सांस्कृतिक मंत्रालय
सुभाषचंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित “सुभाष अभिनंदन” या डिजिटल प्रदर्शनाचे केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते उद्घाटन
प्रविष्टि तिथि:
11 MAR 2024 3:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 11 मार्च 2024
भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार आपला 134 वा स्थापना दिवस साजरा करत आहे. यानिमित्त, कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), संसदीय कामकाज आणि संस्कृती मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी आज सुभाष चंद्र बोस यांच्या जीवनावर आधारित "सुभाष अभिनंदन" या डिजिटल प्रदर्शनाचे उद्घाटन केले. हे प्रदर्शन राष्ट्रीय अभिलेखागारामध्ये उपलब्ध दस्तऐवजांवर आधारित आहे.

अमृतकाळाच्या या कालावधीत, आपली मुळे बळकट करण्यासाठी आणि भविष्याचा पाया रचण्यासाठी, आधुनिक भारताचा पाया रचणारा आपला इतिहास शब्दबद्ध करणे, वाचणे, लिहिणे आणि समजून घेणे अत्यंत आवश्यक आहे, असे मेघवाल यांनी यावेळी बोलताना सांगितले. “वारसाही, विकासही’ आणि भारताला प्रत्येक क्षेत्रात जागतिक आघाडीवर आणणे हे आपले ध्येय आहे आणि अभिलेखागार क्षेत्र त्या दिशेने मोठे योगदान देत आहे, असे त्यांनी सांगितले.

नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या वैयक्तिक नोंदी भारताच्या राष्ट्रीय अभिलेखागारात जतन केल्या जातात आणि नेताजी पोर्टल (http://www.netajipapers.gov.in/) आणि अभिलेख पटल (https://www.abhilekh-patal.in/jspui/) या माध्यमातून या नोंदी पाहता येतात. या नोंदींमध्ये सुभाषचंद्र बोस यांनी लिहिलेली पत्रे, त्यांचे वडील जानकीनाथ बोस यांची रोजनिशी, आझाद हिंद फौजेचे दस्तऐवज आणि त्यांच्याशी संबंधित अनेक सरकारी कागदपत्रे उपलब्ध आहेत.

या प्रदर्शनात त्यांच्या जन्मापासून ते आजपर्यंतच्या काळातील 16 विभागांचा समावेश आहे.जानकी नाथ बोस यांची रोजनिशी , त्यांचा जन्म, त्यांचा नागरी सेवा परीक्षेचे निकाल आणि बऱ्याच महत्त्वाच्या गोष्टी या प्रदर्शनात मांडलेल्या दस्तऐवजांच्या माध्यमातून त्यांच्या जीवनाची झलक दर्शवतात. 1920 ते 1940 दरम्यानच्या लढ्याची दशकांचे चांगल्या प्रकारे दस्तऐवजीकरण करण्यात आले आहे, ज्यात त्यांची भाषणे, त्यांचा साहसी प्रवास आणि आझाद हिंद फौजेच्या लढ्याचा सूक्ष्म दृष्टिकोन पाहायला मिळतो. याव्यतिरिक्त, त्यांचे पुरस्कार आणि त्यांना भारतरत्न पुरस्कार द्यायला झालेल्या विलंबाची कारणे आणि नेताजींचा सन्मान करण्यासाठी सांस्कृतिक मंत्रालयाने केलेल्या प्रयत्नांना या प्रदर्शनात दर्शवण्यात आले आहे. या प्रदर्शनातील 16 विभाग सुभाषचंद्र बोस यांचा जन्म, त्यांची विलक्षण प्रतिभा, स्वातंत्र्यसैनिक-I, स्वातंत्र्यसैनिक-II, स्वातंत्र्यसैनिक-III, आंतरराष्ट्रीय उपक्रम, लेख आणि भाषण-I, लेख आणि भाषणे-II, साहसी प्रवास, आझाद हिंद फौज (सेनापती)-I, आझाद हिंद फौज (राणी झाशी रेजिमेंट)-II, आझाद हिंद फौज (अलंकरण )-III, दिल्ली चलो, एक रहस्य (एक रहस्य), भारतरत्न आणि सर्वांचे प्रयत्न हे त्यांच्या जीवनातील विविध पैलू मांडतात. हे प्रदर्शन एक अनोखा अनुभव देते आणि ते आभासी माध्यमातही उपलब्ध आहे.

भारतीय राष्ट्रीय अभिलेखागार भांडारात सध्या 34 कोटी पेक्षा जास्त पानांचा सार्वजनिक नोंदींचा संग्रह आहे, ज्यात नस्त्या , खंड, नकाशे, भारताच्या राष्ट्रपतींनी मंजूर केलेली विधेयके, करार, दुर्मिळ हस्तलिखिते, प्राच्य अभिलेख, खाजगी कागदपत्रे,नकाशाशास्त्र नोंदी, राजपत्रे आणि दर्शनिकांचा महत्त्वाचा संग्रह, जनगणनेच्या नोंदी, विधानसभा आणि संसदेतील चर्चा, प्रतिबंधित साहित्य, प्रवास खाते इ.गोष्टींचा यात समावेश आहे. प्राचीन नोंदींचा मोठा भाग संस्कृत, फारसी आणि ओडियामध्ये आहे.
* * *
S.Patil/S.Chavan/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2013392)
आगंतुक पटल : 174