कायदा आणि न्याय मंत्रालय
प्रजासत्ताक भारताचे 75 वे वर्ष साजरे करण्यासाठी उपराष्ट्रपती उद्या 'हमारा संविधान, हमारा सम्मान' अभियानाचा करणार प्रारंभ
भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या तत्वांप्रती सामूहिक वचनबद्धतेचा ठाम पुनरुच्चार करणे, हा या अभियानाचा उद्देश
Posted On:
23 JAN 2024 2:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 जानेवारी 2024
प्रजासत्ताक भारताचे 75 वे वर्ष साजरे करण्यासाठी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते, 'हमारा संविधान, हमारा सम्मान' (आमचे संविधान, आमचा सन्मान) या वर्षभराच्या देशव्यापी अभियानाचा उद्या 24 जानेवारी, 2024 रोजी नवी दिल्लीतल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय केंद्रात प्रारंभ होणार आहे. आपल्या राष्ट्राला बांधून ठेवणारी सामायिक मूल्ये साजरी करणे आणि भारतीय राज्यघटनेत अंतर्भूत असलेल्या तत्वांप्रती सामूहिक वचनबद्धतेचा ठाम पुनरुच्चार करणे, हा या अभियानाचा उद्देश आहे. हा देशव्यापी उपक्रम संवैधानिक चौकटीत नमूद केलेल्या आदर्शांचे जतन करण्याची जबाबदारी आणि गौरवाची भावना वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात येणार आहे.
अभियानात समाविष्ट करण्यात आलेल्या संकल्पना पुढीलप्रमाणे :
सब को न्याय- हर घर न्याय (सर्वांना न्याय -घरोघरी न्याय) या संकल्पनेचा उद्देश सामायिक सेवा केंद्रांच्या ग्रामस्तरीय प्रवर्तकांद्वारे गावकऱ्यांना जोडणे आणि सर्वांना न्याय, प्रतिज्ञा वाचण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करण्याचा आहे. न्याय सहाय्यक आकांक्षी तालुके आणि जिल्ह्यात घरोघरी जाऊन विविध नागरिक-केंद्रित न्याय सेवांविषयी जागृती करतील. राज्य/केंद्रशासित प्रदेश स्तरावर, न्याय सेवा मेळा आयोजित केला जाईल. यातून नागरिकांना विविध कायदेशीर तसेच सरकारच्या इतर सेवा व योजनांबद्दल मार्गदर्शन, माहिती आणि साहाय्य मिळविण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध होईल.
नव भारत नव संकल्प हा आणखी एक उपक्रम राबवण्यात येणार असून त्याचा उद्देश लोकांना पंचप्रण (पाच प्रतिज्ञांच्या) वाचनाद्वारे पंच प्रतिज्ञांचे संकल्प स्वीकारण्यासाठी प्रोत्साहित करणे, हा आहे. पंचप्रण रंगोत्सव (पोस्टर तयार करण्याची स्पर्धा), पंचप्रण अनुभव (रील/व्हिडिओ तयार करण्याची स्पर्धा) यात सहभागी होऊन नागरिकांना त्यांची प्रतिभा आणि सर्जनशीलता दाखवण्याची संधी मिळणार आहे.
विधी जागृती अभियान हा तिसरा उपक्रम असून याचा उद्देश विधी महाविद्यालयाने प्रो-बोनो क्लबअंतर्गत दत्तक घेतलेल्या गावांमध्ये पंचप्रण संदेश पोहोचवण्यासाठी विद्यार्थ्यांना सहभागी करून घेणे, हा आहे. ग्राम विधी चेतना, वंचित वर्ग सन्मान आणि नारी भागीदारी उपक्रमातून समाजातल्या दुर्बल घटकांपर्यंत पोहोचणे, हाही या संकल्पनेमागील हेतू आहे.
कार्यक्रमात, न्याय सेतूचा प्रारंभ केला जाईल. हे एक महत्त्वपूर्ण आणि परिवर्तनकारी पाऊल असून त्याचे उद्दिष्ट शेवटच्या मैलापर्यंत कायदेशीर सेवा पोहोचवणे आणि विस्तारणे, हा आहे.
न्यायापर्यंत पोहोच यासाठीच्या ‘डिझायनिंग इनोव्हेटिव्ह सोल्युशन्स फॉर होलिस्टिक ऍक्सेस टू जस्टिस’ (DISHA-दिशा ) योजनेच्या यशावरील पुस्तिकेचे प्रकाशनही या कार्यक्रमात होईल. दिशा योजनेअंतर्गत देशातील 36 राज्ये व केंद्रशासित प्रदेशातील 2.5 लाख सामायिक सेवा केंद्रे आणि टेलि-लॉ सिटिझन्स मोबाईल अॅपद्वारे टेली लॉ कार्यक्रमाने 67 लाखांहून अधिक नागरिक याचिकापूर्व सल्ल्यासाठी जोडले गेले.
न्याय बंधू (प्रो-बोनो कायदेशीर सेवा) कार्यक्रमाचे उद्दिष्ट प्रो बोनो कायदेशीर सेवा कार्यक्रमासाठी विकेंद्रीकरण आणि वितरण आराखडा तयार करणे, हा आहे. याअंतर्गत देशात 24 बार काउन्सिलमध्ये 10,000+ प्रो बोनो वकिलांचे नेटवर्क तयार केले आहे, 25 उच्च न्यायालयांमध्ये न्याय बंधू पॅनेल तयार केले आहेत आणि 89 विधी महाविद्यालयांमध्ये प्रो बोनो क्लबची स्थापना करण्यात आली आहे. या व्यतिरिक्त, देशभरातील 14 संस्थांच्या सहाय्याने राबविण्यात येत असलेल्या वेबिनार आणि कायदेशीर साक्षरता कार्यक्रमांद्वारे 7 लाखांहून अधिक लाभार्थ्यांना त्यांचे कायदेशीर हक्क व कर्तव्ये आणि अधिकारांबाबत जागरूक केले गेले आहे.
या कार्यक्रमात न्याय विभागासोबतच्या समन्वयाला औपचारिक रूप देण्यासाठी भाषिणी आणि इग्नूमधील प्रतिनिधींना एकत्र आणले जाईल. न्यायापर्यंत पोहोचण्यातले भाषिक अडथळे भाषिणीसोबतच्या भागीदारीमुळे दूर होतील. भाषिणीचे पर्याय न्याय सेतू- कायदेशीर सेवांच्या टेली सुविधामध्ये यापूर्वीच अंतर्भूत केले गेले आहेत. इग्नूसोबतच्या भागीदारीमुळे पॅरा लीगल्सना कायदेशीर साहाय्य आणि पाठबळ संदर्भातल्या विविध शाखात प्रमाणपत्र मिळवण्याची, शैक्षणिक संधी विस्तारण्याची आणि आपली कौशल्ये व रोजगार क्षमता वाढवण्याची संधी उपलब्ध होईल.
या कार्यक्रमाला कायदा आणि न्याय राज्यमंत्री (स्वतंत्र कार्यभार) अर्जुन राम मेघवाल आणि महाधिवक्ता आर.वेंकटरामनी सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
देशभरातील सामायिक सेवा केंद्रांमधले 650हून अधिक टेली-लॉ कार्याधिकारी, प्रो बोनो विधी महाविद्यालयांचे विद्यार्थी आणि अध्यापकही या कार्यक्रमाला उपस्थित राहतील.
* * *
NM/S.Kakade/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1998778)
Visitor Counter : 169