खाण मंत्रालय

केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या हस्ते राष्ट्रीय भू विज्ञान डेटा भांडार पोर्टलचे उद्घाटन

Posted On: 20 DEC 2023 5:25PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 20 डिसेंबर 2023 

 

महत्वाच्या आणि धोरणात्मक खनिजांच्या 29 नोव्हेंबर 2023 रोजी सुरू केलेल्या लिलावाचा पहिला टप्पा यशस्वी करण्यासाठी, खाण मंत्रालयाने काल, म्हणजे 19 डिसेंबर 2023 रोजी केंद्रीय संसदीय कामकाज, कोळसा आणि खाण मंत्री प्रल्हाद जोशी, खाण, कोळसा आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे आणि खाण मंत्रालयाचे सचिव व्ही. एल. कांता राव यांच्या उपस्थितीत रोड शो आयोजित केला होता. मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी, उद्योग संघटना आणि सार्वजनिक उपक्रमांचे प्रतिनिधी या रोड शोला उपस्थित होते. या कार्यक्रमात 45 हून अधिक कंपन्या, सल्लागार आणि उत्खनन संस्थाही सहभागी झाल्या होत्या. मंत्री प्रल्हाद जोशी यांनी या कार्यक्रमादरम्यान नॅशनल जिओसायन्स डेटा रिपॉझिटरी पोर्टल म्हणजेच राष्ट्रीय भू विज्ञान डेटा भांडार पोर्टलचा शुभारंभ केला.

यावेळी जोशी यांनी,  देशांतर्गत खनिज उत्पादन वाढवण्यासाठी, आणि खनिज क्षेत्रात आत्मनिर्भर होण्यासाठी , मंत्रालय करत असलेल्या विविध प्रयत्न आणि उपक्रमांची माहिती दिली.

महत्वाच्या खाणींच्या लिलावाचा पहिला टप्पा यशस्वी होईल, अशी आशा राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील यांनी यावेळी व्यक्त केली. आत्मनिर्भर भारताच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आणि आर्थिक विकासात भर घालणारी, ज्यावर अवलंबून राहता येईल, अशी खनिज पुरवठा साखळी निर्माण करण्याच्या दृष्टिनं हे एक सकारात्मक पाऊल असल्याचं दानवे म्हणाले.

सरकारच्या राष्ट्रीय खनिज उत्खनन धोरण, 2016 चा एक भाग म्हणून राष्ट्रीय भूविज्ञान डेटा भंडार तयार करण्यात आलं आहे. देशातील खनिज उत्खननाची व्याप्ती वाढवण्यासाठी तसेच त्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी सर्व आधारभूत आणि  उत्खनन-संबंधित भू-वैज्ञानिक डेटा, यामुळे एकाच जीआयएस प्लॅटफॉर्मवर उपलब्ध होऊ शकेल.

राष्ट्रीय भू-विज्ञान डेटा पोर्टलची (NGDR) ठळक वैशिष्ट्ये :

  1. केंद्रीकृत उपलब्धता : यामुळे, विविध भूवैज्ञानिक डेटा, ज्यात, भौगोलिक नकाशे, खनिज स्त्रोत, भूकंपविषयक माहिती आणि पर्यावरणविषयक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होऊ शकेल.  
  2. वापरकर्त्यांसाठी सुलभ इंटरफेस: सलग दिशादर्शन आणि डेटाचा शोध सक्षम करून, वापरकर्त्यांच्या विस्तृत श्रेणीची पूर्तता करण्यासाठी इंटरफेसची सुलभ संरचना करण्यात आली आहे.
  3. एमईआरटी नमुना: खनिज उत्खनन माहिती नमुना – एमईआरटी मुळे, भू वैज्ञानिक गोष्टींशी संबंधित सर्व भागधरकांना आपला डेटा एकाच प्रमाणित नमुना पद्धतीत भरण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे.
  4. विश्लेषणात्मक साधनेः गुंतागुंतीच्या भू-स्थानिक माहितीचा अर्थ लावण्यासाठी आणि त्यातून वेगळी माहिती शोधण्यासाठी अत्याधुनिक विश्लेषणात्मक साधनांनी सुसज्ज असे पोर्टल.
  5. मुक्त उपलब्धता : भूविज्ञानविषयक संपत्तीच्या माहितीची मुक्त उपलब्धता देऊन पारदर्शकता आणि ज्ञानाच्या देवाणघेवाणीस प्रोत्साहन दिले आहे. 

पोर्टल कसे बघावे:

NGDR पोर्टल बघण्यासाठी https://geodataindia.gov.in. वर क्लिक करा.

 

* * *

S.Bedekar/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1988761) Visitor Counter : 61