पंतप्रधान कार्यालय

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे विकसित भारत संकल्प यात्रेत (शहरी) पंतप्रधान सहभागी


“लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. त्याऐवजी सरकारने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे”

“विकसित भारत संकल्प यात्रा ही माझ्यासाठी परीक्षा आहे. इच्छित परिणाम साध्य झाले का याबाबत मला लोकांकडून ऐकायची इच्छा आहे”

"यशस्वी योजना नागरिकांमध्ये स्वामित्वाची भावना निर्माण करतात"

“विकसित भारताचे बीज एकदा पेरले की पुढच्या 25 वर्षात त्याची फळे आपल्या भावी पिढ्यांना चाखता येतील”

“विकसित भारत, हा सर्व संकटातून मुक्तीचा मार्ग”

Posted On: 17 DEC 2023 6:03PM by PIB Mumbai

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कार्यक्रमस्थळी असलेल्या स्टॉल्सवरून  फेरफटका मारला आणि विकसित भारत यात्रा व्हॅन तसेच प्रश्नमंजुषा कार्यक्रमाला भेट दिली.  यावेळी पंतप्रधानांनी विविध सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला आणि त्यांना संबोधितही केले.  कार्यक्रमादरम्यान विकसीत भारत संकल्प शपथही घेण्यात आली.

भारतभरातील सर्व खासदार  आपापल्या मतदारसंघातील विकसित भारत संकल्प यात्रेत सहभागी होत असल्याचे पंतप्रधानांनी उपस्थितांना संबोधित करताना सांगितले. आपणही वाराणसीतील विकसित भारत संकल्प यात्रेमध्ये वाराणसीचा खासदार आणि शहराचा 'सेवक' म्हणून सहभागी होत असल्याचे पंतप्रधान म्हणाले. कल्याणकारी सरकारी योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत कालबद्ध रीतीने आणि कोणत्याही अडचणीशिवाय पोहोचवण्याची गरज पंतप्रधानांनी अधोरेखित केली.  लाभार्थ्यांना सरकारी कार्यालयात फेऱ्या मारण्याची गरज नाही. त्याऐवजी सरकारने लाभार्थ्यांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. असे पंतप्रधान म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत 4 कोटी कुटुंबांना पक्की घरे देण्यात आल्याची माहिती देताना पंतप्रधानांनी सरकारी योजनांच्या संपृक्ततेची गरज निदर्शनास आणून देत  मागे राहिलेल्या लोकांपर्यंत पोहोचण्याच्या गरजेवरही पंतप्रधानांनी भर दिला.  विकसित भारत संकल्प यात्रेचे उद्दिष्ट आतापर्यंत जे मागे राहिले आहेत त्यांच्यापर्यंत योजनांचे लाभ पोहचवण्यासोबतच लाभार्थ्यांचे अनुभव नोंदवणे हे देखील आहे, असे पंतप्रधान म्हणाले.  "विकसित भारत संकल्प यात्रा ही  माझ्यासाठी एक कसोटी आहे", असे पंतप्रधान म्हणाले. अपेक्षित परिणाम साधले गेले आहेत का याचे उत्तर लोकांकडून ऐकायचे आहे, असेही ते म्हणाले.  काही काळापूर्वी लाभार्थींशी झालेल्या संवादाचे स्मरण करून पंतप्रधानांनी आयुष्मान भारत आणि आयुष्मान कार्ड यांसारख्या योजनांच्या फायद्यांचा उल्लेख केला. सरकारी योजनांची मूळ स्तरावर अंमलबजावणी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर होत असलेला सकारात्मक कामाचा प्रभाव अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की, यामुळे अधिकाऱ्यांना उत्साह आणि समाधान मिळत आहे.  सर्व स्तरावर  सरकारी योजनांच्या अंमलबजावणीच्या परिणामामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे एक नवे चैतन्यदायी दार उघडले आहे आणि हे  केवळ विकसित भारत संकल्प यात्रेमुळे शक्य होत आहे”, असे पंतप्रधान म्हणाले.

पंतप्रधानांनी समाधान व्यक्त केले आणि योजनांचा प्रभाव जाणून घेण्याचे  परिवर्तनीय सामर्थ्य विशद केले. ते म्हणाले की, हे जाणून समाधान वाटले की या योजना आपल्या स्वयंपाक घरे धुर मुक्त करत आहेत, योजनेमधून निर्माण झालेली पक्की घरे नवा आत्मविश्वास मिळवून देत आहेत, गरीब वर्गामध्ये सक्षमतेची भावना निर्माण झाली  आहे आणि श्रीमंत आणि गरीब यांच्यातील दरी कमी होत आहे, हे सर्व समाधानदायी आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, यशस्वी योजनांमुळे नागरिकांमध्ये स्वामित्वाची भावना निर्माण होत आहे. ज्या माणसाला कर्ज आणि इतर सुविधा मिळालेल्या आहेत त्याला देशाविषयी  आपलेपणा निर्माण   झाला आहे, ही आपली रेल्वे आहे, हे आपले कार्यालय आहे, हे आपले रुग्णालय आहे. जेव्हा अशी आपलेपणाची भावना निर्माण होते तेव्हा देशासाठी काहीतरी करण्याची इच्छाही निर्माण होते, असे पंतप्रधान मोदी म्हणाले. यामुळे येणाऱ्या पिढ्यांच्या चांगल्या भविष्यासाठी लोकांमध्ये आत्मविश्वास दृढ होईल.

पंतप्रधान मोदींनी यावेळी स्वातंत्र्यापूर्वीच्या काळाची आठवण काढली जेव्हा देशात सुरू केलेली प्रत्येक कृती स्वतंत्र भारत साध्य करण्याच्या समान ध्येयासाठी होती. "प्रत्येक नागरिक आपापल्यापरीने  स्वातंत्र्यासाठी योगदान देत होता", पंतप्रधान म्हणाले की, यामुळे समाजात एकतेचे वातावरण निर्माण झाले होते आणि यामुळेच शेवटी ब्रिटीशांना आपला भारत देश सोडून जावे लागले. विकसित भारताचा संकल्प पूर्ण करण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्तीचा आदर करून देशाला पुढे नेण्यासाठी अशीच दृष्टी विकसित होणे गरजेचे आहे असे यावेळी पंतप्रधानांनी नमूद केले. " विकसित भारताचे बीज एकदा पेरले गेले की, पुढील 25 वर्षांचे फळ आपल्या भावी पिढ्यांना चाखायला मिळेल असेही ते यावेळी  म्हणाले, "प्रत्येक भारतीयाला आपली अशी मानसिकता तयार करावी लागेल आणि यासाठी आजच संकल्प घ्यावा लागेल.

विकसित भारत संकल्प यात्रा हे कोणत्याही एका राजकीय पक्षाचे कार्य नसून हा एक राष्ट्रीय उपक्रम आहे, आणि हे एक पवित्र कर्तव्य असल्याचे ते म्हणाले. या कार्यात जनतेने थेट सहभाग घ्यावा. "एखाद्याला याविषयी  जर केवळ वर्तमानपत्रात वाचून समाधान मिळत असेल तर तो काहीतरी महत्त्वाची गोष्ट गमावून बसणार आहे", असेही पंतप्रधान म्हणाले. या यात्रे संबंधित विविध उपक्रमांना आपल्याला प्रत्यक्ष उपस्थित राहता आल्याबद्दल त्यांनी वैयक्तिक समाधानही व्यक्त केले.

त्यांनी लाभार्थी आणि नागरिकांना या संकल्प यात्रेबाबत सक्रियपणे प्रचार करण्याचे आवाहन केले. 'सकारात्मकतेमुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते', असे ते म्हणाले. व्हीबीएसवाय, अर्थात विकसित भारत संकल्प यात्रा हा एक भव्य संकल्प असल्याचे सांगून पंतप्रधानांनी सबका प्रयासच्या माध्यमातून हा संकल्प साकार करण्याचे आवाहन केले. आर्थिकदृष्ट्या मजबूत झालेल्या विकसित भारतामध्ये नागरिकांच्या सर्व समस्यांवर मार्ग निघेल आणि त्या समस्या नष्ट होतील. सर्व अडचणींमधून मुक्त होण्याचा मार्ग विकसित भारताच्या संकल्पातून जातो. मी काशीच्या जनतेला खात्री देतो की तुमचा प्रतिनिधी म्हणून आणि तुम्ही माझ्यावर जी राष्ट्रीय जबाबदारी सोपवली आहे त्यासाठीच्या प्रयत्नात  मी कोणतीही कसर सोडणार नाहीआश्वासन देत पंतप्रधानांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.

यावेळी पंतप्रधानांसोबत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

***

N.Chitale/S.Mukhedkar/V.Yadav/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com  /PIBMumbai    /pibmumbai



(Release ID: 1987520) Visitor Counter : 87