ईशान्य क्षेत्र विकास मंत्रालय
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांनी केले ‘विविधता का अमृत महोत्सव’चे उद्घाटन
Posted On:
09 FEB 2024 7:10PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2024
राष्ट्रपती भवनात सुरू असलेल्या ‘विविधता का अमृत महोत्सव’चा प्रारंभ ईशान्य भारताच्या सांस्कृतिक वारशाच्या ऐतिहासिक प्रदर्शनाने करण्यात आला. ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाने संस्कृती मंत्रालयाच्या सहकार्याने आयोजित केलेला हा महोत्सव चैतन्यदायी सांस्कृतिक प्रवासाची अनुभूती देणारा आणि अभ्यागतांच्या हृदयात एक अमिट ठसा उमटवणारा ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्या हस्ते या महोत्सवाचे उद्घाटन झाले. ईशान्य प्रदेश विकासमंत्री जी. किशन रेड्डी यावेळी उपस्थित होते. त्यांच्या नेतृत्वाखाली मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी या कार्यक्रमामध्ये आपले विचार व्यक्त करताना, जी. किशन रेड्डी यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु यांच्याकडून ईशान्य प्रदेशाला सातत्याने मिळणारे पाठबळ आणि प्रोत्साहन याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2014 पासून ईशान्य प्रदेश हा राष्ट्रीय प्राधान्याचा विषय झाला आहे आणि तेव्हा पासून या भागात अभूतपूर्व विकास झाला आहे, असे त्यांनी नमूद केले. या महोत्सवात 320 पेक्षा जास्त स्टॉल्स असून प्रत्येक स्टॉलवर सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असलेल्या 8 राज्यांमधील वैशिष्ट्यपूर्ण हस्तकला, हातमाग आणि कृषी उत्पादने यांचे प्रदर्शन करण्यात आले आहे. यामध्ये वैविध्यपूर्ण हस्तकारागिरी उत्पादने, टिकाऊ हस्तकला उत्पादने आणि सेंद्रीय कृषी उत्पादनांचा समावेश आहे.
तसेच या स्टॉलपैकी 20 पेक्षा जास्त केंद्रांवर प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून ईशान्येकडील पारंपरिक कलाकुसरीच्या कौशल्याचे दर्शन घडवण्यात आले. यामध्ये माजुली मुखवटे निर्मिती, टोपल्या विणणे, कमळापासून रेशीम तयार करणे आणि अशाच प्रकारच्या वैशिष्ट्यपूर्ण कलांच्या प्रात्यक्षिकांचा समावेश होता. अभ्यागतांना स्वतःला देखील त्यांची हाताळणी करण्याची आणि त्यामध्ये प्रावीण्य मिळवण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन घेण्याची दुर्मिळ संधी उपलब्ध झाली.
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मुंसह प्रतिष्ठित मान्यवरांनी अष्टलक्ष्मी रांगोळी आणि विविध संस्कृतींचे मिश्रण करणाऱ्या सादरीकरणाचा अनुभव घेतला. पहिल्या दिवशी सर्व आठ राज्यांमधील कलाकारांनी त्यांच्या उल्लेखनीय कला सादर केल्या, ज्यामध्ये सर्व आठ राज्यांमधील पारंपरिक नृत्यांचा समावेश होता. पुढील चाल दिवसात 350हून जास्त कलाकार अशाच प्रकारच्या सादरीकरणाद्वारे प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करतील.
त्याशिवाय अभ्यागतांना ईशान्येकडच्या प्रदेशातील स्वादिष्ट खाद्यपदार्थांची विविधतेची चव चाखण्याची संधी थेट दिल्लीमध्ये या ठिकाणी असलेल्या अनेक स्टॉल्सवर उपलब्ध झाली.
बालकांचे मन रमावे आणि युवा वर्गाला देखील आकर्षण वाटावे यासाठी तयार करण्यात आलेल्या विशेष विभागांमध्ये बच्चेकंपनीचा आनंद आणि युवा वर्गाचा उत्साह पाहायला मिळाला. या विभागांमध्ये त्यांना ईशान्येकडील भागांची ऐतिहासिक आणि सांस्कृतिक समृद्धी यांचा अनुभव देखील घेता आला.
* * *
NM/S.Patil/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 2004634)
Visitor Counter : 95