माहिती आणि प्रसारण मंत्रालय
iffi banner
0 3

राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत विविध भाषांमधील 5,000 पेक्षा जास्त चित्रपट 4k डिजिटल फॉरमॅटमध्ये पुनरुज्जीवित करणार- माहिती आणि प्रसारणमंत्री


54व्या इफ्फीमध्ये उल्लेखनीय प्रारंभ आणि इतिहास घडवणाऱ्या कामगिरींचा समावेशः अनुरागसिंह ठाकूर

54व्या इफ्फीमध्ये सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्राप्त केल्याबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावरील नामवंत सिनेव्यक्तिमत्व असलेल्या मायकेल डग्लस यांचे माहिती आणि प्रसारणमंत्र्यांनी केले अभिनंदन

गोवा/मुंबई, 28 नोव्‍हेंबर 2023

 

माहिती आणि प्रसारणमंत्री आणि केंद्रीय क्रीडा आणि युवा व्यवहारमंत्री अनुरागसिंह ठाकूर यांनी 54वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव(इफ्फी 54) म्हणजे विविधतेतील एकतेचा पुरस्कार करणारा, वसुधैव कुटुंबकमः एक पृथ्वी, एक कुटुंब, एक भविष्य या भावनेचा अंगिकार करणारा,जगभरातील सर्जनशील प्रतिभावंत, चित्रपट निर्माते, चित्रपट रसिक आणि सांस्कृतिक प्रेमींना एकत्र आणणारा उत्सव होता, असे सांगितले आहे. आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी “वसुधैव कुटुंबकम” या तत्वज्ञानाचा अंगिकार करण्यासाठी दिलेल्या नाऱ्याचे अनुसरण इफ्फीकडून देखील केले जात आहे. यंदाचा इफ्फी महोत्सव खऱ्या अर्थाने असामान्य, पहिल्यांदाच घडणाऱ्या आणि इतिहास घडवणाऱ्या उल्लेखनीय घडामोडींनी भरलेला आणि सर्वोत्तम चित्रपटनिर्मितीचे दर्शन घडवणारा महोत्सव होता, असे त्यांनी इफ्फीच्या समारोप समारंभात दिलेल्या व्हिडिओ संदेशात सांगितले.  

54व्या इफ्फीमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या सुमारे 250 चित्रपटांमध्ये जवळपास 30,000 मिनिटे अवधीचे प्रदर्शन करण्यात आले ज्या चित्रपटांनी 78 देशांच्या 68 आंतरराष्ट्रीय आणि 17 भारतीय भाषांचे प्रतिनिधित्व केले, असे त्यांनी नमूद केले.

“या महोत्सवात 23 मास्टरक्लासेस, थेट संवाद सत्रे ज्यामध्ये काही प्रत्यक्ष तर काही आभासी माध्यमातून आयोजित करण्यात आली.  जवळपास 50 भव्य रेड कार्पेट गाला सोहळ्यांमुळे संपूर्ण महोत्सवाला भव्यता प्राप्त झाली. या महोत्सवाला आकार देण्यामध्ये आपला बहुमूल्य वेळ देणाऱ्या आणि समर्पित वृत्तीने वाहून घेणाऱ्या मान्यवर परीक्षक मंडळाच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित करत त्यांच्या पाठबळाबद्दल माहिती आणि प्रसारणमंत्र्यांनी आभार मानले. इफ्फीने समावेशकता आणि सर्वांनाच आनंद घेता येईल अशा प्रकारच्या सोयीसुविधांच्या उपलब्धतेसाठी केलेल्या प्रयत्नांना अधोरेखित करताना ठाकूर यांनी सांगितले की या महोत्सवातील चित्रपटांचे प्रदर्शन दिव्यांग सिनेरसिकांनांही मोठ्या पडद्यावर  सहजपणे पाहता यावे यासाठी सांकेतिक भाषा आणि श्राव्य वर्णनाची सोय करण्यात आली होती. महिलांच्या गुणवत्तेचा बहुमान करण्यासाठी आम्ही त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 40 पेक्षा जास्त चित्रपटांचा समावेश करण्यासाठी प्रयत्न केले, अशी माहिती त्यांनी दिली.  

जुने दर्जेदार चित्रपट पुनरुज्जीवित करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानाच्या प्रयत्नांचे अभिनंदन करत माहिती आणि प्रसारणमंत्री म्हणाले की विविध भाषांमधील 5,000 पेक्षा जास्त चित्रपट 4k डिजिटल फॉरमॅटमध्ये पुनरुज्जीवित करण्यात येतील जेणेकरून भारताच्या भावी पिढ्यांना या महान निर्मितींचा आनंद घेता येईल आणि त्यांच्या गुणवत्तेचा सन्मान करता येईल. “ 54व्या इफ्फीमध्ये विशेष प्रकारे रचना केलेल्या विभागात राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत पुनरुज्जीवित केलेल्या सात चित्रपटांचे प्रदर्शन करण्यात आले, ज्यांची चित्रपट प्रेमींनी खूप मोठ्या प्रमाणात प्रशंसा केली, असे ठाकूर यांनी नमूद केले.

जुन्या सिनेमांचे जतन करणे आणि त्याचवेळी नव्या सिनेमांना चालना देण्याच्या आपल्या दुहेरी ध्येयउद्दिष्टांवरही ठाकूर यांनीमं भर दिला. 'सेव्हनटीफाई क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो' या उपक्रमाअंतर्गतच्या 'फिल्म चॅलेंज' स्पर्धेच्या माध्यमातून युवांमधील कलागुणांचे दर्शन घडले असे ते म्हणाले. सर्जनशील युवा चित्रपटकारांनी सादर केलेले चित्रपट विचार करायला लावणारे होते, या चित्रपटांच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरणाचे रक्षण आणि संवर्धन असे महत्त्वाचे विषय हाताळले गेल्याची बाब त्यांनी नमूद केली. सेव्हनटीफाई क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमॉरो' या उपक्रमाअंतर्ग चित्रपट सादर केलेल्या युवा चित्रपटकर्त्यांपैकी ४५ जणांना या क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांनी आपल्या कल्पना मांडण्याची संधी दिली असल्याची बाबही त्यांनी अधोरेखीत केली. 

राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या [National Film Development Corporation of India (NFDC)] फिल्म बजारानंही आपल्या कक्षांचा विस्तार केला असून, विविधांगी आंतरराष्ट्रीय प्रेक्षकांना आकर्षित करू शकतील असे उपक्रम सुरू केले आहेत, यामुळे परस्परदेशांमधल्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक सहकार्यालाही चालना मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. 'व्हीएफएक्स अँड टेक पॅव्हेलियन' आणि माहितीपटासाठीच्या वर्गवारीच्या समावेशामुळे नवकल्पनांचे तसेच कथाबाह्य कलाकृतींच्या सादरीकरणाचे नवदर्शन झाल्याचे त्यांनी सांगितले.

मायकल डग्लस यांना 2023 या वर्षासाठीचा सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल ठाकूर यांनी त्यांचे अभिनंदन केले. या पुरस्कारासाठी डग्लस यांच्या सोबत करत उपस्थीत राहून, इफ्फीसाठी आपलेल्या सगळ्यांच्या आनंदात भर टाकल्याबद्दल कॅथरीन झेटा जोन्स यांचेही त्यांनी आभार मानले. सुवर्ण मयूर पुरस्कार विजेत्यांसह इफ्फीमधील सर्वोत्कृष्ट वेब सीरिजसाठीचा (ओटीटी) पहिल्या पुरस्कार विजेत्यांचेही त्यांनी अभिनंदन केले.

हा चित्रपट महोत्सव यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाच्या [National Film Development Corporation of India (NFDC)] पथकासह, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वातल्या गोवा राज्य सरकारनं केलेल्या अथक प्रयत्नांबद्दल ठाकूर यांनी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या भाषणाच्या समारोपात सर्व चित्रपटकर्ते, कलाकार आणि निर्मात्यांचे अभिनंदन करत, सगळ्यांनी इफ्फीच्या अर्थात या महोत्सवापलिकडच्या जगातही आपल्या कलाकृतींमधून कथा सादर करण्याचा उत्साह, एकता आणि सर्जनशीलता पुढे नेत राहावी असे आवाहनही त्यांनी केले.

* * *

PIB Mumbai | JPS/Shailesh/Tushar/D.Rane

iffi reel

(Release ID: 1980563) Visitor Counter : 124