पंतप्रधान कार्यालय

हरियाणातील गुरुग्राम येथे राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या उद्घाटन/ पायाभरणी प्रसंगी पंतप्रधानांचे संबोधन

Posted On: 11 MAR 2024 10:50PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 11 मार्च 2024

 

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय जी, कष्टाळू मुख्यमंत्री मनोहर लाल जी, केंद्रातील माझे वरिष्ठ सहकारी नितीन गडकरी जी, राव इंद्रजीत सिंह, कृष्ण पाल गुर्जर जी, हरियाणाचे उपमुख्यमंत्री दुष्यंत जी, भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि संसदेतील माझे सहकारी नायब सिंह सैनी जी, इतर सर्व मान्यवर आणि मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींनो!

मी आत्ता माझ्या समोरील स्क्रीनवर पाहत होतो की देशाच्या कानाकोपऱ्यातील लाखो लोक आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आमच्या कार्यक्रमाशी जोडलेले आहेत. एक काळ असा होता की दिल्लीतील विज्ञान भवनातून कार्यक्रम आयोजित केले जायचे आणि देश जोडला जायचा. काळ बदलला, गुरुग्राममध्ये कार्यक्रम होतो आणि देशभरातून लोक जोडले जातात. हरियाणा ही क्षमता दाखवत आहे. आज देशाने आधुनिक संपर्क यंत्रणेच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. मला आज द्वारका द्रुतगती मार्ग देशाला समर्पित करण्याची संधी मिळाली याचा मला आनंद आहे. या द्रुतगती मार्गासाठी 9 हजार कोटी रुपयांहून अधिक खर्च झाला आहे. आजपासून दिल्ली-हरियाणा दरम्यानच्या वाहतुकीचा अनुभव कायमचा बदलेल. हा आधुनिक द्रुतगती मार्ग केवळ वाहनांमध्येच नव्हे तर दिल्ली-एनसीआरमधील लोकांच्या जीवनातही गिअर बदलण्याचे काम करेल. मी दिल्ली-एनसीआर आणि हरियाणाच्या लोकांना या आधुनिक द्रुतगती मार्गासाठी खूप खूप शुभेच्छा देतो.

मित्रहो,

पूर्वीची सरकारे छोटी योजना आखायची, छोटेखानी कार्यक्रम आयोजित करायची आणि त्यावर पाच वर्षे काम रेटत राहायची. त्याउलट भाजप सरकार ज्या गतीने काम करत आहे, त्यात पायाभरणी आणि लोकार्पणासाठी वेळ पुरत नाही, दिवस कमी पडतायत. वर्ष 2024 मध्येच, इथले लोक समंजस आहेत त्यांना कळलेच असेल, म्हणजे बघा, 2024 मध्येच, म्हणजे 2024 चे तीन महिनेही अजून पूर्ण झालेले नाहीत तर एवढ्या कमी कालावधीत 10 लाख कोटी रुपयांच्या प्रकल्पांची एक तर पायाभरणी झाली किंवा काहींचे लोकार्पण झाले. आणि मी हे जे काही सांगतोय, मी फक्त त्या प्रकल्पांची चर्चा करत आहे ज्यात मी स्वतः निगडित आहे. त्याशिवाय माझ्या मंत्र्यांनी आणि आमच्या मुख्यमंत्र्यांनी जे काम केले ते वेगळेच. आणि तुम्ही बघा, हे सर्व गेल्या 5-5 वर्षांत. तुम्ही 2014 पूर्वीचा काळात असे कधीच ऐकले किंवा पाहिले  नसेल, फक्त आठवून पहा. आजही एका दिवसात येथे 1 लाख कोटींहून अधिक किमतीच्या 100 हून अधिक प्रकल्पांचे लोकार्पण किंवा पायाभरणी झाली आहे. यामध्ये दक्षिणेला कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश, उत्तरेला हरियाणा आणि उत्तर प्रदेशातील विकास कामे, पूर्वेला बिहार आणि बंगालचे प्रकल्प आणि पश्चिमेला महाराष्ट्र, पंजाब आणि राजस्थानमधील हजारो कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचा समावेश आहे. आज उद्घाटन झालेल्या प्रकल्पात राजस्थानमधील अमृतसर-भटिंडा-जामनगर कॉरिडॉरची लांबी 540 किलोमीटरने वाढवण्यात येणार आहे. बेंगळुरू रिंगरोडच्या विकासामुळे तेथील वाहतुकीची समस्या बऱ्याच अंशी कमी होईल. अनेक विकास योजनांसाठी मी पूर्व ते पश्चिम, उत्तर ते दक्षिण अशा सर्व राज्यांतील कोट्यवधी नागरिकांचे अभिनंदन करतो.

मित्रहो,

समस्या आणि संधीमध्ये फक्त विचाराचा फरक आहे. आणि समस्यांचे संधीत रूपांतर करणे, ही मोदींची हमी आहे. द्वारका द्रुतगती मार्ग हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. आज ज्या ठिकाणी द्वारका द्रुतगती मार्ग बांधण्यात आला आहे, तिथे एके काळी लोक संध्याकाळनंतर जाणे टाळायचे. टॅक्सीचालकही इथे यायला नकार द्यायचे. हा संपूर्ण परिसर असुरक्षित मानला जात होता. पण, आज अनेक मोठ्या कंपन्या येथे येऊन आपले प्रकल्प उभारत आहेत. हे क्षेत्र एनसीआरमधील सर्वात वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक बनत आहे. या द्रुतगती मार्गामुळे दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाशी कनेक्टिव्हिटी सुधारेल. यामुळे एनसीआरचे एकीकरण सुधारेल आणि इथल्या आर्थिक घडामोडींना चालना मिळेल.

आणि मित्रहो,

द्वारका द्रुतगती मार्ग जेव्हा दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाशी जोडला जाईल, तेव्हा एक नवीन अध्याय सुरू होईल. हा कॉरिडॉर संपूर्ण पश्चिम भारतातील उद्योग आणि निर्यातीला नवी ऊर्जा देईल. आज मी हरियाणा सरकारने आणि विशेषत: मुख्यमंत्री मनोहर लाल जी यांनी या द्रुतगती मार्गाच्या बांधकामात दाखवलेल्या तत्परतेचे कौतुक करेन. मनोहर लाल जी हरियाणाच्या विकासासाठी ज्याप्रकारे रात्रंदिवस काम करत आहेत, त्याद्वारे राज्यात आधुनिक पायाभूत सुविधांचे मोठे जाळे निर्माण झाले आहे. आणि मनोहर लालजी आणि मी खूप जुने मित्र आहोत, सतरंजीवर झोपण्याचा काळ होता तेव्हाही आम्ही एकत्र काम करायचो. आणि मनोहर लालजींकडे मोटरसायकल होती, म्हणून ते मोटरसायकल चालवायचे, मी मागे बसायचो. रोहतक येथून निघून गुरुग्राम येथे आम्ही थांबायचो. असे आम्ही मोटारसायकलवरून हरियाणाला वारंवार जायचो. आणि मला आठवतंय त्यावेळी आम्ही मोटरसायकलवरून गुरुग्रामला यायचो तेव्हा रस्ते अरुंद होते, खूप त्रास व्हायचा. आज मला आनंद आहे की आम्ही सोबत आहोत आणि तुमचे भविष्य देखील सोबत आहे. विकसित हरियाणा-विकसित भारताचा मूलमंत्र मनोहर जी यांच्या नेतृत्वाखाली हरियाणा राज्य सरकार सातत्याने बळकट करत आहे.

मित्रहो, 

21व्या शतकातील भारत हा मोठा दृष्टिकोन ठेवून आहे. मोठ्या ध्येयांचा हा भारत आहे. आजचा भारत प्रगतीच्या गतीशी कोणतीही तडजोड करू शकत नाही. आणि तुम्ही लोकांनी मला चांगले जाणले आहे, ओळखले आहे आणि समजूनही  घेतले आहे. तुम्ही बघितलेच असेल ना की माझे विचारही सीमित नाहीत, माझी स्वप्नेही सामान्य नाहीत आणि माझे संकल्पही सामान्य नसतात. मला जे काही करायचे आहे, ते भव्यदिव्य, विशाल, जलदगतीने हवे आहे. कारण मित्रहो, 2047 मध्ये मला भारताला विकसित भारत म्हणून पहायचे आहे. तुमच्या मुलांच्या उज्वल भविष्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील.

मित्रहो,

हा वेग वाढवण्यासाठी आम्ही दिल्ली-एनसीआरमध्ये सर्वांगीण दृष्टीकोनातून पायाभूत सुविधांच्या विकासाची कामे सुरू केली. निर्धारित कालावधीत मोठे प्रकल्प पूर्ण करण्याचे आम्ही लक्ष्य ठेवले आहे. द्वारका द्रुतगती मार्ग असो, परिघीय द्रुतगती मार्गाचे बांधकाम असो... पूर्व परिघीय द्रुतगती मार्ग असो... दिल्ली मेरठ द्रुतगती मार्ग असो... असे अनेक मोठे प्रकल्प आमच्या सरकारने पूर्ण केले आहेत. आणि कोविडच्या 2 वर्षांच्या आपत्कालीन परिस्थितीही आपण देशाला इतक्या वेगाने पुढे नेण्यात यशस्वी झालो आहोत. दिल्ली-एनसीआरमध्ये गेल्या 10 वर्षांत 230 किलोमीटरहून अधिक नवीन मेट्रो मार्ग सुरू करण्यात आले आहेत. जेवरमधील आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम वेगाने सुरू आहे.

‘दिल्ली नोएडा डायरेक्ट फ्लाय वे (डीएनडी) - सोहना स्पर’ सारखे प्रकल्प देखील निर्मितीच्या अंतिम टप्प्यात आहेत. या प्रकल्पामुळे प्रवास करणे तर सुलभ होईलच, यासोबतच दिल्ली - एनसीआर मधील प्रदुषणाची समस्या देखील कमी होईल. 

मित्रांनो, 

विकसित होत असलेल्या भारतात आधुनिक पायाभूत सुविधांची निर्मिती आणि देशात कमी होत असलेली गरीबी, या दोन्ही बाबी एकमेकांशी जोडलेल्या आहेत. जेव्हा द्रुतगती मार्ग ग्रामीण भागातून जातात, जेव्हा छोट्या गावांना चांगल्या रस्त्यांशी जोडले जाते, तेव्हा अनेक नव्या संधी गावातील लोकांच्या दारापर्यंत पोहोचतात. पूर्वी खेड्यातील लोक कसल्याही प्रकारच्या नव्या संधीच्या शोधात शहरापर्यंत पोहोचत होते. मात्र आता माफक दरात डेटा आणि संपर्क सुविधांच्या पायाभूत सुविधांमुळे गावांमध्येच नव्या संधी जन्म घेत आहेत. जेव्हा रुग्णालय, शौचालय, नळाद्वारे पाणी आणि घरांची विक्रमी गतीने निर्मिती होत आहे तेव्हा सर्वात गरीब व्यक्तीला देखील देशाच्या विकासाचा लाभ मिळत आहे. जेव्हा महाविद्यालय, विद्यापीठ आणि उद्योग यासारख्या पायाभूत सुविधांमध्ये वृद्धी होते तेव्हा यामुळे तरुणांसाठी प्रगतीच्या  अगणित संधी घेऊन येतात.  अशाच अनेक प्रकारच्या प्रयत्नांमुळे, गेल्या 10 वर्षात 25 कोटी लोक गरीबीतून बाहेर येऊ शकले आहेत. आणि जनतेच्या याच प्रगतीच्या शक्तीमुळे आपण जगातील सर्वात मोठ्या 11 व्या अर्थव्यवस्थेपासून सर्वात मोठी 5 वी अर्थव्यवस्था बनलो आहोत.

मित्रांनो,

देशात जलद गतीने होत असलेले पायाभूत सुविधा निर्मितीचे काम, भारताला त्याच जलद गतीने जगातील तिसरी सर्वात मोठे आर्थिक शक्ती देखील बनवेल. आणि यामुळे तितक्याच जास्त रोजगार, स्वयंरोजगाराच्या संधी देखील उपलब्ध होतील. या प्रमाणावर पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी, महामार्ग आणि द्रुतगती मार्ग यांच्या निर्मितीसाठी मोठ्या प्रमाणावर अभियंते आणि कामगारांची आवश्यकता असते. सिमेंट आणि पोलाद यासारख्या उद्योगांना बळ मिळत आहे, या ठिकाणी देखील युवक मोठ्या संख्येने काम करत आहेत. या द्रुतगती मार्गांच्या कडेला आज औद्योगिक कॉरिडॉर बनत आहेत. नव्या कंपन्या, नवे कारखाने कौशल्य प्रशिक्षित तरुणांसाठी लाखो रोजगार उपलब्ध करून देत आहेत. याशिवाय चांगल्या दर्जाच्या रस्त्यांमुळे दुचाकी आणि चार चाकी उद्योगाला देखील गती मिळत आहे. आज युवकांना रोजगाराच्या कितीतरी नवीन संधी मिळत आहेत, देशाच्या उत्पादन क्षेत्राला कितीतरी बळ मिळत आहे, हे यातून स्पष्ट होते.

मित्रांनो,

देशात लाखो कोटी रुपये खर्चाच्या या विकास कार्यामुळे सर्वात जास्त कोणाची अडचण होत असेल तर ती म्हणजे काँग्रेसला आणि त्यांच्या घमंडिया आघाडीला. यामुळे त्यांची झोप उडाली आहे. इतकी सारी विकास कामे होत असताना जर ते एका कामावर टीका करत असतील तर मोदी 10 नवीन कामे करून दाखवत आहे. इतक्या जलद गतीने कामे कशी काय होऊ शकतात? हे त्यांना समजतच नाहीये. आणि म्हणूनच आता विकासाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी त्यांच्याकडे ताकदच शिल्लक राहिली नाही. आणि म्हणूनच, मोदी निवडणुकांना लक्षात घेऊन लाखो करोडो रुपयांची विकास काम करत आहे, असे त्या लोकांचे म्हणणे आहे. गेल्या दहा वर्षात देश कितीतरी बदलला आहे. मात्र, काँग्रेस आणि त्यांच्या मित्रांचा याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदललेला नाही. त्यांच्या चष्म्याचा नंबर आज देखील तोच आहे, ‘ऑल नेगेटिव’! ‘ऑल नेगेटिव’! नकारात्मकता आणि केवळ नकारात्मकता, हेच काँग्रेस आणि इंडी आघाडीवाल्यांचे चरित्र बनले आहे. हे तर ते लोक आहेत जे केवळ निवडणुका दरम्यान केलेल्या घोषणांवर सरकार चालवत होते. या लोकांनी 2006 मध्ये राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्पा अंतर्गत 1000 किलोमीटर द्रुतगती मार्ग बनवण्याची घोषणा केली होती. मात्र हे लोक नुसतीच घोषणा करून आपल्या घरट्यात परत गेले आणि केवळ हातावर हात ठेवून बसून राहिले. ईस्टर्न पेरिफेरल एक्सप्रेस वे ची घोषणा 2008 मध्ये करण्यात आली होती. मात्र हा प्रकल्प आमच्या सरकारने 2018 मध्ये पूर्ण केला. द्वारका द्रुतगती मार्ग आणि शहर विस्तारीकरण मार्गाचे काम देखील वीस वर्ष प्रलंबित राहिले होते. आमच्या दुहेरी इंजिनाच्या सरकारने सर्व समस्यांचे निराकरण केले आणि प्रत्येक प्रकल्प पूर्ण देखील केला आहे.

आज आमचे सरकार ज्या कामाची पायाभरणी करते, ते काम योग्य वेळेत पूर्ण करण्यासाठी देखील तितकीच मेहनत करत आहे. आणि अशा  वेळी आम्ही निवडणुका आहेत की नाही याकडे अजिबात लक्ष देत नाही. आज तुम्हीच स्वतः पहा…देशातील गावांना लाखो किलोमीटर लांबीच्या ऑप्टिक फायबर केबल्सनी जोडण्यात आले आहे. मग निवडणुका असोत की नसोत. आज देशातील छोट्या छोट्या शहरांमध्ये देखील विमानतळ बनवण्यात येत आहे, मग निवडणुका असोत की नसोत. आज देशातील गावागावांपर्यंत रस्ते तयार करण्यात आले आहेत, मग निवडणुका असोत की नसोत. आम्ही करदात्यांच्या एका एका पैशाची किंमत जाणतो, आणि याच कारणामुळे आम्ही सर्व प्रकल्प निर्धारित अर्थसंकल्पात आणि निर्धारित कालावधीत पूर्ण केले आहेत.

पूर्वी निवडणूक जिंकण्यासाठी पायाभूत सुविधांची घोषणा केली जात होती. आता, निवडणुकांमध्ये पायाभूत सुविधांची कामे पूर्ण करण्याबाबत बोलले जात आहे. हाच नवा भारत आहे. पूर्वी विलंब (Delay) होत होता आता वितरण (Delivery) होत आहे. पूर्वी विलंब होत होता आता विकास होत आहे. आज आम्ही देशात 9000 किलोमीटर हाय स्पीड कॉरिडॉर बनवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत. यापैकी सुमारे 4000 किलोमीटर हाय स्पीड कॉरिडॉर संपूर्ण तयार झाला आहे. 2014 पर्यंत केवळ 5 शहरांमध्ये मेट्रो सुविधा उपलब्ध होती, आज 21 शहरांमध्ये मेट्रोची सेवा सुविधा उपलब्ध आहे. या कामांच्या पूर्ततेसाठी योग्य नियोजन आवश्यक असते, दिवस रात्रीची मेहनत आवश्यक असते. ही कामे विकासाच्या दूरदृष्टीमुळे होत असतात. ही कामे तेव्हाच होतात जेव्हा इरादा नेक असतो. पुढच्या पाच वर्षात विकासाची ही गती आणखी कित्येक पटीने वृद्धिंगत होईल. काँग्रेसने सात दशकांमध्ये जे खड्डे खोदले होते ते आता जलद गतीने भरले जात आहेत. येत्या पाच वर्षात आपल्या या पायावर मजबूत इमारत बांधण्याचे काम केले जाणार आहे. आणि ही मोदीची गॅरंटी आहे.

मित्रांनो, 

तुम्हा सर्वांना मी या विकास कामांसाठी खूप खूप शुभेच्छा देत आहे. माझे एक स्वप्न आहे की 2047 पर्यंत आपल्या देशाची गणना विकसित देशांमध्ये झाली पाहिजे. तुम्ही याच्याशी सहमत आहात का?.. देश विकसित झाला पाहिजे….. झाला पाहिजे की नाही. आपला हरियाणा विकसित झाला पाहिजे की नाही ? हे आपले गुरुग्राम विकसित झाले पाहिजे. हे आपले मानेसर विकसित झाले पाहिजे. हिंदुस्थानाचा कानाकोपरा विकसित झाला पाहिजे. हिंदुस्थानातील प्रत्येक गाव विकसित झाले पाहिजे. म्हणून विकासाचा हा उत्सव साजरा करण्यासाठी, या ! माझ्यासोबत आपले मोबाईल फोन बाहेर काढा आणि तुमच्या मोबाईल फोनची फ्लॅश लाईट चालू करा आणि विकासाच्या या उत्सवाला तुम्ही एक समारंभ बनवा….. चारही दिशांना, व्यासपीठावर देखील ज्यांच्याकडे मोबाईल फोन आहेत त्यांनी जरा ते बाहेर काढा.. चारही बाजूला ज्यांच्याजवळ मोबाईल आहेत त्या प्रत्येकाने आपल्या मोबाईलची फ्लॅश लाईट लावा. हा विकासाचा उत्सव आहे, विकासाचा संकल्प आहे. हा तुमच्या भावी पिढ्यांच्या उज्वल भविष्यासाठी मेहनत करण्याचा संकल्प आहे, जीव तोडून मेहनत करण्याचा संकल्प आहे. माझ्यासोबत म्हणा…

भारत माता की जय!

भारत माता की जय!

भारत माता की जय!

खूप खूप धन्यवाद!

* * *

NM/Vasanti/Shraddha/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2013717) Visitor Counter : 35