट अप उद्योगांसाठीच्या नोडल संस्था, वरिष्ठ सरकारी अधिकारी तसेच राजनैतिक अधिकारी यांचा प्रत्यक्ष सहभाग दिसून आला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या अखत्यारीतील उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाचे (डीपीआयआयटी) सचिव राजेश कुमार सिंग यांनी त्यांच्या बीजभाषणात देशाच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यामध्ये स्टार्ट अप परिसंस्थेच्या महत्त्वाच्या भूमिकेवर अधिक भर दिला.
एससीओ पॅव्हिलीयनमध्ये मांडलेल्या प्रदर्शनामध्ये 15 हून अधिक स्टार्ट अप उद्योगांनी त्यांची उत्पादने आणि सेवा प्रदर्शित केल्या. या प्रदर्शनामुळे या उद्योजकांना प्रेरित, शिक्षित तसेच सक्षम करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नेटवर्किंग संधी उपलब्ध झाल्या. तसेच, यावेळी उपस्थित प्रतिनिधींनी स्टार्ट अप इंडिया द्वारे ‘ बीज निधीची स्थापना: नवोन्मेष आणि उद्योजकतेच्या जोपासनेसाठी धोरणात्मक दृष्टीकोन’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत देखील भाग घेतला. प्राथमिक टप्प्यांवर असणाऱ्या स्टार्ट अप उद्योगांना मदत करण्यासाठी बीज निधी उभारण्याच्या विविध पद्धती समजून घेण्यासंदर्भातील परस्पर संवादात्मक सत्राचा या कार्यशाळेत अंतर्भाव होता. या चर्चासत्रामध्ये सहभागी झालेल्यांना बीज निधी उभारण्याच्या प्रक्रियेसाठी आवश्यक धोरणात्मक नियोजन तसेच अंमलबजावणी याविषयी महत्त्वाची माहिती मिळाली.
अशा प्रकारच्या कार्यक्रमांच्या आयोजनात पुढाकार घेऊन भारताने संपूर्ण परीसंस्थेचे जाळे एकत्र विणून आणि इतर एससीओ सदस्य देशांना अशा प्रकारचे कार्यक्रम आयोजित करण्यासाठी प्रेरित करून नवोन्मेष विस्तारण्याची संधी प्राप्त केली.
आगामी काळात,भारतातर्फे नोव्हेंबर 2024 मध्ये एसडब्ल्यूजीच्या दुसऱ्या बैठकीचे तसेच जानेवारी 2025 मध्ये एससीओ स्टार्ट अप मंच 5.0 चे आयोजन केले जाणार आहे.
S.Kane/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2015904)
Visitor Counter : 100