अर्थ मंत्रालय
गेल्या दशकात प्रत्यक्ष कर संकलन तिप्पट झाले आणि कर विवरणपत्रे भरणाऱ्यांची संख्या 2.4 पट वाढली - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन
करविवरणपत्रांच्या पुढील प्रक्रियेला वर्ष 2013-14 मध्ये लागणारा सरासरी 93 दिवसांचा कालावधी, आता कमी होऊन केवळ 10 दिवसांवर आला
प्रविष्टि तिथि:
01 FEB 2024 3:20PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 1 फेब्रुवारी 2024
गेल्या दहा वर्षांत, देशातील प्रत्यक्ष कर संकलन तिप्पट झाले आणि कर विवरणपत्रे भरणाऱ्यांची संख्या 2.4 पट वाढली. अशी माहिती केंद्रीय अर्थमंत्री तसेच कॉर्पोरेट व्यवहार मंत्री निर्मला सीतारामन यांनी दिली आहे.
संसदेत 2024-25 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना त्या आज बोलत होत्या. करदात्यांनी दिलेल्या योगदानाचा देशाच्या विकासासाठी आणि देशवासीयांच्या कल्याणासाठी अत्यंत विचारपूर्वक उपयोग करण्यात येत आहे, अशी ग्वाही त्यांनी करदात्यांना दिली. करदात्यांनी दिलेल्या पाठींब्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांनी प्रशंसा केली.
केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन पुढे म्हणाल्या की नव्या कर रचनेअंतर्गत, करांचे दर कमी करण्यात आले आहेत तसेच त्यांचे सुसूत्रीकरण करण्यात आले आहे. ज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न सात लाख रुपयांपर्यंत आहे त्यांना कोणताही कर भरावा लागणार नाही. वर्ष 2013-14 मध्ये ही सुविधा केवळ 2.2 लाख रुपयांपर्यंत वार्षिक उत्पन्न असणाऱ्या करदात्यांसाठी देण्यात आली होती. किरकोळ स्वरूपाच्या व्यापारांसाठी अनुमानित कर आकारणीसाठीची मर्यादा 2 कोटी रुपयांवरुन 3 कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्याच पद्धतीने अनुमानित कर आकारणीसाठी पात्र व्यावसायिकांची वार्षिक उत्पन्न मर्यादा 50 लख रुपयांवरुन वाढवून 75 लाख रुपये करण्यात आली आहे.
तसेच, सध्या देशांतर्गत व्यवहार करणाऱ्या कंपन्यांसाठी कॉर्पोरेट कराचे दर 30 टक्क्यावरून कमी करून 22 टक्के करण्यात आले आहेत तर काही नव्या उत्पादक कंपन्यांसाठी हेच दर 15 टक्के करण्यात आले आहेत. गेल्या पाच वर्षांत सरकारने कर-दात्यांना देण्यात येणाऱ्या सेवांमध्ये सुधारणा करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे यावर केंद्रीय अर्थमंत्र्यांनी अधिक भर दिला.
“जुन्या काळातील विधी क्षेत्रावर आधारित मूल्यमापन प्रणालीचे रुपांतर करून चेहेराविरहित म्हणजेच मानवी हस्तक्षेपाविना मूल्यमापन आणि अपील पद्धतीची सुरुवात करण्यात आली आहे आणि त्यामुळे या प्रक्रियेत अधिक कार्यक्षमता, पारदर्शकता आणि जबाबदारी समाविष्ट झाली आहे,” त्या म्हणाल्या.
अद्ययावत कर विवरणपत्रे, नवा 26एएस क्रमांकाचा अर्ज आणि करपरतावे विहित वेळेपूर्वीच भरण्याची सुविधा या उपक्रमांमुळे कर विवरणपत्रे सादर करण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोपी झाली असून त्यामुळे करविवरणपत्रांच्या पुढील प्रक्रियेला वर्ष 2013-14 मध्ये लागणारा सरासरी 93 दिवसांचा कालावधी, आता कमी होऊन केवळ 10 दिवसांवर आला आहे आणि त्यामुळे कर परतावे अधिक जलदगतीने मिळू लागले आहेत.
* * *
H.Akude/S.Chitnis/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
/PIBMumbai
/pibmumbai
(रिलीज़ आईडी: 2001354)
आगंतुक पटल : 186
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
Punjabi
,
Kannada
,
English
,
Urdu
,
हिन्दी
,
Bengali
,
Assamese
,
Gujarati
,
Tamil
,
Telugu
,
Malayalam