पंतप्रधान कार्यालय
azadi ka amrit mahotsav

पंतप्रधानांनी हरियाणातील रेवाडी येथे 9,750 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे केले उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी


सुमारे 5,450 कोटी रुपये खर्चून विकसित केल्या जाणाऱ्या गुरुग्राम मेट्रो रेल्वे प्रकल्पाची केली पायाभरणी

सुमारे 1,650 कोटी रुपये खर्चून बांधल्या जाणाऱ्या एम्स रेवाडीची केली पायाभरणी

ज्योतिसर, कुरुक्षेत्र येथे प्रायोगिक संग्रहालय ‘अनुभव केंद्र’ चे केले उद्घाटन

अनेक रेल्वे प्रकल्पांचे केले लोकार्पण आणि पायाभरणी

रोहतक-मेहम-हंसी विभागातील रेल्वे सेवेला दाखवला हिरवा झेंडा

“हरयाणाचे दुहेरी इंजिन सरकार जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी वचनबद्ध”

"विकसित भारत बनवण्यासाठी हरियाणाचा विकास होणे अत्यंत आवश्यक"

"ज्योतिसार अनुभव केंद्र,जगाला भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणूकीची ओळख करून देईल"

"हरियाणा सरकारने पाण्याशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी केले आहे प्रशंसनीय काम"

कापड आणि वस्र प्रावरणे उद्योगात हरियाणा नाव कमावत आहे

"हरियाणा गुंतवणुकीसाठी अव्वल राज्य म्हणून उदयास येत आहे आणि गुंतवणुकीत वाढ म्हणजे रोजगाराच्या नवीन संधींमध्ये वाढ”

Posted On: 16 FEB 2024 5:40PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 16 फेब्रुवारी 2024

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज हरियाणातील रेवाडी येथे 9750 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन, राष्ट्रार्पण आणि पायाभरणी केली.  शहरी वाहतूक, आरोग्य, रेल्वे आणि पर्यटन यासंबंधी अनेक महत्त्वाच्या क्षेत्रांतील हे प्रकल्प आहेत. इथल्या प्रदर्शनांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.

पंतप्रधानांनी कार्यक्रमाला संबोधित करताना, रेवाडीच्या शूरवीरांच्या भूमीला आदरांजली वाहिली आणि तेथील लोकांची त्यांच्याबद्दल असलेली आपुलकी अधोरेखित केली. त्यांनी 2013 मध्ये रेवाडी येथे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून केलेल्या पहिल्या कार्यक्रमाचे स्मरण केले आणि लोकांच्या शुभेच्छांचे स्मरण केले.  जनतेचे आशीर्वाद ही आपल्यासाठी मोठी संपत्ती असल्याचे पंतप्रधान म्हणाले. भारताने जगात नवीन उंची गाठल्याचे श्रेय त्यांनी जनतेच्या आशीर्वादांना दिले.

पंतप्रधानांनी, यूएई आणि कतारच्या भेटीबद्दल बोलताना,  जागतिक स्तरावर भारताला मिळालेल्या सन्मान आणि सद्भावनेचे श्रेय भारतीय जनतेला दिले.  त्याचप्रमाणे, जी20, चांद्रयान आणि भारतीय अर्थव्यवस्थेचे 11व्या स्थानावरून 5व्या स्थानावर पोहोचणे हे जनतेच्या पाठिंब्यामुळेच मिळालेले मोठे यश असल्याचे ते म्हणाले. आगामी काळात भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्यासाठी त्यांनी लोकांचे आशीर्वाद मागितले.

देशाला विकसित भारत बनवण्यासाठी हरियाणाचा विकास आवश्यक असल्याचे पंतप्रधान म्हणाले. हरियाणाच्या विकासासाठी सुसज्ज रुग्णालयांसह रस्ते आणि रेल्वे जाळ्याच्या आधुनिकीकरणासाठी सुमारे 10,000 कोटी रुपयांच्या बहुविध विकास प्रकल्पांची आज पायाभरणी  आणि राष्ट्रार्पणाचा त्यांनी उल्लेख केला.  विकास प्रकल्पांची यादी सांगताना पंतप्रधानांनी एम्स रेवाडी, गुरुग्राम मेट्रो, अनेक रेल्वे मार्ग आणि नवीन गाड्या तसेच अनुभव केंद्र ज्योतिसार यांचा उल्लेख केला.

अनुभव केंद्र ज्योतिसरबाबत पंतप्रधान म्हणाले की, हे केन्द्र, भगवद्गीतेतील भगवान श्रीकृष्णाच्या शिकवणूकीची जगाला ओळख करून देईल तसेच भारतीय संस्कृतीत हरियाणाच्या गौरवशाली भूमीच्या योगदानावर प्रकाश टाकेल. आजच्या विकास प्रकल्पांसाठी त्यांनी हरियाणातील जनतेचे अभिनंदन केले.

‘मोदी’ की  गॅरंटी’ याविषयी राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावरही   चर्चा होत आहे, याबाबत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, रेवाडी हे ‘मोदीच्या हमी’चे पहिले साक्षीदार आहे. असे सांगून  त्यांनी  देशाची  अस्मिता असलेल्या,   अयोध्या धाम येथे  श्री रामजन्म भूमीवरील  मंदिर उभारण्‍यात येणारच अशी हमी आपण दिली होती, याचे स्मरण त्यांनी करून दिले.  त्याचप्रमाणे पंतप्रधान  मोदींनी दिलेल्या हमीनुसार कलम 370 रद्द करण्यात आले. “आज जम्मू-काश्मीरमध्ये महिला, मागासवर्गिय, दलित, आदिवासी यांना त्यांचे हक्क मिळत आहेत”, असेही ते म्हणाले.

रेवाडी येथे माजी सैनिकांना ‘वन रँक वन पेन्शन’ दिली जाईल, याची  हमी पूर्ण केल्याचे स्मरणही पंतप्रधानांनी केले आणि आतापर्यंत सुमारे एक लाख कोटी रुपये उपलब्ध करून दिल्याची माहिती दिली आणि त्याचा हरियाणातील अनेक माजी सैनिकांनी लाभ घेतला असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.  ते पुढे म्हणाले की, रेवाडीमध्‍ये  ओआरओपीच्या लाभार्थ्यांना आतापर्यंत जवळपास 600 कोटींपेक्षा जास्‍त रक्कम मिळाली आहे. त्यांनी असेही निदर्शनास आणून दिले की,  मागील सरकारने ओआरओपीसाठी 500 कोटी रुपयांची तरतूद केली होती;   हा निधी तर एकट्या रेवाडीतील सैनिकांच्या कुटुंबांना मिळालेल्या रकमेपेक्षा कमी आहे.

रेवाडी येथे एम्सच्या स्थापनेची हमी आजच्या पायाभरणीने पूर्ण झाली. आता  रेवाडी एम्सचे उद्घाटनही आपणच करणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.  इथे एम्स झाल्यामुळे स्थानिक नागरिकांना चांगले उपचार मिळतील तसेच इथल्या विद्यार्थ्‍यांना डॉक्टर बनण्याची संधी मिळेल, असे ते म्हणाले. रेवाडी एम्स हे देशातले 22 वे एम्स असल्याचे नमूद करून पंतप्रधान मोदी म्हणाले, गेल्या 10 वर्षांत 15 नवीन एम्स मंजूर करण्यात आली आहेत. गेल्या 10 वर्षांत 300 हून अधिक वैद्यकीय महाविद्यालयांचे  काम  प्रत्याक्षात  सुरू  झाले आहे. हरियाणातही प्रत्येक जिल्ह्यात किमान एक वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्‍हावे असे सुनिश्चित करण्‍याच्या दृष्‍टीने काम सुरू आहे.

पंतप्रधानांनी सध्याचे सरकार  आणि मागील  सरकारच्या चांगल्या आणि वाईट शासनाची तुलना केली. हरियाणात गेल्या 10 वर्षांपासून डबल-इंजिन सरकार अस्तित्वात आहे, असे सांगून ते म्हणाले, त्यामुळेच गरीबांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने आखलेल्या धोरणांचे पालन केले जात आहे  आणि  राज्य अव्वल स्थानावर आहे, अशी माहिती त्यांनी दिली. हरियाणाने  कृषी क्षेत्रामध्‍ये केलेला विकास, वृद्धी आणि राज्यामध्‍ये झालेला उद्योग, व्यवसायाच्या विस्तार,  या विषयाला त्यांनी स्पर्श केला. अनेक दशकांपासून मागे पडलेल्या दक्षिण हरियाणाचा होत असलेला  वेगवान विकास यावरही त्यांनी प्रकाश टाकला.  मग त्यामध्‍ये  रस्ते, रेल्वे किंवा मेट्रो सेवा असो. दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्गाच्या दिल्ली-दौसा-लालसोट विभागाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आधीच करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली;  तसेच, भारतातील सर्वात लांब  दिल्ली-मुंबई द्रुतगती मार्ग हा हरियाणाच्या गुरुग्राम, पालवल आणि नूह जिल्ह्यांतून जात असल्याचे त्यांनी सांगितले.

हरियाणासाठी असलेले वार्षिक रेल्वे अंदाजपत्रक 2014 पूर्वी  सरासरी 300 कोटी रुपये होते,  ते आता गेल्या 10 वर्षांत 3,000 कोटी रुपये करण्यात आल्याची माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.  त्यांनी रोहतक-मेहम-हंसी  आणि  जिंद-सोनीपत या नवीन रेल्वे मार्गांचा उल्लेख केला आणि अंबाला कँट(छावणी) -डप्पर सारख्या मार्गांच्या दुहेरीकरणाचा उल्लेख केला आणि ते म्हणाले की, यामुळे या भागात वास्तव्य करणा-या लाखो लोकांना फायदा होईल आणि त्यांना व्यवसाय करणे सुलभ होईल.

राज्य सरकारने  राज्यातील पाणी प्रश्‍न  सोडविण्‍यासाठी जे काम केले, त्या  कामाबद्दल  पंतप्रधानांनी कौतुक  केले. आता हरियाणा हे राज्य  तरुणांसाठी रोजगाराच्या संधी  निर्माण करणाऱ्या शेकडो बहुराष्ट्रीय कंपन्यांचे निवासस्थान  बनले असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, वस्त्रोद्योग आणि कापड उद्योगात हरियाणा  खूप मोठे नाव कमवत आहे, जे 35 टक्क्यांहून अधिक कार्पेट्स अर्थात गालिचे यांची निर्यात करते आणि भारतातील सुमारे 20 टक्के कपड्यांचे उत्पादन करते. हरियाणातील वस्त्रोद्योगाला पुढे घेऊन जात असलेल्या  लघुउद्योगांचा संदर्भ देत पंतप्रधानांनी पानिपत हातमाग उत्पादनांसाठी, फरीदाबाद कापड उत्पादनासाठी, गुरूग्राम तयार कपड्यांसाठी, सोनीपत तांत्रिक वस्त्रोद्योगासाठी आणि भिवानी न विणलेल्या कपड्यासाठी  प्रसिद्ध असल्याचे अधोरेखित केले. केंद्र सरकारने एमएसएमई आणि लघुउद्योगांना गेल्या 10 वर्षात लाखो कोटी रुपयांची मदत  दिली, परिणामी राज्यातल्या जुन्या लघुउद्योगांना आणि कुटीर उद्योगांना बळकटी मिळाली तसेच राज्यात हजारो नवीन उद्योगांची निर्मिती झाली.

रेवाडीतील विश्वकर्मा कारागिरांच्या पितळ कारागिरीवर आणि हस्तकलेच्या कारागिरीवर प्रकाश टाकून, पंतप्रधानांनी 18 व्यवसायांशी संबंधित अशा पारंपरिक कारागिरांसाठी पीएम-विश्वकर्मा योजना सुरू केली असल्याचे अधोरेखित केले. त्यांनी माहिती दिली की, देशभरातील लाखो लाभार्थी पंतप्रधान विश्वकर्मा योजनेचा भाग बनत आहेत आणि आमच्या पारंपारिक कारागिरांचे आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवन बदलण्यासाठी सरकार 13,000 कोटी रुपये खर्च करणार आहे.

“मोदींची हमी त्यांच्यासाठी आहे ज्यांच्याकडे बँकांना तारण देण्यासाठी काहीही नाही”, असे सांगत  पंतप्रधान म्हणाले की, त्यांनी लहान शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी, गरीब, दलित यांना तारणमुक्त कर्जासाठी मुद्रा योजना, मागासवर्गीय आणि ओबीसी समुदाय आणि रस्त्यावरील विक्रेत्यांसाठी पीएम स्वनिधी योजना सुरू केली आहे.

राज्यातील महिला कल्याणासंबंधीच्या मुद्द्यावर बोलताना, पंतप्रधानांनी मोफत गॅस जोडणी आणि नळाद्वारे पाणी पुरवठ्याचा उल्लेख केला आणि हरियाणातील लाखो महिलांसह देशभरातील 10 कोटी महिलांना स्वयं-सहायता गटांशी जोडल्याचे सांगितले . या बचत गटांना करण्यात आलेल्या लाखो कोटी रुपयांच्या आर्थिक मदतीचाही त्यांनी उल्लेख केला. लखपती दीदी योजनेबद्दल बोलताना पंतप्रधानांनी सांगितले की, आतापर्यंत 1 कोटी महिला लखपती दीदी झाल्या आहेत, तर या वर्षीच्या अर्थसंकल्पात त्यांची संख्या 3 कोटींवर नेण्यासाठी काम सुरू आहे. पंतप्रधानांनी नमो ड्रोन दीदी योजने बाबतही माहिती दिली, ज्यामध्ये महिलांच्या गटांना शेतीमध्ये उपयोगात आणण्यासाठी  प्रशिक्षित केले जाते, ज्यामुळे त्यांना अतिरिक्त उत्पन्न मिळते. हरियाणा हे आश्चर्यकारक शक्यतांचे राज्य आहे”, हरियाणातील पहिल्यांदाच मतदान करणाऱ्या नवमतदाराच्या  उज्ज्वल भविष्याबाबत बोलताना पंतप्रधानांनी अधोरेखित केले. पंतप्रधान म्हणाले की, दुहेरी-इंजिन सरकार हरियाणाला विकसित राज्य बनवण्यासाठी मग ते तंत्रज्ञान असो किंवा वस्त्रोद्योग, पर्यटन किंवा व्यापार प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या नवीन संधी निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे. “हरियाणा गुंतवणुकीसाठी एक पसंतीचे राज्य म्हणून उदयास येत आहे, आणि गुंतवणूक वाढणे म्हणजेच नवीन रोजगाराच्या  संधी वाढणे”, असे पंतप्रधानांनी नमूद केले. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय आणि हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासह हरियाणा सरकारचे इतर मंत्री आणि आमदारांसह इतर मान्यवर उपस्थित होते.

 

पार्श्वभूमी

सुमारे 5450 कोटी रुपये खर्चून विकसित करण्यात येणाऱ्या गुरुग्राम मेट्रो रेल्वे प्रकल्पाची पंतप्रधानांनी पायाभरणी केली. एकूण 28.5 किलोमीटर लांबीचा हा प्रकल्प मिलेनियम सिटी सेंटरला उद्योग विहार फेज-5 ला जोडेल आणि सायबर सिटीजवळील मौलसरी अव्हेन्यू स्थानकावर रॅपिड मेट्रो रेल गुरुग्राम शहराच्या सध्याच्या मेट्रो नेटवर्कमध्ये विलीन होईल.

द्वारका द्रुतगती मार्गावरील त्याच्या वेगात वाढ होईल. हा प्रकल्प नागरिकांना जागतिक दर्जाची पर्यावरणपूरक जलद शहरी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेला साकार करण्यासाठी उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे.

देशभरातील सार्वजनिक आरोग्य पायाभूत सुविधा मजबूत करण्याच्या पंतप्रधानांच्या संकल्पनेनुसार,हरियाणा येथील रेवाडी, येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेची  पायाभरणी केली जात आहे. सुमारे 1650 कोटी रुपये खर्चून बांधले जाणारे एम्स -रेवाडी हे रेवाडी येथील  मजरा मुस्तिल भालखी गावातल्या 203 एकर जागेवर विकसित केले जाणार आहे. यात 720 खाटांची रुग्णालयाची इमारत, 100 जागांचे  वैद्यकीय महाविद्यालय,60 जागांचे परिचारीका महाविद्यालय, 30 खाटांचे आयुष ब्लॉक, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांसाठी  निवास व्यवस्था, पदवीपूर्व  आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, रात्र निवारा, अतिथीगृह,सभागृह  अशा सोयीसुविधा असतील. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजना अंतर्गत स्थापन  केले जाणारे, एम्स रेवाडी हे अत्याधुनिक वैद्यकीय महाविद्यालय हरियाणातील लोकांना सर्वसमावेशक, दर्जेदार आणि सर्वसमावेशक तृतीय स्तरावरील काळजी आरोग्य सेवा प्रदान करेल. या सुविधांमध्ये हृदयरोग  विभाग, जठररोग विभाग मूत्रपिंडरोग, मूत्रविकार, मज्जासंस्था रोग विभाग, मज्जासंस्था शल्यचिकित्सक विभाग, कर्करोग उपचार विभाग, कर्करोग शल्यचिकित्सा विभाग, आंतर्स्त्राव चिकित्सा विभाग,दाह विभाग आणि सुघटन शल्यचिकित्सा विभाग यासह 18 विशेष आणि 17 अत्याधुनिक विशेष सेवा चिकित्सांसाठी दिल्या जाणाऱ्या रुग्णसेवांचा समावेश आहे.त्याचबरोबर  या संस्थेमध्ये अतिदक्षता विभाग, आपत्कालीन आणि अपघात विभाग,सोळा बहुविध शल्यसेवा , निदान प्रयोगशाळा, रक्तपेढी, औषधवितरण सेवा इत्यादी सुविधा देखील असतील.हरियाणातील एम्सची स्थापना हा हरियाणातील लोकांना सर्वसमावेशक, दर्जेदार आणि सर्वसमावेशक तृतीयक काळजी आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा आहे.

पंतप्रधानांनी कुरुक्षेत्र, ज्योतीसर येथे नव्याने बांधलेल्या अनुभव केंद्राचे उद्घाटनही केले. सुमारे 240 कोटी रुपये खर्चून हे वस्तूसंग्रहालय बांधण्यात आले आहे. 100,000 चौरस फूट अंतर्गत जागेचा समावेश असलेले हे संग्रहालय 17 एकरांवर पसरलेले आहे. ते महाभारतातील महाकाव्य कथा आणि गीतेच्या शिकवणींचा जिवंत अनुभव प्रदान करेल. अभ्यागतांचा अनुभव समृद्ध करण्यासाठी या संग्रहालयात ऑगमेंटेड रिॲलिटी (AR), 3D लेझर आणि प्रोजेक्शन मॅपिंगसह अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा देखील लाभ घेता येणार आहे. ज्योतिसार, कुरुक्षेत्र हे पवित्र स्थान आहे जिथे भगवान कृष्णाने अर्जुनाला भगवद्गीतेचे शाश्वत ज्ञान दिले.

पंतप्रधानांनी विविध रेल्वेमार्गांची पायाभरणीही केली आणि अनेक रेल्वे प्रकल्प देशाला समर्पित केले. त्यात रेवाडी-काठुवास रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण (27.73 किमी); कठुवास-नारनौल रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण (24.12 किमी); भिवानी-डोभ भाली रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण (42.30 किमी); आणि मनहेरू-बावणी खेरा रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण (31.50 किमी) यांचा समावेश आहे. या रेल्वे मार्गांच्या दुहेरीकरणामुळे या प्रदेशांतील रेल्वेच्या पायाभूत सुविधा वाढतील आणि प्रवासी तसेच मालवाहू गाड्या वेळेवर धावण्यास मदत होईल.

पंतप्रधानांनी आज रोहतक-मेहम-हंसी रेल्वे मार्ग (68 किमी) राष्ट्राला समर्पित केला, ज्यामुळे रोहतक आणि हिस्सार दरम्यानचा प्रवासाचा अवधी कमी होईल. त्यांनी रोहतक-मेहम-हंसी विभागातील रेल्वे सेवेला हिरवा झेंडा दाखवला, ज्यामुळे रोहतक आणि हिसार प्रदेशातील रेल्वेने होणारे दळणवळण सुधारेल आणि रेल्वे प्रवाशांना फायदा होईल.

 

 

 

 

* * *

S.Kane/Vinayak/Suvarna/Vikas/Sampada/D.Rane

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 2006621) Visitor Counter : 120