माहिती आणि प्रसारण मंत्रालय
azadi ka amrit mahotsav

व्ही. बी. एस. वाय.: स्वप्ने सत्यात उतरवणारी इन्शा शबीर यांची कथा

Posted On: 28 DEC 2023 10:43AM by PIB Mumbai

जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील सुंदर खोऱ्यात राहणाऱ्या… स्वतंत्र, लवचिकता आणि परिवर्तनाचे प्रतीक बनलेल्या एका तरुण महिलेची ही गोष्ट आहे. पुलवामातील अरिगाम येथे एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या इन्शा शाबीर आज स्वतःच्या व्यवसायाच्या मालक बनल्या आहेत. त्या स्वतःचे  बुटीक चालवतात. केंद्र सरकारच्या दीनदयाळ अन्त्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या अनेक लाभार्थ्यांपैकी त्या एक आहेत. इन्शा, आपल्या सारख्या अनेक मुली आणि महिलांना यशाच्या मोकळ्या आकाशात भरारी मारण्यासाठी प्रेरणा देत आहेत.

सध्या सुरू असलेल्या विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान प्रसारमाध्यमांना इन्शा यांनी मुलाखत दिली. पहिल्यांदा 2017 मध्ये दीनदयाळ अन्त्योदय योजना-राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाबद्दल ऐकले आणि लगेचच त्यासाठी नोंदणी केली असे त्यांनी सांगितले. ग्रामीण विकास मंत्रालयाने 2011 मध्ये ही योजना सुरू केली होती. ग्रामीण भागातील गरीबांसाठी कार्यक्षम आणि प्रभावी संस्थात्मक मंच तयार करणे, शाश्वत उपजीविकेच्या वाढीद्वारे आणि आर्थिक सेवांमध्ये सुधारित प्रवेशाद्वारे त्यांना कौटुंबिक उत्पन्न वाढवण्यास सक्षम करणे हा यामागचा उद्देश आहे.

इन्शा यांनी आपले मनोगत सांगितले. लहानपणापासूनच डिझायनिंग आणि कपडे बनवण्यात त्यांना रुची आहे. पण आयुष्यात निर्णायक वळण तेव्हा आले जेव्हा त्यांनी डी. ए. वाय.-एन. आर. एल. एम. अंतर्गत स्थानिक शिवणकाम कार्यशाळेत प्रवेश घेतला. मग त्यांची प्रतिभा आणि आवड, व्यवसायाच्या संधीत तसेच उपजीविकेच्या मार्गात रूपांतरित झाली.

डिजाईन संदर्भातील अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर इन्शा यांच्या लक्षात आले की त्यांना बुटीक उभारायचे आहे. त्यांना पी. एम. ई. जी. पी. उमेद कर्ज मिळाले. सोबतच डी. ए. वाय.-एन. आर. एल. एम. ने आर्थिक सहाय्य पुरवून मदत केली. अखेरीस, त्यांना स्वतःचे बुटीक उभारता आले.

कधीकधी, मर्यादित संसाधने आणि कमी संधी असल्या की, स्वप्ने अनेकदा रात्रीच्या आकाशातील दूरच्या ताऱ्यांसारखी दिसतात. पण, डी. ए. वाय.-एन. आर. एल. एम. ने इन्शा यांना आपली स्वप्न जगण्यास सक्षम केले. या योजनेअंतर्गत अनुदानित कर्ज मिळाले नसते तर कदाचित त्या व्यवसाय सुरू करू शकल्या नसत्या असे इन्शा यांनी सांगितले.

तरुणांना मदत करणाऱ्या आणि नवीन, विकसित भारताची निर्मिती करणाऱ्या सरकारच्या व्यावसायिक योजनांची इन्शा यांनी प्रशंसा केली. त्या पुढे म्हणाल्या की, आज केवळ श्रीमंत लोकच यशस्वी होत नाहीत तर गरीब पार्श्वभूमी असलेल्या आणि खेड्यांमधील व्यक्ती देखील यशस्वी व्यवसाय सुरू करत आहेत. आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यास मदत करणाऱ्या योजना आणल्याबद्दल सरकारची आभारी असल्याचे त्यांनी सांगितले. इन्शा, आज केवळ त्यांचे आर्थिक व्यवस्थापनच करत नाही तर आपल्या बुटिकमध्ये इतर महिलांना रोजगारही देत आहेत. जरी हे बुटीक लहान असले तरी विकास आणि आत्मनिर्भरतेचे ते निदर्शक बनले आहे.                                                                                                                                     

संदर्भ –

X link –

 

पी. आय. बी. जम्मू/निमिश रुस्तगी/हिमांशु पाठक/रितू कटारिया/आरुषी प्रधान यांच्या योगदानासह

***

NM/VinayakG/DY

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai


(Release ID: 1991211) Visitor Counter : 134