पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांनी आसाममधील जोरहाट येथे 17,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन , लोकार्पण  आणि पायाभरणी


ईशान्य प्रदेशासाठी  पंतप्रधानांचा विकास उपक्रम  (पीएम-डिव्हाईन ) योजनेअंतर्गत प्रकल्पांची केली  पायाभरणी

आसाममध्ये पंतप्रधान आवास योजना - ग्रामीण  अंतर्गत बांधलेल्या सुमारे 5.5 लाख घरांचे केले उद्घाटन

आसाममधील 1300 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या महत्त्वाच्या रेल्वे प्रकल्पांचे केले लोकार्पण

"विकसित भारतासाठी ईशान्य प्रदेशाचा विकास होणे आवश्यक आहे"

"काझीरंगा राष्ट्रीय उद्यान अद्वितीय आहे, प्रत्येकाने इथे  भेट द्यावी"

"वीर लचित बोरफुकन हे आसामच्या शौर्याचे आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहेत "

"विकास भी और विरासत भी' हा आमच्या डबल इंजिन सरकारचा मंत्र आहे"

“मोदी संपूर्ण ईशान्य प्रदेशाला आपले कुटुंब मानतात. म्हणूनच वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांवर आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत."

Posted On: 09 MAR 2024 2:12PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आसाममधील जोरहाट येथे 17,500 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटन, लोकार्पण आणि पायाभरणी केली. आजच्या विकास प्रकल्पांमध्ये आरोग्य, तेल आणि वायू, रेल्वे आणि गृहनिर्माण या क्षेत्रांचा समावेश आहे.

पस्थितांना संबोधित करताना, पंतप्रधानांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि राज्यातील  200 वेगवेगळ्या ठिकाणांहून 2 लाख लोक या कार्यक्रमात सहभागी झाल्याचे नमूद केले.  कोलाघाटमधील  लोकांनी हजारो दिवे प्रज्वलित केल्याचा उल्लेख मोदी यांनी केला  आणि  लोकांचे प्रेम व आपुलकी ही आपली सर्वात मोठी संपत्ती असल्याचे सांगितले. आज  आरोग्य, गृहनिर्माण आणि पेट्रोलियम या क्षेत्रांशी संबंधित सुमारे 17,500 कोटी रुपयांच्या  विकास प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण करून आसामच्या विकासाला गती दिल्याचे त्यांनी अधोरेखित केले.

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाच्या भेटीबद्दल बोलताना, पंतप्रधानांनी हे एक अद्वितीय राष्ट्रीय उद्यान आणि व्याघ्र प्रकल्प असल्याचे नमूद केले  आणि युनेस्कोच्या या जागतिक वारसा स्थळातील जैवविविधता आणि परिसंस्थेतील आकर्षण अधोरेखित केले.  “70 टक्के एकशिंगी  गेंडे काझीरंगामध्ये आहेतअसे ते म्हणाले. दलदलीच्या प्रदेशात हरीण, वाघ, हत्ती, रान म्हैस असे वन्यजीव शोधण्याचा अनुभवाबाबतही  त्यांनी सांगितले.  निष्काळजीपणा आणि गुन्हेगारांशी लागेबांधे यामुळे गेंडा कसा धोक्यात आला आहे  याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधले आणि 2013 मध्ये एकाच वर्षात 27 गेंड्यांची शिकार झाल्याची आठवण करून दिली. सरकारच्या प्रयत्नांमुळे 2022 मध्ये ही संख्या शून्यावर आली. काझीरंगाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आसामच्या जनतेला  पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आणि नागरिकांना या राष्ट्रीय उद्यानाला भेट देण्याचे आवाहन केले.

पंतप्रधानांनी आज वीर लचित बोरफुकन यांच्या भव्य पुतळ्याचे अनावरण केल्याचा उल्लेख केला आणि सांगितले , “वीर लचित बोरफुकन हे आसामच्या शौर्याचे आणि दृढनिश्चयाचे प्रतीक आहेत ”. वर्ष 2022 मध्ये नवी दिल्ली येथे त्यांची 400 वी जयंती मोठ्या उत्साहात आणि सन्मानाने साजरी केल्याची आठवण त्यांनी सांगितली आणि या शूर योद्ध्याला त्यांनी नमन केले.

"विकास भी और विरासत भी', विकास आणि वारसा हा आमच्या डबल इंजिन सरकारचा मंत्र आहे," असे पंतप्रधान म्हणाले. ते म्हणाले की, आसामने पायाभूत सुविधा, आरोग्य आणि ऊर्जा क्षेत्रात वेगवान प्रगती केली आहे. एम्स, तिनसुकिया वैद्यकीय महाविद्यालयशिव सागर वैद्यकीय महाविद्यालय आणि जोरहाटमधील कर्करोग रुग्णालय यांसारख्या आरोग्य विषयक पायाभूत सुविधा आसामला संपूर्ण ईशान्य प्रदेशाचे वैद्यकीय केंद्र बनवेल असे ते म्हणले.

पंतप्रधान ऊर्जा गंगा योजनेंतर्गत बरौनी - गुवाहाटी पाइपलाइनच्या लोकार्पणाचाही पंतप्रधानांनी उल्लेख केला.ते म्हणाले  की गॅस पाइपलाइन ईशान्य ग्रीडला राष्ट्रीय ग्रीडशी जोडेल आणि 30 लाख घरांना आणि 600 हून अधिक सीएनजी केंद्रांना गॅस पुरवण्यास मदत करेल, आणि याचा  बिहार, पश्चिम बंगाल आणि आसाममधील 30 हून अधिक जिल्ह्यांतील लोकांना फायदा होईल.

दिगबोई रिफायनरी आणि गुवाहाटी रिफायनरीच्या विस्ताराच्या उद्घाटनाबाबत बोलताना पंतप्रधान म्हणाले की, आसाममधील रिफायनरीची क्षमता वाढवण्याच्या लोकांच्या दीर्घकालीन  मागणीकडे मागील सरकारांनी दुर्लक्ष केले होते. सध्याच्या सरकारच्या प्रयत्नांमुळे आसाममधील रिफायनरीची एकूण क्षमता आता दुप्पट होईल तर नुमालीगड रिफायनरीची क्षमता तिप्पट होईल यावर त्यांनी भर दिला. "जेव्हा विकासाचा हेतू प्रबळ असतो तेव्हा कोणत्याही प्रदेशाचा विकास वेगाने होतो", असे त्यांनी नमूद केले.

आज पक्की घर मिळालेल्या 5.5 लाख कुटुंबांचे पंतप्रधानांनी अभिनंदन केले.  ही घरे केवळ घरे नसून शौचालय, गॅस कनेक्शन, वीज आणि नळाद्वारे पाणी यासारख्या सुविधांनी युक्त आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.  आतापर्यंत 18 लाख कुटुंबांना अशी घरे देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. यातील बहुतांश घरे महिलांच्या नावावर असल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला.

आसाममधील प्रत्येक महिलेचे जीवन सुसह्य करण्याच्या आणि तिच्या बचतीत सुधारणा करण्याच्या सरकारच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार करत पंतप्रधानांनी काल महिला दिनानिमित्त गॅस सिलिंडरची किंमत 100 रुपयांनी कमी करण्याच्या सरकारच्या निर्णयाचा उल्लेख केला. आयुष्मान कार्डसारख्या योजनांचाही महिलांना फायदा होत आहे. आसाममध्ये जल जीवन मिशन अंतर्गत 50 लाखांहून अधिक कुटुंबांना नळाद्वारे पाण्याची जोडणी मिळाली आहे, असे त्यांनी सांगितले. 3 कोटी लखपती दीदी निर्माण करण्याच्या वचनबद्धतेचाही त्यांनी पुनरुच्चार केला.

आसाममध्ये 2014 नंतर झालेल्या ऐतिहासिक बदलांवर प्रकाश टाकताना पंतप्रधानांनी 2.5 लाखांहून अधिक भूमिहीन मूळ रहिवाशांना जमिनीचा हक्क प्रदान केल्याचा आणि सुमारे 8 लाख चहाच्या मळ्यातील कामगारांना बँकिंग प्रणालीशी जोडल्याचा उल्लेख केला. यामुळे सरकारी लाभ थेट त्यांच्या बँक खात्यांमध्ये हस्तांतरित करणे शक्य झाले असून यामुळे दलालांसाठी भ्रष्टाचार करण्याचे सर्व दरवाजे बंद झाले आहेत, असे पंतप्रधान म्हणाले.

"विकसित भारतासाठी ईशान्येकडील राज्यांचा विकास अत्यावश्यक आहे", असे पंतप्रधान म्हणाले.  मोदी संपूर्ण ईशान्येला आपले कुटुंब मानतात. म्हणूनच वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या प्रकल्पांवरही आम्ही लक्ष केंद्रित करत आहोत, असे पंतप्रधान म्हणाले. सराईघाटावरील पूल, ढोला-सादिया पूल, बोगीबील पूल, बराक व्हॅलीपर्यंत रेल्वे ब्रॉडगेजचा विस्तार, जोगीघोपा येथील मल्टी-मोडल लॉजिस्टिक पार्क, ब्रह्मपुत्रा नदीवरील दोन नवीन पूल आणि ईशान्येकडील 18 जलमार्ग, जे  2014 मध्ये आसाममध्ये केवळ 1पुरता मर्यादित होते,या सर्व प्रकल्पांचा उल्लेख पंतप्रधानांनी केला. या प्रकल्पांमुळे या प्रदेशात नवीन संधी निर्माण झाल्या असल्याचे ते म्हणाले. मंत्रिमंडळाच्या मागे झालेल्या बैठकीत विस्तारित व्याप्तीसह नव्या स्वरूपात मंजूर झालेल्या उन्नती (UNNATI) योजनेचाही त्यांनी उल्लेख केला. मंत्रिमंडळाने तागाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ केली असून त्याचा फायदा राज्यातील ताग उत्पादक शेतकऱ्यांना होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

पंतप्रधानांनी जनतेच्या प्रेम आणि आपुलकीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि प्रत्येक भारतीय हे त्याचे कुटुंब असल्याचे सांगितले.  भारतातील 140 कोटी नागरिक हे आपले कुटुंबीय आहेत, असे केवळ मोदींना वाटत असल्यामुळे मोदींवर जनतेचे प्रेम निर्माण झाले आहे असे नाही, तर आपण रात्रंदिवस त्यांची सेवा करत आहेत म्हणून हे ऋणानुबंध जुळले आहेत”, असे सांगून पंतप्रधान म्हणाले की, आजचा प्रसंग याच विश्वासाचे प्रतिनिधित्व करतो. आजच्या विविध विकास प्रकल्पांसाठी नागरिकांचे अभिनंदन करून भारत माता की जयच्या जयघोषाने पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

यावेळी आसामचे मुख्यमंत्री डॉ हिमंता बिस्वा सरमा आणि केंद्रीय मंत्री  सर्बानंद सोनोवाल यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

 पार्श्वभूमी

 ईशान्य प्रदेशासाठी  पंतप्रधानांचा विकास उपक्रम   (PM-DevINE) योजनेंतर्गत पंतप्रधानांनी शिवसागर येथील वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय तसेच गुवाहाटीमधील हिमॅटो-लिम्फॉइड केंद्रासह इतर प्रकल्पांची पायाभरणी केली.  दिगबोई रिफायनरीची क्षमता 0.65 ते 1 एमएमटीपीए (वार्षिक दशलक्ष मेट्रिक टन) विस्तारण, गुवाहाटी रिफायनरी विस्तार (1.0 ते 1.2 MMTPA) कॅटॅलिटिक रिफॉर्मिंग युनिट (CRU) ची स्थापना आणि इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या गुवाहाटीतील, बेटकुची टर्मिनल येथे सुविधा विस्तार, इतरांसह तेल आणि वायू क्षेत्रातील महत्त्वाच्या प्रकल्पांची पायाभरणी पंतप्रधानांनी केली.

 पंतप्रधानांनी तिनसुकिया येथील नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय आणि सुमारे 3,992 कोटी रुपये खर्चून टाकण्यात आलेली 718 किमी लांबीची बरौनी - गुवाहाटी पाईपलाईन (प्रधानमंत्री ऊर्जा गंगा प्रकल्पाचा भाग) यासारखे महत्त्वाचे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले.  प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण  अंतर्गत सुमारे 8,450 कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या सुमारे 5.5 लाख घरांचे उद्घाटनही पंतप्रधानांनी केले. पंतप्रधानांनी आसाममधील धुपधारा-छायगाव विभाग (नवीन बोंगाईगाव गुवाहाटी व्हाया गोलपारा दुहेरीकरण प्रकल्पाचा भाग) आणि नवीन बोंगाईगाव सोरभोग विभाग (नवीन बोंगाईगाव अगथोरी दुहेरीकरण प्रकल्पाचा भाग) यासह आसाममधील 1300 कोटींहून अधिक किमतीचे महत्त्वाचे रेल्वे प्रकल्प राष्ट्राला समर्पित केले.

***

S.Kakade/S.Kane/S.Mukhedkar/P.Kor

*** 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2013019) Visitor Counter : 57