पंतप्रधान कार्यालय
पंडित मदन मोहन मालवीय यांच्या संग्रहित कार्याच्या विमोचनप्रसंगी पंतप्रधानांच्या भाषणाचा मजकूर
Posted On:
25 DEC 2023 7:01PM by PIB Mumbai
मंत्रिमंडळातील माझे सहयोगी अनुराग ठाकूर जी, अर्जुन राम मेघवाल जी, महामना संपूर्ण वाङ्ग्मयाचे मुख्य संपादक माझे खूप जुने मित्र रामबहादुर राय जी, महामना मालवीय मिशनचे अध्यक्ष प्रभुनारायण श्रीवास्तव जी, मंचावर विराजमान सर्व ज्येष्ठ सहयोगी, बंधू आणि भगिनींनो,
सर्वप्रथम मी आपणा सर्वांना ख्रिसमसच्या शुभेच्छा देतो. आजचा दिवस भारत आणि भारतीयतेमध्ये विश्वास ठेवणाऱ्या करोडो लोकांसाठी एका प्रेरणा पर्वासारखा असतो. आज महामना मदन मोहन मालवीय जी यांची जन्म जयंती आहे. आजच्या या पावन मंगल दिनी मी महामना मालवीय जी यांच्या चरणी प्रणाम अर्पण करत आहे. अटलजींना आदरपूर्वक श्रद्धांजली अर्पण करत आहे. अटलजींच्या जयंतीनिमित्त आज देश गुड गव्हर्नन्स डे - सुशासन दिवसाच्या रूपात साजरा करत आहे. मी सर्व देशवासीयांना सुशासन दिनाच्याही शुभेच्छा देत आहे.
मित्रांनो,
आजच्या या पवित्र दिनी पंडित मदन मोहन मालवीय संपूर्ण वाङ्ग्मय या ग्रंथाचे लोकार्पण होणे ही खरोखरच एक महत्त्वपूर्ण बाब आहे. हे संपूर्ण वाङ्ग्मय, आपल्या आजच्या युवा पिढीला आणि आपल्या येणाऱ्या अनेक पिढ्यांना महामनांचे विचार, आदर्श आणि त्यांचे जीवन यांचा परिचय करून देणारे सशक्त माध्यम बनेल. याद्वारे भारताचा स्वतंत्रता संग्राम आणि तत्कालीन इतिहास जाणून घेण्यासाठी, समजून घेण्यासाठी एक नवे द्वार खुले होईल. विशेष करून संशोधन अभ्यासकांसाठी, इतिहास आणि राजनीती विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी हे वाङ्ग्मय कोणत्याही बौद्धिक खजिन्यापेक्षा कमी नाही. बनारस हिंदू विद्यापीठाच्या स्थापनेशी संबंधित एक प्रसंग, काँग्रेसच्या शिर्ष नेतृत्वाबरोबर त्यांचा संवाद, ब्रिटिश राजवटी प्रति त्यांचे कडक धोरण, भारताच्या प्राचीन वारशाचा आदर …. या पुस्तकांमध्ये हे सारे काही आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे यापैकी एक खंड, ज्याचा राम बहादुर राय जी यांनी उल्लेख केला होता, महामना यांच्या व्यक्तिगत डायरीशी संबंधित आहे. महामना यांची डायरी समाज, राष्ट्र आणि अध्यात्म अशा सर्व आयामामध्ये भारतीय जनमानसाची पथदर्शक बनू शकते.
मित्रांनो,
या कामी मिळालेल्या यशाचे कारण म्हणजे या अभियानाचा चमू आणि आपण सर्वजण यांची कित्येक वर्षांची श्रमसाधना आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून मालवीय जी यांच्या हजारो पत्रांचा आणि दस्तऐवजांचा शोध घेणे त्यांना एकत्रित करणे, अनेक अभिलेखागारांमध्ये समुद्राप्रमाणे डुबक्या मारुन एकेक कागद शोधून आणणे, राजा महाराजांच्या व्यक्तिगत संग्रहातून पुरातन कागदपत्रांना एकत्र करणे, भगीरथी कार्यापेक्षा कमी नव्हे. याच अगाध परिश्रमांच्या फलस्वरुप महामना यांचे विराट व्यक्तित्व, 11 खंडांमध्ये, या संपूर्ण वाङ्ग्मयाच्या रूपात आपल्यासमोर आले आहे. या महान कार्यासाठी मी माहिती आणि प्रसारण मंत्रालय, महामना मालवीय मिशन आणि राम बहादुर राय जी तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना हृदयपूर्वक शुभेच्छा देतो. या कामामध्ये पुस्तकालयातील अनेक लोक , महामना यांच्याशी संबंधित लोकांचे कुटुंबीय यांनी खूप मोठे योगदान दिले आहे. मी त्या सर्व सहकाऱ्यांचे देखील हृदयपूर्वक अभिनंदन करतो आहे.
माझ्या कुटुंबीयांनो,
महामनासारखे व्यक्तित्व अनेक शतकातून एकदाच जन्म घेते. आणि भविष्यात येणाऱ्या अनेक शतकांपर्यंत प्रत्येक क्षणी, प्रत्येक वेळी लोक त्यांच्यापासून प्रभावित होतात. भारताच्या कैक पिढ्यांवर महामनाजींचे ऋण आहे. ते शिक्षण आणि योग्यते मध्ये त्या काळातील मोठमोठ्या विद्वानांच्या समान पातळीवर होते. ते आधुनिक विचार आणि सनातन संस्कारांचा संगम होते. त्यांनी स्वतंत्रता संग्रामात जितकी मोठी भूमिका निभावली आहे तितकेच सक्रिय योगदान देशाच्या अध्यात्मिक आत्म्याला जागृत करण्यात देखील दिले आहे. त्यांची एक नजर जर वर्तमानातील आव्हानांवर होती तर दुसरी नजर भविष्य निर्माण करण्यावर होती. महामना ज्या भूमिकेत होते त्यांनी ‘नेशन फर्स्ट’ ‘राष्ट्र प्रथम’ या संकल्पनेला अग्रस्थानी ठेवले. त्यांनी देशासाठी मोठ्यात मोठ्या ताकदीला देखील टक्कर दिली. अति कठीण परिस्थितीत देखील त्यांनी देशासाठी शक्यतांची नवी बीजे रोवली. महामना यांनी अशा अनेक प्रकारे योगदान दिले आहे जे संपूर्ण वाङ्ग्मयाच्या 11 खंडांच्या द्वारे आता प्रामाणिक रूपाने आपल्यासमोर येईल. आम्ही त्यांना भारतरत्न दिले हे आपल्या सरकारचे सौभाग्य आहे असे मी मानतो. महामना आणखी एका कारणामुळे खूपच खास आहेत. त्यांच्याप्रमाणे मला देखील ईश्वराने काशीची सेवा करण्याची संधी दिली आहे. आणि माझे हे देखील सौभाग्य आहे की 2014 मध्ये निवडणूक लढवण्यासाठी मी जे नामांकन पत्र भरले होते त्याला अनुमोदन देणारे मालवीयजी यांच्या कुटुंबाचेच एक सदस्य होते. महामना यांची काशीप्रति अगाध श्रद्धा होती. आज काशी विकासाची नवीन उंची गाठत आहे, आपल्या वारशाच्या गौरवाला पुनर्स्थापित करत आहे.
माझ्या कुटुंबीयांनो,
स्वातंत्र्याच्या अमृत काळात देश गुलामगीरीच्या मानसिकतेतून मुक्ती मिळवून आपल्या वारशाचा अभिमान बाळगळत आगेकूच करत आहे. आमच्या सरकारच्या कार्यामध्ये देखील तुम्हाला कुठे ना कुठे मालवीय जी यांच्या विचारांचा दरवळ अनुभवास येत असेल. मालवीय जी यांनी आपल्याला एका अशा राष्ट्राचा दृष्टिकोन दिला होता, ज्याच्या आधुनिक शरीरात देशाचा प्राचीन आत्मा सुरक्षित आणि संरक्षित राहील. जेव्हा ब्रिटिशांच्या विरोधात देशात शिक्षण बहिष्कृत करण्याबाबत चर्चा सुरू झाली तेव्हा मालवीय जी यांनी या गोष्टीला विरोध केला, ते या विचाराच्या विरोधात उभे राहिले. शिक्षणाला बहिष्कृत करण्याऐवजी आपण भारतीय मूल्यांवर आधारित स्वतंत्र शिक्षण प्रणाली तयार करण्याच्या दिशेने काम केले पाहिजे असे ते म्हणाले. आणि गंमत पहा, याची जबाबदारी देखील त्यांनी स्वतःच उचलली, आणि देशाला बनारस हिंदू विद्यापीठाच्या रूपात एक गौरवशाली संस्था प्रदान केली. ऑक्सफर्ड आणि केंब्रीज सारख्या संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या युवकांना त्यांनी बनारस हिंदू विद्यापीठात शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित केले. महामना इंग्रजीचे महान विद्वान असून देखील भारतीय भाषांचे प्रबळ पुरस्कर्ते होते. एक काळ होता जेव्हा देशाच्या व्यवस्थेमध्ये, न्यायालयामध्ये फारसी आणि इंग्रजी भाषा प्रभावी होत्या. मालवीय जी नी याच्या विरोधात देखील आवाज उठवला होता. त्यांच्या प्रयत्नानेच नागरी लिपी चलनात आली, भारतीय भाषांना सन्मान मिळाला. आज देशाच्या नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात देखील, मालवीयजींच्या या प्रयत्नांची झलक पाहायला मिळते. आम्ही भारतीय भाषांमध्ये उच्च शिक्षणाची नवी सुरुवात केली आहे. सरकार आज न्यायालयात देखील भारतीय भाषांमध्ये कामकाज चालवण्याला प्रोत्साहन देत आहे. या कामासाठी देशाला 75 वर्षे वाट पहावी लागली या गोष्टीचे दुःख वाटते.
मित्रांनो,
कोणतेही राष्ट्र सशक्त होण्यात त्या राष्ट्रातील संस्थांनाही तितकेच महत्त्वपूर्ण स्थान असते. मालवीय जी यांनी आपल्या आयुष्यात अशा अनेक संस्थांची निर्मिती केली जिथे राष्ट्रीय व्यक्तिमत्वे तयार झाली. बनारस हिंदू विद्यापीठाच्या बाबतीत तर संपूर्ण जग जाणून आहे. याशिवाय देखील महामना यांनी अनेक संस्थांची निर्मिती केली. हरिद्वार मधील ऋषिकुल ब्रह्मचर्याश्रम असो, प्रयागराज येथील भारती भवन पुस्तकालय असो किंवा लाहोर मधील सनातन धर्म महाविद्यालयाची स्थापना असो, मालवीय जी यांनी राष्ट्रनिर्माण करणाऱ्या अनेक संस्था देशाला समर्पित केल्या. जर आपण त्या काळाबरोबर तुलना केली तर आज पुन्हा एकदा भारत राष्ट्र निर्माण करणाऱ्या एकाहून एक वरचढ संस्थांचे सृजन करत आहे हे लक्षात येते.
सहकारी क्षेत्राच्या शक्तीच्या मदतीने देशाच्या विकासालाही वेग मिळावा, यासाठी स्वतंत्र सहकार मंत्रालय बनविण्यात आले आहे. भारतीय औषधोपचार पद्धतींचा विकास करण्यासाठी केंद्र सरकारने वेगळ्या आयुष मंत्रालयाची स्थापना केली आहे. जामनगरमध्ये ‘डब्ल्यूएचओ’ च्या ग्लोबल सेंटर फॉर ट्रॅडिशनल मेडिसीन’ची पायाभरणीही केली आहे. श्रीअन्न म्हणजे भरडधान्यावर संशोधन करण्यासाठी आम्ही ‘इंडियन इंन्स्टिट्यूट ऑफ मिलेटस रिसर्च’ची स्थापना केली आहे. ऊर्जा क्षेत्रामध्ये वैश्विक स्तरावर चर्चा होणा-या विषयांवर चिंतन करण्यासाठी भारताने गेल्या काही दिवसांमध्ये वैश्विक जैवइंधन आघाडी निर्माण केली आहे. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी असो अथवा सीडीआरआय म्हणजे आपत्ती रोधक पायाभूत सुविधा आघाडीची गोष्ट असो, ग्लोबल साउथसाठी ‘दक्षिण’ची स्थापना असो अथवा भारत-मध्य पूर्व-युरोप आर्थिक कॉरिडॉर, अंतराळ क्षेत्रासाठी ‘इन-स्पेस’ची निर्मिती असो किंवा नौदल क्षेत्रामध्ये सागर उपक्रम असो, भारत आज राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महत्व असलेल्या अनेक संस्थांचा निर्माता बनत आहे. या संस्था, 21 व्या शतकातल्या भारतालाच नाही, तर 21 व्या शतकातल्या संपूर्ण विश्वाला नवी दिशा देण्याचे काम करतील.
मित्रांनो,
महामना मालवीय जी आणि अटलजी, या दोन्ही ज्येष्ठ मंडळी एकाचा विचार प्रवाहाबरोबर जोडले गेले होते. महामना मालवीय जी यांच्याविषयी अटलजी म्हणाले होते, ‘‘ ज्यावेळी एखादी व्यक्ती सरकारी मदतीशिवाय काही करण्यासाठी पुढे होते, त्यावेळी महामना यांच्या व्यक्तित्वामुळे त्यांच्या कृतित्वामुळे , एका दीपशिखेप्रमाणे त्या व्यक्तीचा मार्ग उजळून टाकेल.’’ जी स्वप्ने मालवीय जींनी अटल जींनी आणि देशाच्या प्रत्येक स्वातंत्र्य सेनानीने पाहिले होते, त्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी आज देश कार्यरत आहे. याचा आधार आम्ही सुशासनाला बनवला आहे. ‘गुड गव्हर्नन्स’ला बनवला आहे. ‘गुड गव्हर्नन्स’ म्हणजे असे असते की, ज्यावेळी शासनाच्या केद्रंस्थानी सत्ता नसते, सत्ताभावही नसतो मात्र सेवाभाव असतो. ज्यावेळी तुम्ही चांगल्या विचारांनी, चांगल्या दृष्टीकोनातून, संवेदनशीलतेने धोरणांची निर्मिती करता आणि ज्यावेळी प्रत्येकाला त्याचा- त्याचा हक्क कोणताही भेदभाव न करता त्याला पूर्ण हक्क देता, ते ‘गुड गव्हर्नन्स’ असते. गुड गव्हर्नन्सचा हा सिद्धांत आज आमच्या सरकारची ओळख बनली आहे.
आमच्या सरकारचा सातत्याने प्रयत्न असतो की, देशाच्या नागरिकांना मूळ अधिकारासाठी इकडे-तिकडे वारंवार फे-या माराव्या लागू नयेत. उलट सरकार, आज प्रत्येक नागरिकापर्यंत स्वतःहून जावून त्याला प्रत्येक सुविधा देत आहे. आणि आता तर आमचा असा प्रयत्न आहे की, प्रत्येक सुविधेने संतृप्तेचा स्तर गाठावा. 100 टक्के अंमलबजावणी केली जावी. यासाठी, देशभरामध्ये विकसित भारत संकल्प यात्रा काढण्यात आली आहे. तुम्ही पाहिलं असेल, ‘मोदी की गॅरंटी’ची गाडी, देशातल्या गावांमध्ये आणि शहरांमध्ये पाहोचत आहेत. लाभार्थ्यांना लगेच, त्याच ठिकाणी अनेक योजनांचा लाभ मिळत आहे. मी आपल्याला एक उदाहरण देतो. आज केंद्र सरकार, प्रत्येक गरीबाला 5 लाख रूपयांपर्यंत मोफत औषधोपचार करण्यासाठी आयुष्मान कार्ड देत आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कोट्यवधी गरीबांना हे कार्ड देण्यात आले आहेत. परंतु तरीही अनेक भागांमध्ये या कार्डांविषयी जागरूकता निर्माण झालेली नव्हती. त्यामुळे गरीबांपर्यंत हे आयुष्मान कार्ड पोहोचू शकले नव्हते. आता ‘मोदी की गॅरंटी’ या गाडीने अवघ्या 40 दिवसांमध्ये एक कोटींपेक्षाही जास्त लोकांना नवीन आयुष्मान कार्ड तयार करून दिले आहे. ज्यांच्याकडे कार्ड नव्हते, त्यांना शोधून काढून कार्ड देण्यात आले आहे. एकही व्यक्ती सुविधा मिळण्यापासून वंचित राहू नये... कोणीही मागे राहू नये.... ‘सबका साथ हो, सबका विकास हो’ हेच तर सुशासन आहे. हेच तर ‘गुड गव्हर्नन्स’ आहे.
मित्रांनो,
सुशासनाचा आणखी पैलू आहे, ते म्हणजे प्रामाणिकपणा आणि पारदर्शकता. आपल्या देशामध्ये अशी धारणा बनली होती की, मोठ-मोठे घोटाळे, आणि गैरव्यवहार यांच्याशिवाय सरकार चालूच शकत नाहीत. 2014 च्या आधी आपण लाखो- कोट्यवधी रूपयांचे घोटाळे झाल्याची चर्चा ऐकत होतो. परंतु आमच्या सरकारने, सरकारच्या सुशासनाने या शंकांनी भरलेल्या धारणांना खोटे ठरवले आहे. आज लाखो -कोट्यवधी रूपयांच्या योजना गरीबांच्या कल्याणासाठी चालवल्या जात असलेल्या योजनांची चर्चा होत आहे. गरीबांना मोफत अन्नधान्य पुरवण्याच्या योजनेवर आम्ही 4 लाख कोटी रूपये खर्च करीत आहे. गरीबांना पक्की घरकुले देण्यासाठीही आमचे सरकार 4 लाख कोटी रूपये खर्च करीत आहे. प्रत्येक घरापर्यंत नळाव्दारे पेयजल पोहोचविण्यासाठी 3 लाख कोटी रूपयांपेक्षा जास्त खर्च केला जात आहे. प्रामाणिक करदात्यांचा प्रत्येक पै ना पै लोकांच्या हितासाठी, राष्ट्रहितासाठी खर्च केला जात आहे..... हेच तर ‘गुड गव्हर्नन्स‘ आहे.
आणि मित्रांनो,
ज्यावेळी अशा पद्धतीने प्रामाणिकपणे काम होते, धोरण बनवले जाते, त्याचा परिणामही चांगला मिळतो. या ‘गुड गव्हर्नन्स’चा परिणाम असा आहे की, आमच्या सरकारच्या फक्त पाच वर्षांच्या कार्यकाळामध्ये साडे तेरा लाख लोक द्रारिद्र्य रेषेच्या बाहेर आले आहेत.
मित्रांनो,
संवेदनशीलतेशिवाय ‘गुड गव्हर्नन्स’ ची कल्पनाही करू शकत नाही. आपल्याकडे 110 पेक्षा अधिक जिल्हे असे होते की, त्यांना मागास मानून, त्यांचे काय व्हायचे ते होवू दे, असे त्यांच्यावरच सोडून देण्यात आले होते. आणि असे सांगितले जात होते की, हे 110 जिल्हे मागास आहेत, म्हणून देशही मागास राहील. ज्यावेळी एखाद्या अधिका-याला शिक्षा म्हणून बदली द्यायची असायची, त्यावेळी त्या अधिका-याला या जिल्ह्यांमध्ये पाठवले जात होते. अशी पक्की समजूतच करून घेतली होती की, या 110 जिल्ह्यांमध्ये कोणताही बदल होवू शकणार नाही. अशा विचारांमुळे हे जिल्हेही कधी पुढे जावू शकत नव्हते. आणि देशाचा विकास करू शकत नव्हते. म्हणूनच आमच्या सरकारने या 110 जिल्ह्यांना आकांक्षित जिल्हे अशी ओळख दिली. आम्ही मिशन मोडवर या जिल्ह्यांच्या विकासावर लक्ष्य केंद्रीत केले. आज हे आकांक्षित जिल्हे विकासाच्या अनेक परिमाणांचा, मोजपट्ट्यांचा विचार केला तर इतर जिल्ह्यांपेक्षाही खूप चांगले प्रदर्शन करीत आहेत. या उत्साहाने, चैतन्याने पुढे जावून, आज आम्ही आकांक्षित तालुके कार्यक्रमावर काम करीत आहोत.
मित्रांनो,
ज्यावेळी विचार आणि दृष्टीकोन बदलतो, त्यावेळी त्याचे परिणामही तसेच दिसून येतात. दशकांपासून सीमेवरील आमच्या गावांना शेवटचे, अंतिम गाव असे मानले गेले आहे. आम्ही त्यांना देशाचे पहिले गाव असल्याचा विश्वास दिला. आम्ही सीमावर्ती गावांमध्ये ‘व्हायब्रंट व्हिलेज’ ही योजना सुरू केली. आज सरकारचे अधिकारी, मंत्री, तिथं जात आहेत, लोकांच्या गाठीभेटी घेत आहेत. माझ्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांना मी काही गोष्टी अनिवार्य केल्या होत्या. ज्या गावांना आत्तापर्यंत शेवटचे गाव असे संबोधले जात होते, त्या गावांना मी पहिले गाव म्हणतो. मंत्र्यांना सांगितले की, या पहिल्या गावामध्ये जावून, तिथं रात्रीचा मुक्काम जरूर करावा. काही गावे तर 17-17 हजार फूट उंचीवर आहेत.
आज सरकारच्या योजनांचा लाभ त्यांना मिळतो आहे, तसेच योजना वेगाने तिथे पोहोचत आहेत. हे ‘गुड गव्हर्नन्स’च आहे, नाहीतर दुसरे काय असू शकते? आज देशामध्ये कोणतीही दुःखद गोष्ट घडली, दुःखद अपघात घडला, कोणती एखादी विपत्ती आली, तर सरकार अतिशय वेगाने त्या ठिकाणी मदत कार्य, बचावाचे कार्य सुरू करते. ही गोष्ट आपण कोरोना काळात पाहिली आहे. आम्ही युक्रेन युद्धाचा काळही पाहिला आहे. जगामध्ये कुठेही संकटाची परिस्थिती निर्माण झाली तर, देश आपल्या नागरिकांचा बचाव करण्यासाठी युद्धपातळीवर काम करते. ‘गुड गव्हर्नन्स’ची मी अशीच अनेक उदाहरणे आपल्याला देवू शकतो. शासनाच्या कार्यपद्धतीमध्ये झालेल्या परिवर्तनामुळे, आता समाजाची विचार करण्याची पद्धतही बदलत आहे. म्हणूनच आज भारतामध्ये जनता आणि सरकार यांच्यामध्ये विश्वास अधिक दृढ झाला आहे. हाच विश्वास देशाच्या आत्मविश्वासामध्ये दिसून येत आहे. आणि हा आत्मविश्वास, स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये विकसित भारताच्या निर्माणाची ऊर्जा बनत आहे.
मित्रांनो,
स्वातंत्र्याच्या अमृतकाळामध्ये आपल्याला महामना मालवीय जी आणि अटल जी, यांच्या विचारांच्या कसोटीवर उतरून विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करायचे आहे. मला विश्वास आहे, देशाचा प्रत्येक नागरिक ’संकल्प से सिद्धी’च्या या मार्गावर आपले संपूर्ण योगदान देईल. अशीच कामना करून, पुन्हा एकदा महामना मालवीयजींच्या चरणी वंदन करतो आणि माझ्या वाणीला विराम देतो.
खूप -खूप धन्यवाद!
***
NM/S.Mukhedkar/S.Bedekar/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1990413)
Visitor Counter : 69
Read this release in:
English
,
Urdu
,
Hindi
,
Assamese
,
Bengali
,
Manipuri
,
Punjabi
,
Gujarati
,
Odia
,
Tamil
,
Telugu
,
Kannada
,
Malayalam
,
Malayalam