माहिती आणि प्रसारण मंत्रालय
दिल्ली येथे विकसित भारत संकल्प यात्रेदरम्यान हाती घेण्यात आलेले उपक्रम
केंद्रीय माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्र यांनी सफदरजंग एनक्लेव्हजवळ हुमायुनपूर येथे लाभार्थ्यांशी साधला संवाद
Posted On:
06 DEC 2023 6:48PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 6 डिसेंबर 2023
विविध माहिती उपक्रमांच्या माध्यमातून केंद्र सरकारतर्फे राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या संदर्भात जागरुकता वाढवणे तसेच विविध कल्याणकारी कार्यक्रमांच्या बाबतीत संपृक्तता साधणे या उद्देशाने दिल्ली आणि इतर शहरांमध्ये विविध ठिकाणी विकसित भारत संकल्प यात्रा शहरी अभियान राबवण्यात येत आहे. आतापर्यंत दिल्लीच्या विविध जिल्ह्यांमध्ये 85 ठिकाणी विकसित भारत आयईसी व्हॅननी भेट दिली असून पंतप्रधान स्वनिधी, मुद्रा कर्ज योजना, स्टँड अप इंडिया, डिजिटल भरणा क्रांती,पंतप्रधान ई-बस सेवा, आयुष्मान भारत, पंतप्रधान आवास (शहरी), पंतप्रधान उज्ज्वला योजना यांसह सरकारच्या सर्व योजनांबाबत जागरुकता पसरवत आहे.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालय सचिव अपूर्व चंद्र यांनी आज दक्षिण दिल्लीतील सफदरजंग एनक्लेव्हमध्ये हुमायूनपूर येथे विकसित भारत संकल्प यात्रेचा भाग म्हणून आयोजित कार्यक्रमात भाग घेतला. त्यांनी यावेळी उपस्थितांना विकसित भारत संबंधी शपथ दिली आणि याप्रसंगी उपस्थित असलेल्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला. जनतेच्या दारापर्यंत पोहोचून त्यांना केंद्र सरकारी योजनांचे लाभ मिळवून देणे हा या यात्रेच्या आयोजनामागील उद्देश आहे. या अभियानाचा भाग म्हणून देशभरात दोन हजारहून अधिक व्हॅन्स फिरत असून जानेवारी अखेरपर्यंत 2.60 लाखांहून अधिक ग्राम पंचायती आणि 3,600 शहरी स्थानिक संस्थांपर्यंत पोहोचण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे.
या अभियानाचा भाग म्हणून विशेष पद्धतीने रचना केलेल्या 5 आयईसी (माहिती, शिक्षण, संवाद) व्हॅन्स दिल्लीच्या 11 जिल्ह्यांमध्ये 600 हून अधिक ठिकाणी भेट देण्यासाठी प्रवास करत आहेत.
पंतप्रधान स्वनिधी शिबीर, आरोग्य शिबीर, आयुष्मान कार्ड शिबीर, आधार अद्ययावतीकरण शिबीर, पंतप्रधान उज्ज्वला शिबीर अशी अनेक प्रकारची शिबिरे विकसित भारत कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजित करण्यात येत आहेत. प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या ठिकाणी उपलब्ध सेवांचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने लोक, विशेषतः महिला या शिबिरांना भेट देत आहेत.
आदिवासी दिनानिमित्त झारखंड मधील खुंटी गावातून 15 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झेंडा फडकावून विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात करण्यात आली. दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही.के.सक्सेना यांच्या हस्ते 28 नोव्हेंबर रोजी दिल्लीतील शहरी अभियानाला सुरुवात करण्यात आली.
S.Patil/S.Chitnis/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:@PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com /PIBMumbai /pibmumbai
(Release ID: 1983273)
Visitor Counter : 91