पंतप्रधान कार्यालय
संयुक्त अरब अमिराती आणि कतार इथे रवाना होण्यापूर्वी पंतप्रधानांनी केलेले निवेदन
Posted On:
13 FEB 2024 12:06PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 13 फेब्रुवारी 2024
मी 13-14 फेब्रुवारी रोजी संयुक्त अरब अमिराती आणि 14-15 फेब्रुवारी रोजी कतारच्या अधिकृत दौऱ्यावर जात आहे. हा माझा 2014 नंतरचा संयुक्त अरब अमिरातीचा सातवा आणि कतारचा दुसरा दौरा असेल.
गेल्या नऊ वर्षांत, व्यापार आणि गुंतवणूक, संरक्षण आणि सुरक्षा, अन्न आणि ऊर्जा सुरक्षा तसेच शिक्षण यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये यु. ए. ई. सोबतचे आपले सहकार्य अनेक पटींनी वाढले आहे. सांस्कृतिक आणि लोकांमधील परस्पर संबंध पूर्वीपेक्षा अधिक दृढ झाले आहेत.
संयुक्त अरब अमिरातीचे राष्ट्राध्यक्ष महामहीम शेख मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यांची अबू धाबी येथे भेट घेण्यासाठी आणि आमची सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी पुढे नेण्याबाबत विस्तृत चर्चा करण्यासाठी मी उत्सुक आहे. नुकतेच ते व्हायब्रंट गुजरात जागतिक शिखर परिषद 2024 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले होते. तेव्हा मला गुजरातमध्ये महामहीम यांचे यजमानपद भूषवण्याचे भाग्य लाभले.
संयुक्त अरब अमिरातीचे उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री तसेच दुबईचे शासक महामहीम शेख मोहम्मद बिन रशीद अल मकतूम यांच्या निमंत्रणावरून मी 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुबई येथे होणाऱ्या 'वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट' मध्ये जागतिक नेत्यांच्या मेळाव्याला संबोधित करणार आहे. शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान महामहीम शेख मोहम्मद बिन रशीद यांच्याशी होणाऱ्या माझ्या चर्चेमध्ये दुबईसोबतचे आपले बहुआयामी संबंध मजबूत करण्यावर भर असेल.
या भेटीदरम्यान मी अबू धाबी येथील पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटनही करणार आहे. भारत आणि संयुक्त अरब अमिराती या दोन्ही देशांमध्ये सामायिक असलेल्या सुसंवाद, शांतता आणि सहिष्णुतेच्या मूल्यांना बी. ए. पी. एस. मंदिर ही कायमस्वरूपी मानवंदना ठरेल.
अबू धाबी येथे एका विशेष कार्यक्रमात मी संयुक्त अरब अमिरातीमधील भारतीय समुदायाला संबोधित करणार आहे.
कतारमध्ये, मी महामहीम शेख तमीम बिन हमद अल थानी, अमीर यांना भेटण्यास उत्सुक आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कतार प्रचंड विकास आणि परिवर्तन पाहत आहे. कतारमधील इतर मान्यवरांची भेट घेण्यासाठीही मी उत्सुक आहे.
भारत आणि कतार यांच्यात ऐतिहासिकदृष्ट्या जवळचे आणि मैत्रीपूर्ण संबंध आहेत. अलिकडच्या वर्षांत, उच्चस्तरीय राजकीय देवाणघेवाण, दोन्ही देशांमधील वाढता व्यापार आणि गुंतवणूक, आपली ऊर्जा भागीदारी बळकट करणे आणि संस्कृती तसेच शिक्षणातील सहकार्य यासह सर्व क्षेत्रांमध्ये आपले बहुआयामी संबंध अधिक दृढ होत आहेत. दोहामध्ये 800,000 हून अधिक भारतीय समुदायाची उपस्थिती हा उभय देशातील लोकांमधील दृढ संबंधांचा पुरावा आहे.
* * *
S.Tupe/V.Ghode/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2005484)
Visitor Counter : 139
Read this release in:
Tamil
,
Urdu
,
Khasi
,
English
,
Hindi
,
Assamese
,
Bengali-TR
,
Manipuri
,
Bengali
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam