पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांच्या हस्ते पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे 15,400 कोटी रुपयांच्या बहुविध ‘कनेक्टिव्हिटी’ प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी


एस्प्लेनेड - हावडा मैदान मेट्रो मार्गावर मेट्रोने प्रवास, कोलकाता येथे भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो

हावडा मैदान-एस्प्लेनेड मेट्रो विभागामध्‍ये नदीच्या पाण्याखालील पहिला मेट्रो वाहतूक बोगदा तयार झाला, हा अभिमानाचा क्षण: पंतप्रधान

Posted On: 06 MAR 2024 3:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 6 मार्च 2024 

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज कोलकाता येथे 15,400 कोटी रुपयांच्या बहुविध ‘कनेक्टिव्हिटी’ प्रकल्पांचे लोकार्पण केले तसेच काही प्रकल्पांची पायाभरणी केली. शहरी वाहतूक क्षेत्राला पूरक असलेल्या विकास प्रकल्पांमध्ये मेट्रो रेल्वे आणि प्रादेशिक जलद परिवहन प्रणाली (आरआरटीएस) यांचा समावेश आहे.

पंतप्रधानांनी सर्व मेट्रो प्रकल्पांचा आढावा घेतला आणि कोलकात्यामध्‍ये  भारतातील पहिल्या पाण्याखालून धावणाऱ्या मेट्रोने, एस्प्लेनेड - हावडा मैदान मेट्रो मार्गावर प्रवास केला. या मेट्रो प्रवासादरम्यान त्यांनी श्रमिक आणि शाळकरी मुलांशीही संवाद साधला.

एक्स या समाजमाध्यमावरील पोस्ट मध्ये, पंतप्रधान म्हणाले:

“या प्रकल्पावर काम करणारी श्रमजीव मंडळी आणि तरुणांचा  सहवास मिळाला, त्यांच्याशी संवाद साधला; त्यामुळे  मेट्रोचा हा प्रवास संस्मरणीय बनला. हुगळी नदीखालच्या बोगद्यातूनही आम्ही प्रवास केला."

"कोलकातावासीयांसाठी आजचा दिवस  अतिशय खास  आहे. कोलकाता शहरात मेट्रोच्या जाळ्याचा लक्षणीयरीत्या विस्तार झाल्यामुळे दळणवळणाला चालना मिळेल आणि वाहतुकीची कोंडी कमी होईल. हावडा मैदान-एस्प्लेनेड मेट्रो विभागात देशातील एका मोठ्या नदीखाली मेट्रो वाहतुकीसाठीचा पहिला बोगदा विकसित करण्यात आला आहे हा एक अभिमानाचा क्षण आहे.”

"कोलकाता मेट्रोचे हे अविस्मरणीय क्षण आहेत. मी जनशक्तीला अभिवादन करतो आणि नव्या जोमाने त्यांची सेवा करत राहीन अशी ग्वाही देतो ”

पश्चिम बंगालचे राज्यपाल सी व्ही आनंदा बोस यावेळी उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

शहरातील रहदारी अधिक सहजसोपी करण्यासाठी विविध मार्ग विकसित झाले पाहिजेत, या मुद्द्यावर पंतप्रधानांनी भर दिला. हावडा मैदान - एस्प्लेनेड मेट्रो विभाग, कवी सुभाष - हेमंता मुखोपाध्याय मेट्रो विभाग, तरातला - माजेरहाट मेट्रो विभाग (जोका-एस्प्लानेड मार्गिकेचा भाग); पुणे येथील रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडीपर्यंत पुणे मेट्रो; एसएन जंक्शन मेट्रो स्टेशन ते त्रिपुनिथुरा मेट्रो स्टेशन पर्यंत कोची मेट्रो रेल पहिला टप्पा,  विस्तार प्रकल्प (फेज आयबी); आग्रा मेट्रोचा ताज पूर्व गेट ते मनकामेश्वरपर्यंतचा मार्ग; आणि दिल्ली-मेरठ आरआरटीएस कॉरिडॉरचा दुहाई-मोदीनगर (उत्तर) विभाग या प्रकल्पांचे पंतप्रधानांनी उद्घाटन केले. या विभागांतील रेल्वेगाड्यांना पंतप्रधानांनी हिरवा झेंडा दाखवला. पिंपरी चिंचवड मेट्रो-निगडी दरम्यान पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याच्या विस्तारीकरण कामाची पायाभरणीही पंतप्रधानांनी केली.

हे विभाग रस्त्यावरील रहदारी कमी करण्यासाठी मदत करतील आणि अखंड, सुलभ आणि आरामदायी कनेक्टिव्हिटी प्रदान करतील. कोलकाता मेट्रोच्या हावडा मैदान - एस्प्लेनेड मेट्रो विभागात भारतातील पहिला पाण्याखाली बांधलेला वाहतूक बोगदा आहे. हावडा मेट्रो स्टेशन हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे. तसेच, माजेरहाट मेट्रो स्टेशन, तरातला - माजेरहाट मेट्रो विभागाचे आज उद्घाटन करण्यात आले. रेल्वे मार्ग, रेल्वे स्थानक आणि कालव्यावर बांधलेले हे एक आगळेवेगळे मेट्रो स्टेशन आहे. आग्रा मेट्रोच्या आज उद्घाटन झालेल्या टप्प्यामुळे या भागातील  ऐतिहासिक पर्यटन स्थळांना जोडणारी  चांगली संपर्क यंत्रणा तयार झाली आहे. त्यामुळे  या स्थळांना भेट देणा-या पर्यटकांची संख्या वाढेल.  आरआरटीएस अर्थात विभागीय जलद वाहतूक यंत्रणेमुळे या  विभागातील  उत्तर मध्य रेल्वेच्या आर्थिक व्यवहारांना चालना मिळेल.

 

 

 

 

 

 

 

 

* * *

S.Bedekar/JPS/Vasanti/Prajna/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2011906) Visitor Counter : 124