पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताला जागतिक दर्जा मिळालाः भूपेंद्र यादव
हवामान संवर्धक कृती, नवोन्मेष आणि तंत्रज्ञानातील भारताच्या नेतृत्वाला जगाची मान्यता: भूपेंद्र यादव
जागतिक मंदीच्या काळात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील भारत हे एक उज्ज्वल ठिकाण आहे हे जगाने जाणले: भूपेंद्र यादव
Posted On:
19 DEC 2023 6:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 19 डिसेंबर 2023
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला जागतिक दर्जा मिळाला आहे आणि हवामान कृती, नवोन्मेष तसेच तंत्रज्ञानातील त्यांच्या नेतृत्वाला जगाने मान्यता दिली आहे असे केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल, कामगार आणि रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज म्हटले आहे.
जागतिक स्तरावर भारताची वाढती पत या विषयावरील पत्रकार परिषदेला यादव संबोधित करत होते. "भारताने केवळ 615 कोटी रुपये खर्च करून चंद्रमोहिम यशस्वी केली. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचणारा भारत हा पहिला देश आहे. चांद्रयान 3 सह भारताच्या अंतराळ प्रवासातील सर्वात महत्त्वाच्या घडामोडींपैकी एक म्हणजे आत्मनिर्भरतेचे महत्त्व. भारताच्या सुरुवातीच्या मोहिमा आंतरराष्ट्रीय भागीदारीवर अवलंबून होत्या, तर चांद्रयान-3 हे स्वयंपूर्णतेच्या दिशेने टाकलेले एक पाऊल होते असे ते म्हणाले.
"नरेंद्र मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वामुळे हे शक्य झाले आहे" असे यादव म्हणाले.
कोविड महामारीला दिलेल्या प्रतिसादामुळे भारताने जगाला कसे आश्चर्यचकित केले याकडे केंद्रीय मंत्र्यांनी लक्ष वेधले. "जेव्हा कोविड महामारी आली, तेव्हा जगाला वाटले की भारत कोसळेल. भारत केवळ ताठ उभा राहिला नाही तर कोविडला दिलेला त्याचा प्रतिसाद जगासाठी एक उदाहरण बनला.
भारताच्या कोविड प्रतिसादाबद्दलच्या जागतिक कौतुकावर प्रकाश टाकताना यादव म्हणाले, "डब्ल्यू. एच. ओ. ने हे देखील मान्य केले आहे की 'भारत है एक सज्ज जग आहे'.
भारताच्या आर्थिक लवचिकतेबद्दल बोलताना यादव म्हणाले की, "कोविड नंतर भारतीय अर्थव्यवस्था कोसळेल अशी भीती होती. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने या संकटाचे संधीत रूपांतर केले. कोविड-19 चा सामना करण्यासाठी भारताने केलेल्या प्रयत्नांचे जगाने कौतुक केले. आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि इतरांसारख्या आंतरराष्ट्रीय संघटनांनी चीन आणि अमेरिकेला मागे टाकत भारताने साधलेल्या उल्लेखनीय आर्थिक पुनर्प्राप्तीची नोंद घेतली.
आंतरराष्ट्रीय नाणेनिधी, जागतिक बँक आणि अनेक जागतिक प्रमुख संस्थानी जागतिक मंदीच्या काळात भारत हा एक उज्ज्वल बिंदू असल्याचे मान्य केले आहे. "भारत 2022 मध्ये, सकल देशांतर्गत उत्पादनात ब्रिटनला मागे टाकत जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला. जागतिक बँकेने वित्तीय वर्षासाठी भारताची जीडीपी वाढ 6.3 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवला आहे. भारताचा विकास अमेरिका (2.1 टक्के), चीन (4.4 टक्के) आणि युरोपक्षेत्र (0.7 टक्के) (आय. एम. एफ., ऑक्टोबर 2023) यासारख्या प्रमुख अर्थव्यवस्थांना मागे टाकत आहे ", असे यादव म्हणाले.
जागतिक दिग्गज कंपन्या भारताकडे त्यांचे उत्पादन केंद्र म्हणून कसे वळत आहेत याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
"ऍपलने भारतात आपला नवीन आयफोन 15 तयार करण्यास सुरुवात केली आहे. तैवानच्या फॉक्सकॉनने भारतात सेमीकंडक्टर्स संयुक्तपणे तयार करण्यासाठी वेदांतसोबत हातमिळवणी केली आहे", असे त्यांनी अधोरेखित केले.
भारत जीडीपीच्या बाबतीत जर्मनीला 2025 मध्ये आणि 2027 मध्ये जपानला मागे टाकत अमेरिका आणि चीननंतर तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्यासाठी सज्ज आहे, असे यादव म्हणाले.
"पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 2047 पर्यंत भारताला एक विकसित देश बनवण्याचे वचन दिले आहे. जेव्हा भारत स्वातंत्र्याचा 100 वा वर्धापन दिन साजरा करत असेल आणि ही अमृत काळाची अनुभूती असेल." असे केंद्रीय मंत्र्यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय व्यवस्थांप्रती भारताची भूमिका, आपले अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मूलाधार जे या संपूर्ण विश्वाला आपलेच घर मानण्याची शिकवण देते (वसुधैव कुटुम्बकम) आणि सर्वजण सुखी आणि आनंदी असावेत (सर्वे भवन्तु सुखिनः) या धारणेप्रती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वैयक्तिक विश्वास सरकारच्या धोरणांमध्ये एकवटलेला आहे. यामुळेच त्यांना लोकांचा विश्वास संपादन करता आला आहे ज्यामध्ये जगभरात विखुरलेल्या भारतीय समुदायाचा देखील समावेश आहे आणि त्यामुळेच लोकांचा त्यांच्या मूलाधाराविषयीचा विश्वास दृढ झाला आहे.
भारताच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचा समावेश असलेली सॉफ्ट पॉवर जागतिक स्तरावर आपले प्रभुत्व दर्शवण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावत आहे. योगाभ्यास आणि आयुर्वेदासारख्या भारताच्या प्राचीन परंपरांना पंतप्रधानांच्या प्रयत्नांमुळे जगभर लोकप्रियता लाभली आहे. नाटु नाटु आणि द एलिफंट व्हिस्परर्स ला मिळालेले ऑस्कर पुरस्कार हे सॉफ्ट पॉवरचेच द्योतक आहे, असे यादव यांनी सांगितले.
जेव्हापासून नरेंद्र मोदी यांनी भारताचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारला आहे, तेव्हापासून जागतिक स्तरावर भारताचे स्थान उंचावले आहेच शिवाय जगातील प्रमुख नेत्यांवर देखील याचा मोठा प्रभाव पडला आहे. जागतिक नेत्यांनी निःसंदिग्धपणे पंतप्रधानांची प्रशंसा केली आहे.
“गेल्या 10 वर्षात भारताने देशात सर्व स्तरांवर सकारात्मक भावना निर्माण केली आहे. आज आपले तरुण नोकऱ्या शोधण्याऐवजी नोकरी देणारे बनत आहेत." असे ते म्हणाले.
जागतिक नेतृत्व प्रतिबिंबित करणाऱ्या हवामान बदल क्षेत्रातील कृतींमध्ये भारताने केलेल्या सकारात्मक लाभांवर त्यांनी प्रकाश टाकला.
"भारताने जागतिक हवामान बदल कृतींमध्ये सक्रिय सहभाग घेतला असून नवीकरणीय ऊर्जेबाबत वचनबद्धता व्यक्त केली आहे. आपण अशा 26 देशांपैकी आहोत ज्यांनी 2019 च्या हरितगृह वायू इन्व्हेंटरीवर आधारित हवामान बदलावरील संयुक्त राष्ट्र फ्रेमवर्क कन्व्हेन्शन UNFCCC सोबत प्रारंभिक अनुकूलन संवादासह राष्ट्रीय संप्रेषण सामायिक केले आहे. भारताने हवामान बदल कृतीसाठी आंतरराष्ट्रीय सौर आघाडी , LEAD-IT, CDRI, IRIS, ग्रीन क्रेडिट इनिशिएटिव्ह आणि इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्स यासारखे मंच सुरू केले आहेत. भारताने नवीकरणीय ऊर्जा क्षेत्रात 2030 साठी निश्चित केलेले उद्दिष्ट 2020-21 मध्येच साध्य केले आहे."
याशिवाय जगभरात शांतता प्रस्थापित करण्यासाठी भारत करत असलेल्या प्रयत्नांना त्यांनी अधोरेखित केले.
भारताने भूकंप आणि पूर अशा नैसर्गिक आपत्तीच्या काळात अनेक देशांना सहाय्य केले आहे. आपण जेनेरिक औषधे आणि परवडणारी आरोग्य सेवा सुविधांचे अग्रणी उत्पादक आहोत. त्याचप्रमाणे भारत आरोग्य सेवा क्षेत्रात टेली मेडिसीन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांसारख्या नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करत आहे. आपण मानवतावादी कर्तव्याच्या भावनेतून हिंसक संघर्ष असलेल्या किंवा युद्धग्रस्त देशांना मदत पाठवत आहोत.”
* * *
S.Tupe/Vinayak/Bhakti/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1988386)
Visitor Counter : 92