पंतप्रधान कार्यालय

पंतप्रधानांचा 19 जानेवारीला महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडू दौरा


चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 च्या उद्‌घाटन सोहोळ्याचा पंतप्रधान करणार प्रारंभ

नव्या स्वरूपातील डीडी पोधिगाई वाहिनीचे डीडी तमिळ म्हणून पंतप्रधानांच्या हस्ते होणार उद्घाटन; देशातील प्रसारण क्षेत्र मजबूत करण्यासाठी 250 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि लोकार्पण

पंतप्रधानांच्या हस्ते बेंगळुरूमध्ये नवीन अत्याधुनिक बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र संकुलाचे होणार उद्घाटन - बोईंगची अमेरिकेबाहेरील ही सर्वात मोठी गुंतवणूक

पंतप्रधान महाराष्ट्रात सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या 8 अमृत प्रकल्पांची करणार पायाभरणी

Posted On: 17 JAN 2024 9:40PM by PIB Mumbai

नवी दिल्ली , 17 जानेवारी 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदी 19 जानेवारी रोजी महाराष्ट्र, कर्नाटक आणि तामिळनाडूला भेट देणार आहेत. पंतप्रधान सकाळी सुमारे 10:45 वाजता, महाराष्ट्रातील सोलापूर येथे अनेक विकास प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील. दुपारी 2:45 च्या सुमारास, पंतप्रधान कर्नाटकातील बेंगळुरू येथे बोइंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्राचे उद्‌घाटन करतील आणि बोईंग सुकन्या कार्यक्रमाचा शुभारंभ करतील. त्यानंतर, संध्याकाळी 6 वाजता, पंतप्रधान तामिळनाडूमधील चेन्नई येथे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा 2023 च्या उद्घाटन समारंभात सहभागी होतील.

पंतप्रधानांचा सोलापूर दौरा

सोलापूरमध्ये एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान महाराष्ट्रातील सुमारे 2,000 कोटी रुपयांच्या  8 अमृत (कायाकल्प आणि शहरी परिवर्तनासाठी अटल मिशन) प्रकल्पांची पायाभरणी करतील.

पंतप्रधान महाराष्ट्रात प्रधानमंत्री आवास योजना-शहरी अंतर्गत पूर्ण झालेल्या 90,000 हून अधिक घरांचे लोकार्पण करतील. याशिवाय, ते सोलापूरमधील रायनगर गृहनिर्माण संस्थेच्या  15,000 घरांचे लोकार्पण करणार आहेत, ज्यांच्या लाभार्थ्यांमध्ये हजारो हातमाग कामगार, विक्रेते, यंत्रमाग कामगार, कचरा  वेचणारे, विडी कामगार, चालक आणि इतरांचा समावेश आहे.

याशिवाय, पंतप्रधान कार्यक्रमादरम्यान महाराष्ट्रातील पीएम -स्वनिधी च्या 10,000 लाभार्थ्यांना पहिल्या  आणि दुसऱ्या हप्त्यांचे वितरण सुरू करतील.

पंतप्रधानांचा बेंगळुरू दौरा

पंतप्रधान बेंगळुरू येथे नवीन अत्याधुनिक बोईंग इंडिया अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान केंद्र (बीआयईटीसी) संकुलाचे उद्‌घाटन करतील. 1,600 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून, 43 एकरवर उभारलेले हे संकुल म्हणजे बोइंगची अमेरिकेबाहेरील सर्वात मोठी गुंतवणूक आहे. बोईंगचे भारतातील नवीन संकुल भारतातील चैतन्यपूर्ण  स्टार्टअप, खासगी आणि सरकारी परिसंस्थेसह भागीदारीसाठी आधारस्तंभ बनेल आणि जागतिक एरोस्पेस आणि संरक्षण उद्योगासाठी अत्याधुनिक उत्पादने आणि सेवा विकसित करण्यात मदत करेल.

पंतप्रधान बोईंग सुकन्या कार्यक्रमाचे देखील उद्‌घाटन करतील ज्याचा उद्देश देशातील वाढत्या विमान वाहतूक क्षेत्रात भारतातील अधिक मुलींच्या प्रवेशाला समर्थन देणे हा आहे. हा कार्यक्रम भारतभरातील मुली आणि महिलांना विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी आणि गणित (एसटीईएम) क्षेत्रातील महत्वाची कौशल्ये शिकण्यासाठी आणि विमान वाहतूक क्षेत्रातील नोकऱ्यांसाठी प्रशिक्षण देण्याकरिता संधी प्रदान करेल. युवतींसाठी हा कार्यक्रम एसटीईएम करिअरमध्ये रस निर्माण करण्यास मदत करण्यासाठी 150 नियोजित ठिकाणी एसटीईएम प्रयोगशाळा तयार करेल. या कार्यक्रमाअंतर्गत वैमानिक  होण्यासाठी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना शिष्यवृत्तीही दिली जाईल.

खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धा 2023 मध्ये पंतप्रधान

तळापर्यंतच्या  स्तरावर क्रीडा विकासाला चालना देण्यासाठी आणि नवोदित क्रीडा प्रतिभेची जोपासना करण्याच्या पंतप्रधानांच्या अतूट बांधिलकीमुळे खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धेची सुरूवात झाली. चेन्नई येथील जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर आयोजित, 6 व्या खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धा 2023 च्या उद्घाटन समारंभात पंतप्रधान प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील. दक्षिण भारतात प्रथमच खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धा होत आहेत.  19 ते 31 जानेवारी 2024 या कालावधीत चेन्नई, मदुराई, त्रिची आणि कोईम्बतूर या तमिळनाडूमधील चार शहरांमध्ये या स्पर्धा होतील.

या क्रीडा स्पर्धांचे शुभंकर वीरा मंगाई आहेत. राणी वेलू नचियार यांना प्रेमाने वीरा मंगाई म्हणून संबोधले जाते.  राणी वेलू नचियार या  भारतीय राणीने  ब्रिटीश साम्राज्याच्या राजवटीविरुद्ध युद्ध पुकारले होते. वीरा मंगाई शुभंकर भारतीय महिलांच्या शौर्याचे आणि निश्चयाचे  प्रतीक असून ते स्त्री शक्तीचे सामर्थ्य प्रतीत करते. या क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हात कवी तिरूवल्लुवर यांची आकृती रेखाटलेली आहे.

खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या या आवृत्तीत 5600 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत. 13 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत वेगवेगळ्या 15 ठिकाणांवर 26 क्रीडा प्रकारात 275 हून अधिक स्पर्धात्मक सामने तर एक दर्शनी सामना होणार आहे. या 26 क्रीडा प्रकारांमध्ये नेहमीचे क्रीडा प्रकार जसे की फुटबॉल, व्हॉलीबॉल, बॅडमिंटन इत्यादी यांच्यासह  कलारीपयट्टू, गटका, थांग टा, कबड्डी आणि योगासने यांसारख्या पारंपरिक क्रीडा प्रकारांचा अनोखा संगम आहे.  खेलो इंडिया युवा क्रीडास्पर्धेच्या इतिहासात प्रथमच तामिळनाडूचा पारंपारिक खेळ सिलांबम हा दर्शनी क्रीडा प्रकार म्हणून सादर केला जाणार आहे.

क्रीडा स्पर्धेच्या उद्‌घाटन समारंभादरम्यान, प्रसारण क्षेत्राशी संबंधित सुमारे 250 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे लोकार्पण आणि पायाभरणी पंतप्रधानांच्या हस्ते केली जाणार आहे. यामध्ये डीडी पोधिगाई या वाहिनीचा नवी डीडी तमिळ म्हणून प्रारंभ  , 8 राज्यांमधील 12 आकाशवाणी एफएम प्रकल्प तसेच जम्मू आणि काश्मीरमधील 4 डीडी ट्रान्समीटर सुरु  करणे याचा समावेश आहे. याशिवाय, 12 राज्यांमधील 26 नवीन एफएम ट्रान्समीटर प्रकल्पांची पायाभरणी देखील पंतप्रधानांच्या हस्ते केली जाणार आहे.

N.Chitale/V.Joshi/S.Mukhedkar/P.Malandkar

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1997114) Visitor Counter : 158