पंतप्रधान कार्यालय

पश्चिम बंगालमधील कृष्णानगर येथे विविध प्रकल्पांच्या उदघाटनप्रसंगी पंतप्रधानांनी केलेले संबोधन

Posted On: 02 MAR 2024 12:03PM by PIB Mumbai
पश्चिम बंगालचे राज्यपाल सीव्ही आनंद बोस जी, मंत्रिमंडळातील माझे सहकारी शंतनू ठाकूर जी, बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते सुवेन्दू अधिकारी जी, संसदेतील माझे सहकारी जगन्नाथ सरकार जी, राज्य सरकारचे मंत्री महोदय, इतर मान्यवर, बंधू आणि भगिनींनो.
आज आपण पश्चिम बंगालला विकसित राज्य बनवण्याच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकत आहोत. कालच मी बंगालच्या सेवेसाठी आरामबागमध्ये हजर होतो. तिथे मी सुमारे 7 हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी केली. यामध्ये रेल्वे, बंदरे आणि पेट्रोलियमशी संबंधित अनेक मोठ्या योजना होत्या. आणि आज पुन्हा एकदा, सुमारे 15 हजार कोटी रुपयांच्या विकासकामांचे लोकार्पण आणि पायाभरणी करण्याचे सौभाग्य मला लाभले आहे. वीज, रस्ते आणि रेल्वेच्या चांगल्या सुविधांमुळे बंगालच्या माझ्या बंधू-भगिनींचे जीवन सुसह्य होईल. या विकासकामांमुळे पश्चिम बंगालच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल तसेच तरुणांना रोजगाराच्या नवीन संधीही उपलब्ध होतील. या निमित्ताने मी तुम्हा सर्वांचे अभिनंदन करतो आणि तुम्हाला शुभेच्छा देतो.
मित्रांनो,
आधुनिक युगात विकासाला गती देण्यासाठी विजेची नितांत गरज आहे. कोणत्याही राज्यातील उद्योग असोत, आधुनिक रेल्वे सुविधा असोत किंवा आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडीत आपले दैनंदिन जीवन असो, विजेच्या कमतरतेमुळे कोणतेही राज्य, कोणताही देश विकसित होऊ शकत नाही. त्यामुळे, पश्चिम बंगालला सध्याच्या आणि भविष्यातील विजेच्या गरजांमध्ये आत्मनिर्भर बनवण्याचा आमचा प्रयत्न आहे. आज दामोदर खोरे महामंडळांतर्गत रघुनाथपूर औष्णिक ऊर्जा केंद्र -टप्पा -2 प्रकल्पाची पायाभरणी हे या दिशेने एक मोठे पाऊल आहे. या प्रकल्पामुळे राज्यात 11 हजार कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक होणार आहे. यामुळे राज्याच्या ऊर्जेच्या गरजा तर पूर्ण होतीलच पण आसपासच्या भागातील आर्थिक विकासाला चालना मिळेल. आज या औष्णिक वीज प्रकल्पाच्या पायाभरणीसोबतच मी मेजिया औष्णिक ऊर्जा केंद्राच्या एफजीडी प्रणालीचे उद्घाटन केले. ही एफजीडी प्रणाली पर्यावरणाबाबत भारताच्या सजगतेचे प्रतीक आहे. यामुळे या भागातील प्रदूषण कमी होण्यास मोठा हातभार लागणार आहे.
मित्र हो,

पश्चिम बंगाल आपल्या देशासाठी, देशातल्या अनेक राज्यांसाठी पूर्वेकडील द्वार म्हणून काम करीत आहे. पूर्वेकडे या द्वारातून प्रगतीच्या अमर्याद संधीचा प्रवेश होऊ शकतो. यासाठीच, पश्चिम बंगाल मध्ये आपले सरकार रेल्वे मार्ग, हवाई मार्ग आणि जलमार्गाच्या आधुनिक संपर्क व्यवस्थेसाठी काम करीत आहे. आजसुद्धा मी फरक्का ते रायगंजच्या मध्ये राष्ट्रीय महामार्ग-12 चे उद्घाटन केले आहे. NH-12 चे उद्घाटन केले आहे. यासाठी सुमारे दोन हजार कोटी रुपये खर्च झाले आहेत. या महामार्गामुळे बंगालच्या जनतेचा प्रवासाचा वेग वाढेल. फरक्का ते रायगंज पर्यंतचा जो पूर्ण प्रवास आहे त्यात चार तासांवरून कपात होऊन तो निम्म्यावर येईल. त्याचबरोबर, यामुळे कालियाचक, सुजापुर, मालदा टाउन इत्यादी शहरी भागातल्या दळणवळण स्थितीतही सुधारणा होईल. जेव्हा वाहतुकीचा वेग वाढेल तेव्हा औद्योगिक क्रियान्वयन देखील वेगाने होईल. यामुळे या भागातल्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळेल.

मित्र हो

पायाभूत सुविधांच्या दृष्टिकोनातून रेल्वे पश्चिम बंगालच्या गौरवस्पद इतिहासाचा भाग आहे. मात्र, इतिहासाची जी आघाडी बंगालला प्राप्त झाली होती ती स्वातंत्र्यानंतर योग्य प्रकारे वाढवता आली  नाही, हेच कारण आहे की एवढ्या संधी मिळूनही बंगालची पीछेहाट होत गेली. गेल्या दहा वर्षात आम्ही ही दरी भरून काढण्यासाठी रेल्वेच्या पायाभूत सुविधांवर खूप भर दिला आहे. आज आपले सरकार बंगाल मधील रेल्वेच्या पायाभूत सुविधांसाठी आधीच्या तुलनेत दुपटीने जास्त निधी खर्च करत आहे. आज सुद्धा मी इथे एकत्रितरीत्या भारत सरकारचे 4-4 रेल्वे प्रकल्प बंगालला समर्पित करीत आहे, ही सर्व विकास कार्य आधुनिक आणि विकसित बंगालची आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका निभावतील. या समारंभात मी आता आपला अधिक वेळ घेऊ इच्छित नाही. कारण बाहेर 10 मिनिटांच्या अंतरावर बंगालची जनता जनार्दन या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भव्य संख्येने उपस्थित आहे. ते माझी वाट पाहत आहेत आणि मी सुद्धा तिथे मोकळ्या मनाने मनःपूर्वक खूप काही सांगू इच्छितो; आणि यामुळेच मी सर्व गोष्टी तिथेच बोललो तर बरे होईल. इथल्यासाठी बास एवढंच पुरेसं आहे. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना या प्रकल्पांसाठी खूप खूप शुभेच्छा देत आहे. 

धन्यवाद.

***

Shilpap/VasantiJ/SandeshN/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 2011042) Visitor Counter : 69