पंतप्रधान कार्यालय
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी छत्तीसगडमध्ये महतारी वंदन योजनेचा केला प्रारंभ
महतारी वंदना योजनेअंतर्गत पहिल्या हप्त्याचे झाले वितरण
छत्तीसगडमध्ये राज्यातील पात्र विवाहित महिलांना प्रति महिना 1000 रुपये आर्थिक सहाय्य थेट बँक खात्यात प्रदान करण्यासाठी योजना
Posted On:
10 MAR 2024 2:55PM by PIB Mumbai
"आमचे सरकार प्रत्येक कुटुंबाचे सर्वांगीण कल्याण सुनिश्चित करण्यासाठी वचनबद्ध आहे आणि याची सुरुवात महिलांच्या आरोग्य आणि सन्मानाने होते"
छत्तीसगडमध्ये महिला सक्षमीकरणाला मोठ्या प्रमाणात चालना देण्यासाठी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महतारी वंदना योजना सुरू केली आणि या योजनेअंतर्गत पहिला हप्ता वितरित केला. राज्यातील पात्र विवाहित महिलांना 1000 रुपये प्रति महिना आर्थिक सहाय्य म्हणून थेट बँक खात्यात जमा करणारी ही योजना छत्तीसगडमध्ये सुरू करण्यात आली आहे. महिलांचे आर्थिक सक्षमीकरण सुनिश्चित करणे, त्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करणे, स्त्री-पुरुष समानतेला प्रोत्साहन देणे आणि कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका बळकट करणे ही उद्दिष्टे ठेवून या योजनेची कल्पना करण्यात आली आहे.
ही योजनेचा लाभ 1 जानेवारी 2024 पर्यंत 21 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या राज्यातील सर्व पात्र विवाहित महिलांना मिळणार आहे. विधवा, घटस्फोटित आणि परित्यक्ता महिला देखील या योजनेसाठी पात्र असतील. सुमारे 70 लाख महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.
यावेळी बोलताना पंतप्रधानांनी माता दंतेश्वरी, माता बंबलेश्वरी आणि माता महामाया या देवतांना नमन केले. पंतप्रधानांनी त्यांच्या नुकत्याच झालेल्या छत्तीसगड राज्याच्या दौऱ्याची आठवण करून दिली. या दौऱ्यात पंतप्रधानांनी सुमारे 35,000 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली होती. आज सरकारने महतारी वंदना योजनेच्या पहिल्या हप्त्याच्या रुपात 655 कोटी रुपये वितरित करून आपले वचन पूर्ण केले आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. या विविध ठिकाणांहून दूरदृश्य प्रणाली मार्फत जोडलेल्या नारी शक्तीबद्दल पंतप्रधानांनी कृतज्ञता व्यक्त केली आणि प्रत्यक्ष उपस्थित न राहता आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली. काल रात्री काशी विश्वनाथ धाम येथे नागरिकांच्या कल्याणासाठी प्रार्थना देखील केल्याचे पंतप्रधानांनी सांगितले. “तुम्हाला हे 1000 रुपये दरमहा मिळतील. ही मोदींची गॅरंटी आहे,” असेही ते म्हणाले.
"जेव्हा माता आणि मुली मजबूत होतात, तेव्हाच कुटुंब मजबूत होते आणि माता आणि मुलींचे कल्याण हे आमच्या सरकारचे प्राधान्य आहे", असे पंतप्रधान म्हणाले. महिलांना त्यांच्या नावावर पक्की घरे आणि उज्ज्वला गॅस सिलिंडर मिळत आहेत. 50 टक्के जन धन खाती महिलांच्या नावावर आहेत, 65 टक्के मुद्रा कर्ज महिलांनी घेतले आहे, 10 कोटींहून अधिक बचत गटातील महिलांना लाभ मिळाला आहे आणि 1 कोटींहून अधिक महिला लखपती दीदी बनल्या आहेत, अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. 3 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याच्या उद्दिष्टाचा पंतप्रधानांनी पुनरुच्चार केला. नमो दीदी कार्यक्रम महिलांचे जीवन बदलत आहे आणि उद्या पंतप्रधान या संदर्भात एक मोठा कार्यक्रम घेणार आहेत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
कुटुंबाच्या कल्याणाचे महत्व पंतप्रधानांनी अधोरेखित केले आणि आरोग्यपूर्ण कुटुंब हे त्यातील स्त्रियांच्या कल्याणावर अवलंबून असते, असे सांगितले. आपले सरकार हे प्रत्येक कुटुंबाच्या समग्र कल्याणाची खात्री देण्यासाठी वचनबद्ध आहे आणि याची सुरुवात स्त्रियांच्या आरोग्य आणि सन्मानातून होते असे मोदी यांनी सांगितले. प्रसूती काळातील मृत्यू तसेच नवजात अर्भकांमधील मृत्यूदर याचा उल्लेख करत त्यांनी गरोदर स्त्रियांना तोंड द्यावे लागत असलेल्या आव्हानांवर काम करण्याची गरज अधोरेखित केली.
या आव्हानांना तोंड देण्यासाठी पंतप्रधानांनी अनेक महत्वाच्या बाबींची घोषणा केली. यामध्ये गरोदर स्त्रियांना मोफत लसीकरण आणि भावी मातांसाठी गर्भारपणात 5,000/- रुपयांची आर्थिक मदत याचा समावेश आहे. आशा आणि आंगणवाडी कर्मचाऱ्यांसारख्या अग्रीम फळीतील कर्मचाऱ्यांसाठी 5 लाख रुपयांपर्यंतची मोफक आरोग्य सेवेची सुविधा असण्यावरही त्यानी भर दिला.
स्वच्छतेच्या योग्य सोयी नसल्यामुळे स्त्रियांना पूर्वी सोसाव्या लागणाऱ्या कष्टांचा उल्लेख करुन पंतप्रधान मोदी म्हणाले. “ घरात संडास नसल्यामुळे आमच्या माता भगिनींना सोसव्या लागलेल्या वेदना आणि अपमानाचे ते दिवस आता मागे पडले ” प्रत्येक घरात संडासाची सुविधा देऊन स्त्रियांच्या आत्मसन्मानाचे रक्षण करण्यासाठी सरकारने केलेले प्रयत्न त्यांनी अधोरेखित केले.
पंतप्रधान मोदी यांनी निवडणूकीत दिलेल्या वचनांप्रति सरकारची असलेली जबाबदारी अधोरेखित केली. सरकार दिलेली वचने पाळते आणि ती प्रत्यक्षात येतील याची खात्री करते. छत्तीसगढच्या नागरिकांना महतारी वंदन योजनेतून दिलेल्या वचनांच्या झालेल्या यशस्वी अंमलबजावणीवर त्यांनी भर दिला.
याशिवाय 18 लाख पक्की घरे अगदी पूर्ण करण्याच्या निश्चयाने काम होत आहे, याची हमीसुद्धा त्यांनी दिली.
शेतीतील सुधारणांवर बोलताना पंतप्रधानांनी छत्तीसगढच्या भातशेती करणाऱ्या शेतकऱ्यांना दिलेल्या वचनांचा उल्लेख करत थकीत बोनससह रक्कम देण्याची खात्री दिली. अटलजींच्या जन्मदिनी वाटप केलेल्या 3700 कोटी रुपयांचा बोनसचा उल्लेख करत शेतकऱ्यांना सहाय्य करण्याच्या सरकारच्य़ा प्रयत्नांची त्यांनी प्रशंसा केली.
सरकारी खरेदी अधोरेखित करताना पंतप्रधान मोदी यांना हमी दिली की “आमचे सरकार छत्तीसगढमध्ये 3100 प्रति क्विंटल हमीभाव देईल”. शेतकऱ्यांकडून 145 टन धान खरेदी केल्याच्या विक्रमाचा त्यांनी गौरव केला. यामुळे शेतकऱ्यांना दिलेली वचने पाळली आणि नवीन मैलाचा दगड निर्माण केला असे ते म्हणाले.
समारोप करताना पंतप्रधान मेदी यांनी सर्वंकष विकासाची कल्पना पुढे नेण्यात सर्व संबधितांनी, विशेषत: महिलांनी घेतलेल्या परिश्रमांवर विश्वास व्यक्त केला. छत्तीसगढच्या नागरिकांना भाजपा सरकारकडून हेच समर्पण आणि सेवा मिळेल असे सांगत आश्वासने पाळण्याची आणि सर्वांच्या प्रगतीची खात्री दिली.
या सोहळ्याला हजर असलेल्यांमध्ये छत्तीसगढचे मुख्यमंत्री विष्णू देव साई, मंत्रीगण आणि लोकप्रतिनिघी यांचा समावेश होता.
***
G.Chippalkatti/S.Mukhedkar/V.Sahajrao/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2013257)
Visitor Counter : 159
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Bengali
,
Manipuri
,
Assamese
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam