पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

गुजरातमध्ये अहमदाबाद येथे पंतप्रधानांच्या हस्ते 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण


समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या विविध महत्त्वाच्या भागांचे लोकार्पण

10 नव्या वंदे भारत गाड्यांच्या सेवेची सुरुवात

दहेज येथील पेट्रोनेट एलएनजीच्या पेट्रोकेमिकल्स संकुलाची कोनशीला ठेवली

“2024 मधील 75 दिवसांमध्ये, 11 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे किंवा त्यांची पायाभरणी करण्यात आली आहे तसेच 7 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रकल्प गेल्या 10 ते 12 दिवसांत सुरु करण्यात आले आहेत”

“हे 10 वर्षांत केलेले काम म्हणजे केवळ एक झलक आहे. मला अजून खूप काम करायचे आहे”

“रेल्वे सेवेचा कायापालट ही विकसित भारताची हमी आहे”

“या रेल्वे गाड्या, रेल्वेचे रूळ आणि स्थानके यांचे उत्पादन मेड इन इंडिया म्हणजेच स्वदेशी उत्पादनाची परिसंस्था निर्माण करत आहेत”

“आमच्यासाठी हे विकास प्रकल्प सरकार स्थापन करण्याच्या उद्देशाने केलेले कार्य नाही तर ती राष्ट्र उभारणीची मोहीम आहे”

“भारतीय रेल्वेला आत्मनिर्भर भारत आणि व्होकल फॉर लोकल या अभियानांचे माध्यम बनवण्यावर सरकारचा भर आहे”

“भारतीय रेल्वे आधुनिकतेच्या वेगासह प्रगती करत राहील. ही मोदींची गॅरंटी आहे”

Posted On: 12 MAR 2024 2:45PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 12 मार्च 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  गुजरातमध्ये अहमदाबाद येथील समर्पित मालवाहतूक मार्गिकेच्या परिचालन नियंत्रण केंद्रात 1,06,000 कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पण केले. या प्रकल्पांमध्ये रेल्वेच्या पायाभूत सुविधा, जोडणी सुविधा आणि पेट्रोकेमिकल्स या क्षेत्रांसह विविध क्षेत्रांतील प्रकल्पांचा समावेश आहे. पंतप्रधानांनी आज 10 नव्या वंदे भारत रेल्वे गाड्यांच्या सेवेची देखील सुरुवात केली.

याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना पंतप्रधानांनी 200 हून अधिक ठिकाणांहून या कार्यक्रमाशी जोडल्या गेलेल्या लाखो लोकांचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की, आजच्या कार्यक्रमाचा आवाका आणि आकार यांची तुलना रेल्वेच्या इतिहासातील इतर कोणत्याही कार्यक्रमाशी होऊ शकत नाही. आजच्या कार्यक्रमाबद्दल त्यांनी रेल्वे विभागाचे अभिनंदन देखील केले. देशभरात होत असलेले विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी यांच्यामुळे   विकसित भारताच्या उभारणीसाठी करण्यात येत असलेल्या विकास कार्यांचा सतत विस्तार होतो आहे. “2024 मधील 75 दिवसांमध्ये, 11 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे किंवा त्यांची पायाभरणी करण्यात आली आहे तसेच 7 लाख कोटी रुपयांहून अधिक खर्चाचे प्रकल्प गेल्या 10 ते 12 दिवसांत सुरु करण्यात आले आहेत,” असे पंतप्रधान म्हणाले.

आजचा कार्यक्रम म्हणजे विकसित भारताच्या ध्येयाची पूर्तता करण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.  आज 1 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीच्या प्रकल्पांचे उद्घाटन झाले आहे अथवा त्यांची पायाभरणी करण्यात आली आहे आणि त्यापैकी सुमारे 85,000 कोटी रुपयांचे प्रकल्प रेल्वे सेवेशी संबंधित आहेत.  दहेज येथील पेट्रोनेट एलएनजीच्या 20,000 कोटी रुपये खर्चाच्या पेट्रोकेमिकल्स संकुलाच्या कार्याची कोनशीला रचल्याचे सांगत, हा प्रकल्प देशातील हायड्रोजन उत्पादन तसेच पॉलीप्रॉपिलीनची मागणी यांना चालना देईल अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांतील एकता मॉल्सच्या पायाभरणीचा संदर्भ देत पंतप्रधान मोदी म्हणाले की हा उपक्रम भारतातील कुटिरोद्योग तसेच हस्तकलेला देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवेल आणि त्यायोगे सरकारच्या व्होकल फॉर लोकल या मोहिमेला अधिक बळ मिळेल आणि विकसित भारताचा पाया बळकट होईल. भारतातील युवा लोकसंख्येच्या प्रमाणाचा पुनरुच्चार करत पंतप्रधानांनी देशभरातील युवा वर्गाला सांगितले की, आज ज्या प्रकल्पांची उद्घाटने झाली आहेत ती त्यांच्या वर्तमानकाळासाठी उपयुक्त आहेत तर आज ज्या कार्याची पायाभरणी झाली आहे ती कार्ये त्यांच्या उज्ज्वल भविष्याची हमी देणारी आहेत.  

वर्ष 2014 पूर्वीच्या  रेल्वे अर्थसंकल्पाच्या वाढीव दृष्टिकोनाचा संदर्भ देत पंतप्रधान म्हणाले की केंद्रीय अर्थसंकल्पात रेल्वे अर्थसंकल्पाचा समावेश केल्यामुळे केंद्रीय अर्थसंकल्पातून रेल्वे विभागाच्या खर्चासाठी निधीची तरतूद करणे शक्य झाले. वक्तशीरपणा, स्वच्छता तसेच सर्वसामान्य सुविधा यांच्या अभावाचा उल्लेख करतानाच पंतप्रधान म्हणाले की, वर्ष 2014 पूर्वी ईशान्य प्रदेशातील 6 राज्यांच्या राजधानीची शहरे रेल्वे सेवेशी जोडलेली नव्हती तसेच देशभरात मानवसेवाविरहित प्रकारची 10,000 हून अधिक रेल्वे फाटके होती आणि केवळ 35%  रेल्वे मार्गांचे विद्युतीकरण झालेले होते तसेच रेल्वे आरक्षणाचे क्षेत्र भ्रष्टाचार आणि लांबच लांब रांगा यांनी त्रस्त झालेले होते.

पंतप्रधान म्हणाले, “त्या नरकमय परिस्थितीतून रेल्वे विभागाला बाहेर काढण्यासाठी आमच्या सरकारने प्रचंड इच्छाशक्ती दाखवली आहे. आत रेल्वेचा विकास ही आमच्या सरकारच्या सर्वोच्च प्राधान्यक्रमांच्या बाबींपैकी एक बाब झाली आहे.” वर्ष 2014 पासून आतापर्यंत अर्थसंकल्पीय तरतुदींमध्ये सहा पट वाढ होण्यासारख्या अनेक उपक्रमांची यादी सादर करत पंतप्रधानांनी येत्या 5 वर्षांत रेल्वेमध्ये होणारा कायापालट देशवासीयांच्या कल्पनेच्या पलीकडचा असेल असा शब्द दिला. “हे 10 वर्षांत केलेले काम म्हणजे केवळ एक झलक आहे. मला अजून खूप काम करायचे आहे,” ते पुढे म्हणाले. देशातील बहुतांश राज्यांमध्ये वंदे भारत गाड्यांची सेवा सुरु झाली असून देशभरात धावणाऱ्या वंदे भारत गाड्यांच्या संख्येने कधीच शतक ओलांडले आहे अशी माहिती त्यांनी दिली. वंदे भारत गाड्यांच्या सेवेचे जाळे देशभरातील 250 जिल्ह्यांपर्यंत पोहोचले आहे. लोकांच्या इच्छेचा आदर करत, वंदे भारत गाड्यांच्या मार्गांचा विस्तार करण्यात येत आहे असे ते म्हणाले.

देशाला विकसित होण्यात आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यात रेल्वे विभागाची महत्त्वाची भूमिका लक्षात घेत पंतप्रधान म्हणाले, “रेल्वे सेवेचा कायापालट ही विकसित भारताची हमी आहे.” रेल्वेच्या बदलत्या परिदृश्यावर अधिक प्रकाश टाकत पंतप्रधानांनी जलदगतीने रेल्वे मार्गांची उभारणी, 1300 हून अधिक रेल्वे स्थानकांचे आधुनिकीकरण, वंदे भारत, नमो भारत आणि अमृत भारत यांसारख्या अत्याधुनिक गाड्यांच्या सेवेची सुरुवात, तसेच आधुनिक रेल्वे इंजिने आणि डब्यांची निर्मिती करणाऱ्या कारखान्यांची सुरुवात या कार्यांचा उल्लेख केला.

पंतप्रधान म्हणाले की जमीन भाडेपट्टी धोरणात सुलभता आणल्यामुळे आणि हे धोरण ऑनलाइन पद्धतीने उपलब्ध करून त्यात पारदर्शकता आणल्यामुळे, गतिशक्ती कॉर्गो टर्मिनल धोरणाअंतर्गत, कॉर्गो टर्मिनलच्या बांधणीत वाढ झाली आहे. गतिशक्ती विद्यापीठाच्या स्थापनेचा देखील त्यांनी यावेळी उल्लेख केला.रेल्वेने हाती घेतलेल्या आधुनिकीकरणाशी संबंधित उपक्रमांच्या संदर्भातील चर्चा सुरु ठेवत पंतप्रधानांनी मानवविरहित रेल्वे फाटके पूर्णपणे काढून टाकणे आणि सिग्नल यंत्रणेचे स्वयंचलीकरण करणे या प्रकल्पाबाबत माहिती दिली. ते म्हणाले की देश आता रेल्वेच्या 100% विद्युतीकरणाच्या दिशेने वाटचाल करत आहे. सौर उर्जेवर कार्यान्वित होणारी स्थानके आणि स्थानकांवर जन औषधी केंद्रांची सोय याबाबत पंतप्रधानांनी माहिती दिली.

“या रेल्वे गाड्या, रेल्वेचे रूळ आणि स्थानके यांचे उत्पादन मेड इन इंडिया म्हणजेच स्वदेशी उत्पादनाची परिसंस्था निर्माण करत आहेत,” पंतप्रधान म्हणाले. भारतात निर्मित रेल्वे इंजिने आणि डबे आता श्रीलंका, मोझांबिक, सेनेगल, म्यानमार आणि सुदान यांसारख्या देशांना निर्यात केले जात आहेत अशी माहिती त्यांनी दिली. भारतात उत्पादित निम-जलदगती रेल्वे गाड्यांना येत असलेल्या मागणीमुळे अशा अनेक कारखान्यांचा उदय होईल असे ते म्हणाले. “रेल्वेचे पुनरुज्जीवन, गुंतवणुकीची नवी हमी, नव्या रोजगार संधी,” पंतप्रधानांनी मत व्यक्त केले.

या उपक्रमांचा संबंध निवडणुकीशी जोडणाऱ्यांवर पंतप्रधानांनी टीका केली. "आमच्यासाठी, हे विकास प्रकल्प सरकार बनवण्यासाठी नाहीत तर राष्ट्र उभारणीचे ध्येय आहेत", पुढच्या पिढीला मागील पिढ्यांच्या समस्यांचा त्रास होणार नाही आणि 'ही मोदींची हमी आहे', असे ते म्हणाले.

गेल्या 10 वर्षातील विकासाचे उदाहरण म्हणून पंतप्रधानांनी पूर्व आणि पश्चिम समर्पित मालवाहू मार्गिकेचे उदाहरण दिले. मालगाड्यांसाठीच्या या स्वतंत्र मार्गिकेमुळे वाहुतुकीचा वेग वाढतो आणि शेती, उद्योग, निर्यात तसेच व्यवसायासाठी याचे महत्त्व अधोरेखित होते. गेल्या 10 वर्षात पूर्व आणि पश्चिम किनारपट्टीला जोडणारा ही मालवाहू मार्गिका जवळपास पूर्ण झाली आहे. आज सुमारे 600 किलोमीटरच्या मालवाहू मार्गिकेचे उद्घाटन करण्यात आले असून अहमदाबादमध्ये कार्यान्वयन नियंत्रण केन्द्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. सरकारच्या प्रयत्नांमुळे या मार्गिकेवरील मालगाड्यांचा वेग आता दुपटीने वाढला आहे, असे ते म्हणाले. संपूर्ण मार्गिका पट्टयात औद्योगिक मार्गिका विकसित करण्यात येत आहे. आज अनेक ठिकाणी रेल्वे संबंधित वस्तूंसाठी छत, गती शक्ती बहुआयामी माल टर्मिनल, डिजिटल नियमन केन्द्र, रेल्वे कार्यशाळा, रेल्वे लोको शेड, आणि रेल्वे आगाराचे उद्घाटनही करण्यात आले आहे. याचा मालवाहतुकीवरही खूप सकारात्मक परिणाम होईल, असे ते म्हणाले.

“भारतीय रेल्वे हे आत्मनिर्भर भारत आणि “वोकल फॉर लोकल”चे माध्यम बनवण्यावर सरकारचा भर आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. देशातील विश्वकर्मा, हस्तकला कारागीर आणि महिला बचत गटांनी उत्पादित केलेली उत्पादने आता, एक स्थानक एक उत्पादन योजने अंतर्गत रेल्वे स्थानकांवर विकली जातील, यासाठी आधीतच स्थानकांवर 1500 स्टॉल्स सुरु झाले आहेत.

विकासासोबतच ‘वारसा’ हा मंत्र घेऊन प्रादेशिक संस्कृती आणि श्रद्धास्थानासंबंधित पर्यटनाला भारतीय रेल्वे चालना देत असल्याबद्दल पंतप्रधान मोदींनी आनंद व्यक्त केला. “आज रामायण सर्किट, गुरू-कृपा सर्किट आणि जैन यात्रेवर भारत गौरव गाड्या धावत आहेत तर आस्था स्पेशल ट्रेन देशाच्या कानाकोपऱ्यातून श्रीराम भक्तांना अयोध्येला घेऊन जात आहेत”. सुमारे 350 आस्था गाड्यांनी आतापर्यंत साडेचार लाखांहून अधिक भाविकांना अयोध्येत रामलल्लांच्या दर्शनासाठी नेले आहे अशी माहिती त्यांनी दिली.

भाषणाचा समारोप करताना पंतप्रधान म्हणाले, “भारतीय रेल्वे आपला वेग कायम ठेवत आधुनिकतेची कास धरुन पुढे जात राहील. ही मोदींची हमी आहे.  विकासाचा हा उत्सव सुरू ठेवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आणि केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव आदी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

रेल्वे पायाभूत सुविधा, संपर्क व्यवस्था आणि पेट्रोकेमिकल्स क्षेत्राला मोठी चालना देण्यासाठी, अहमदाबादमधील डीएफसी कार्यान्वयन नियंत्रण केन्द्राला पंतप्रधानांनी भेट दिली आणि 1,06,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या रेल्वे आणि पेट्रोकेमिकल्स प्रकल्पांची पायाभरणी तसेच लोकार्पणही केले.  

पंतप्रधानांनी रेल्वे कार्यशाळा, लोको शेड, पिट लाइन/कोचिंग डेपो;  फलटण-बारामती नवीन मार्ग;  इलेक्ट्रिक ट्रॅक्शन प्रणाली अद्ययावतीकरणाचे कामांची पायाभरणी केली. आणि पश्चिम डीएफसीचे कार्यान्वयन नियंत्रण केन्द्र (ओसीसी), अहमदाबाद इथे पूर्व डीएफसीच्या नवीन खुर्जा ते साहनेवाल (401 आरकेएम) विभाग आणि पश्चिम डीएफसीच्या नवीन मकरपुरा ते नवीन घोलवड विभागा (244 आरकेएम) दरम्यान समर्पित मालवाहू मार्गिकेच्या दोन नवीन विभागांचे राष्ट्रार्पण केले.

पंतप्रधानांनी अहमदाबाद-मुंबई सेंट्रल, सिकंदराबाद-विशाखापट्टणम, म्हैसूर- डॉ. एमजीआर सेंट्रल (चेन्नई),  पाटणा- लखनौ, न्यू जलपाईगुडी-पाटणा, पुरी-विशाखापट्टणम, लखनौ- डेहराडून, कलबुर्गी-  सर एम विश्वेश्वरय्या टर्मिनल बेंगळुरू, रांची-वाराणसी, खजुराहो-दिल्ली (निजामुद्दीन) या दरम्यान दहा नवीन वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला.

पंतप्रधानांनी, चार वंदे भारत ट्रेनच्या विस्तारालाही हिरवा झेंडा दाखवला.  अहमदाबाद-जामनगर वंदे भारत द्वारका, अजमेर-दिल्ली सराय रोहिला वंदे भारत चंदिगडपर्यंत, गोरखपूर-लखनौ वंदे भारत प्रयागराजपर्यंत आणि तिरुअनंतपुरम-कासरगोड वंदे भारत मंगळुरुपर्यंत विस्तारित करण्यात येत आहे;  आणि आसनसोल आणि हतीया आणि तिरुपती आणि कोल्लम स्थानकांदरम्यान दोन नवीन प्रवासी गाड्यांचा यात समावेश आहे.

पंतप्रधानांनी समर्पित मालवाहू मार्गिकेवर न्यू खुर्जा जंक्शन, साहनेवाल, न्यू रेवाडी, न्यू किशनगड, न्यू घोलवड आणि न्यू मकरपुरा येथून मालवाहू गाड्यांना हिरवा झेंडा दाखवला.

पंतप्रधानांनी रेल्वे स्थानकांवर 50 प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी केंद्रे राष्ट्राला समर्पित केली. ही जन औषधी केंद्रे लोकांना स्वस्त आणि दर्जेदार जेनेरिक औषधे उपलब्ध करतील.

पंतप्रधानांनी 51 गती शक्ती बहुआयामी मालवाहू टर्मिनल्स राष्ट्राला समर्पित केले. हे टर्मिनल्स वाहतुकीच्या विविध पद्धतींमध्ये मालाची अविरत वाहतूक सुनिश्चित करतील. 

पंतप्रधानांनी 80 विभागात स्वयंचलित सिग्नलिंगचे 1045 आरकेएमचे राष्ट्रार्पण केले. या अद्ययावतीकरणामुळे ट्रेन कार्यान्वयनाची सुरक्षा आणि कार्यक्षमता वाढेल.  पंतप्रधानांनी 2646 स्थानकांवर रेल्वे स्थानकांचे डिजिटल नियंत्रण प्रणालीचेही राष्ट्रार्पण केले. यामुळे गाड्यांची परिचालन कार्यक्षमता आणि सुरक्षितता सुधारेल.

पंतप्रधानांनी 35 रेल कोच रेस्टॉरंटचे राष्ट्रार्पण केले. खानपानाबाबतच्या प्रवाशांच्या आणि जनतेच्या गरजा पूर्ण करणे याशिवाय रेल्वेसाठी प्रवासीभाड्या व्यतिरिक्त महसूल निर्माण करणे हे रेल्वे कोच रेस्टॉरंटचे उद्दिष्ट आहे.

पंतप्रधानांनी देशभरातील 1500 हून अधिक एक स्थानक एक उत्पादन स्टॉल्स राष्ट्राला समर्पित केले.  हे स्टॉल स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देतील आणि स्थानिक कारागीर आणि व्यवसायांसाठी उत्पन्नाचे स्रोत निर्माण करतील.

पंतप्रधानांनी 975 ठिकाणी सौरऊर्जेवर चालणारी केंद्रे/इमारतींचे लोकार्पण केले. या उपक्रमामुळे भारताच्या अक्षय ऊर्जा उद्दिष्टांमध्ये योगदान मिळेल आणि रेल्वेचे कार्बन उत्सर्जन कमी होईल.

पंतप्रधानांनी गुजरातमधील दहेज येथे पेट्रोनेट एलएनजीच्या पेट्रोकेमिकल्स संकुलाची पायाभरणी केली. यात 20,600 कोटी रुपये किंमतीच्या इथेन आणि प्रोपेन हाताळणी सुविधांचा समावेश आहे.  

विद्यमान एलएनजी रीगॅसिफिकेशन टर्मिनलच्या जवळ या पेट्रोकेमिकल्स संकुलाची स्थापना केल्यामुळे प्रकल्पाच्या कॅपेक्स आणि ओपेक्स खर्चात लक्षणीय बचत होईल.

प्रकल्पाच्या अंमलबजावणीमुळे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे 50,000 लोकांसाठी रोजगाराची संधी निर्माण होऊ शकते आणि अंमलबजावणीच्या टप्प्यात 20,000 हून अधिक व्यक्तींना रोजगाराची संधी मिळण्याची शक्यता आहे. तसेच त्यांना या क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सामाजिक-आर्थिक फायदे मिळतील.

पंतप्रधानांनी गुजरात आणि महाराष्ट्र या दोन राज्यात सुमारे  400 कोटी रुपये किमतीच्या एकता मॉलची पायाभरणीही केली. एकता मॉल्स भारतीय हातमाग, हस्तकला, ​​पारंपारिक उत्पादने आणि एक स्थानक एक उत्पादनांचा समृद्ध आणि वैविध्यपूर्ण वारसा पुढे नेणार आहेत. त्यांना प्रोत्साहन देणार आहेत.  एकता मॉल्स हे भारतातील एकता आणि विविधतेचे प्रतीक आहेत, तसेच आपल्या पारंपारिक कौशल्ये आणि क्षेत्रांच्या विकास आणि सक्षमीकरणासाठी उत्प्रेरक आहेत.

पंतप्रधानांनी यावेळी अनेक विकास कामांचे राष्ट्रार्पण, पायाभरणी केली.

नवीन विद्युतीकृत विभागांचे राष्ट्रार्पण, रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण/मल्टी-ट्रॅकिंग, रेल्वे गुड्स शेड्स, रेल्वे कार्यशाळा, लोको शेड्स, पिट लाइन्स/कोचिंग डेपो यांचा विकास आदी प्रकल्पांचा यात समावेश आहे.  हे प्रकल्प आधुनिक आणि सक्षम रेल्वे जाळे तयार करण्याच्या सरकारच्या समर्पणाचे निदर्शक आहेत. या गुंतवणुकीमुळे केवळ संपर्क व्यवस्थाच नाही तर आर्थिक विकासालाही चालना मिळेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.

 

 

 

* * *

NM/Sanjana/Vinayak/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2013731) Visitor Counter : 170