पंतप्रधान कार्यालय

ओदिशात जाजपुर येथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन करताना पंतप्रधानांनी केलेल्या भाषणाचा मजकूर

Posted On: 05 MAR 2024 5:23PM by PIB Mumbai

ओदिशाचे राज्यपाल श्री. रघुवर दास जी, येथील लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. नवीन पटनायक जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी धर्मेंद्र प्रधान जी, बिश्वेश्वर तुडू जी, इतर मान्यवर, आणि स्त्री-पुरुष सज्जनहो!

जय जगन्नाथ.

आज भगवान जगन्नाथ आणि आई बिरजाच्या आशीर्वादाने जाजपूर आणि ओदिशामध्ये विकासाचा नवा प्रवाह वाहू लागला आहे.  आज बिजू बाबूजींची जयंती देखील आहे. ओदिशाच्या विकासात आणि देशाच्या विकासात बिजू बाबूंचे योगदान अतुलनीय आहे.  सर्व देशवासियांच्या वतीने मी वंदनीय बिजू बाबूंना आदरांजली अर्पण करतो, त्यांना नमस्कार करतो!

मित्रांनो,

आज येथे 20 हजार कोटी रुपयांच्या मोठ्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी झाली आहे.  पेट्रोलियम, नैसर्गिक वायू आणि अणुऊर्जा या योजना असोत; रस्ते, रेल्वे आणि वाहतुकीशी संबंधित योजना असोत, या विकासकामांमुळे येथील औद्योगिक उलाढाली वाढतील आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील.  या प्रकल्पांसाठी मी ओदिशातील सर्व जनतेचे अभिनंदन करतो.

मित्रांनो

आज देशात असे सरकार आहे, जे वर्तमानाचीही काळजी वाहत आहे आणि विकसित भारताच्या संकल्पासह  भविष्यासाठीही काम करत आहे.  ऊर्जा क्षेत्रात आम्ही राज्यांची, विशेषतः पूर्व भारताची क्षमता आणखी वाढवत आहोत.  उर्जा गंगा प्रकल्पा अंतर्गत, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल आणि ओदिशा या 5 मोठ्या राज्यांमध्ये नैसर्गिक वायूच्या पुरवठ्यासाठी मोठे प्रकल्प सुरू आहेत. आज,  पारादीप-सोमनाथपूर-हल्दिया ही वाहिनीही (पाइपलाइन)देशसेवेसाठी समर्पित करण्यात आली आहे.  आज पारादीप तेल शुद्धीकरण प्रकल्पात (रिफायनरी)  नैसर्गिक वायू प्रक्रियेच्या एका संचाचे उद्घाटन झाले आहे.  पारादीप रिफायनरीत मोनो इथिलीन ग्लायकॉलच्या नवीन संयंत्राचेही (प्लांट) उद्घाटन झाले आहे.  यामुळे पूर्व भारतातील पॉलिस्टर उद्योगात नवी क्रांती होणार आहे.  या प्रकल्पामुळे भद्रक आणि पारादीप येथे उभारण्यात येत असलेल्या वस्त्रोद्योग केंद्रालाही (टेक्सटाईल पार्क) कच्चा माल सहज उपलब्ध होणार आहे.

मित्रांनो

आपल्या देशात गेल्या काही वर्षांत कार्यसंस्कृती किती झपाट्याने बदलली आहे, याचे आजची घटना म्हणजे जीवंत उदाहरण आहे.  पूर्वीच्या सरकारांना, प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यात रस नव्हता.आमचे सरकार मात्र, ज्या प्रकल्पाची पायाभरणी करते तो जलद गतीने पूर्ण करण्याचा प्रयत्न करते.  2014 नंतर देशात असे अनेक प्रकल्प पूर्ण झाले आहेत, जे रखडले होते, प्रलंबित होते आणि भरकटलेही होते.  पारादीप रिफायनरीचे सूतोवाचही  2002 मध्येच झाले होते.  परंतु 2013-14 पर्यंत काहीच हालचाल झाली नाही.  आमच्या सरकारनेच पारादीप रिफायनरीचे काम पूर्ण केले.  आजच मी तेलंगणातील संगारेड्डी येथे पारादीप-हैदराबाद पाइपलाइन प्रकल्पाचे उद्घाटन केले.  3 दिवसांपूर्वी पश्चिम बंगालच्या आरामबागमध्ये हल्दिया ते बरौनीपर्यंत 500 किमीपेक्षा जास्त लांबीची कच्च्या तेलाची पाइपलाइन सुरू झाली आहे.

मित्रांनो

पूर्व भारताला नैसर्गिक साधनसंपत्तीचे वरदान लाभले आहे. आमचे सरकार, या साधनसंपत्तीचा, ओदिशासारख्या राज्यातील दुर्मिळ खनिज संपत्तीचा उपयोग विकासासाठी करत आहे.  आज गंजम जिल्ह्यात डिसलिनेशन प्लांटची (विक्षारण करुन खारे पाणी गोडे करण्याचा प्रकल्प) पायाभरणी करण्यात आली आहे.  ओदिशातील हजारो लोकांना याचा फायदा होणार आहे.  या प्रकल्पाच्या माध्यमातून दररोज 50 लाख लिटर खारे पाणी, पिण्यायोग्य केले जाणार आहे.

मित्रांनो

ओदिशाची साधनसंपत्ती आणि राज्याची औद्योगिक ताकद आणखी वाढवण्यासाठी केंद्र सरकार येथे आधुनिक दळणवळणावर भर देत आहे.  गेल्या 10 वर्षात या दृष्टीने अभूतपूर्व काम झाले आहे.  गेल्या 10 वर्षांत आम्ही ओदिशात सुमारे 3 हजार किलोमीटरचे राष्ट्रीय महामार्ग बांधले आहेत आणि रेल्वेसाठीच्या आर्थिक तरतुदींमध्ये सुमारे 12 पट वाढ केली आहे.  रेल्वे, महामार्ग आणि बंदर दळणवळण सुधारण्यासाठी राष्ट्रीय महामार्गाचा विस्तार जाजपूर, भद्रक, जगतसिंगपूर, मयूरभंज, खोरधा, गंजम, पुरी आणि केंदुझार या जिल्ह्यांपर्यंत केला जात आहे.  आता अंगुळ-सुकिंदा नवीन रेल्वे मार्गाची सुविधाही येथील लोकांसाठी उपलब्ध झाली आहे.  यामुळे कलिंगनगर औद्योगिक क्षेत्राच्या विस्ताराचा मार्ग मोकळा झाला आहे.  ओदिशाच्या विकासासाठी केंद्र सरकार अशाच वेगाने काम करत राहील.  मी पुन्हा एकदा बिजू बाबूंचे त्यांच्या जयंतीनिमित्त श्रद्धेने स्मरण करतो आणि विकास कामांसाठी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो.

जय जगन्नाथ!

 ***

JPS/AS/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 2011872) Visitor Counter : 40